Turtle Conservation : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासवांचे यशस्वी संवर्धन

Sindhudurg Turtles : सिंधुदुर्ग वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २६ वर्षांपासून कासव संवर्धन मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यातून कासवांच्य विविध प्रजातींच्या संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहेच.
Turtle Conservation
Turtle ConservationAgrowon

Sea Turtle Conservation : महासागरांचे नैसर्गिकदृष्ट्या जतन, संवर्धन व त्यासाठी जगभर जनजागृती करणे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने ८ जून हा जागतिक महासागर दिन (वर्ल्ड ओशन्स डे) म्हणून साजरा केला जातो. भारताला सुमारे सात हजार ५१५ किलोमीटर लांबीची, महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीची, तर त्यातील १२१ किलोमीटरची किनारपट्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभली आहे.

मात्र गेल्या काही वर्षांत जागतिक पर्यावरणाच्या समस्येने सर्वांनाच ग्रासले आहे. त्याला सागरही अपवाद ठरलेला नाही. मानवी हस्तक्षेप, रसायने व औद्योगिकीकरण, जलप्रदूषण आदी विविध गोष्टींमुळे सागरी जीवसृष्टी धोक्यात येत आहे.

कासव संवर्धनाची जागृती

समुद्रातील असंख्य जीवसृष्टीपैकी कासव महत्त्वाचा जीव आहे. मात्र त्याची संख्याही झपाट्याने कमी होत चालली आहे. सन १९९७-९८ च्या सुमारास ही बाब प्रकर्षाने वन्यजीव शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आली.

डॉ. वरद गिरी यांनी विषयाचे गांभीर्य ओळखले. देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील केळकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार यांच्या निर्दशनास त्यांनी ही बाब आणून दिली. कासव संवर्धनाचे काम पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांनी पटवून दिले. दफ्तरदार वन्यजीव क्षेत्रात १९९१ पासून कार्यरत आहेत. त्यांनी वेळीच पावले टाकण्यास सुरुवात केली.

Turtle Conservation
Turtle Conservation : कासव संवर्धनात गुहागर राज्यात अव्वल

सुरू झाले कासव संवर्धन

देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे कासवांचा मोठा वावर असायचा. ती मोठ्या प्रमाणात अंडी घालायची. परंतु प्राणी ती फस्त करायची. त्यामुळे प्रा. दफ्तरदार यांच्या पुढाकारातून कासव संवर्धन प्रयोग २५ वर्षांपूर्वी सुरू झाला. प्रकल्पासाठी कोणता निधी नसल्याने सर्व खर्च खिशातूनच करावा लागत होता.

दोन, तीन कुटुंबांना घेऊन दफ्तरदार यांनी तांबळडेगला पहिले कासव अंडी उबवण केंद्र सुरू केले. दोन, तीन वर्षांत चांगला अनुभव आला. विषयाची व्याप्ती वाढली. प्रकल्पाची चर्चा सर्वदूर पसरल्यानंतर वनविभाग व कांदळवन विभागाकडून त्याची दखल घेतली. प्रकल्पाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तालुक्यांत २४ ते २५ समुद्री ठिकाणच्या किनाऱ्यांवर कासव संवर्धन सुरू झाले. प्रकल्प व त्यातील प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी दफ्तरदार यांच्यावरच सोपविण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्रामस्थांना प्रशिक्षित करण्यात आले.

...असे होते कासव संवर्धन

वेंगुर्ला, देवगड, मालवण या तीव तालुक्यांतील सुमारे १३ गावांमध्ये कासव अंडी उबवण केंद्रे आहेत. त्यांचा आकार एक, दोन गुंठ्यांपासून पाच ते दहा गुंठ्यांपर्यंत असतो. समुद्रकिनाऱ्यालगतच नैसर्गिक पद्धतीने ती उभारावी लागतात. बाजूंनी जाळीचे संरक्षण केले जाते. नोव्हेंबर ते जानेवारी हा अंडी घालण्याचा हंगाम असतो. या काळात कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्याला येतात.

प्रति कासव १०० ते १४० अंडी व पंधरा ते वीस दिवसांच्या फरकाने तीनदा अंडी घालते. संपूर्ण प्रकिया एप्रिल, मेपर्यंत चालते. प्रशिक्षित वन्यजीव रक्षक उबवण केंद्रात ही अंडी घेऊन जातात. वाळूत ओलावा लागेपर्यंत ५० ते ६० सेंमी खोल खड्डा खणला जातो. त्यात अंडी ठेऊन तो बुजविला जातो. यास घरटे असे म्हणतात. दोन खड्ड्यांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून स्वतंत्र कक्ष बनविले जातात. अंडी ठेवल्यापासून ५५ दिवसांनी कासवांची पिले त्यातून बाहेर पडतात. वातावरणाचा अंदाज घेऊन ती समुद्रात सोडली जातात.

Turtle Conservation
Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

रोजगार निर्मिती

उबवण केंद्र चालवीत असलेल्या स्थानिक कुटुंबांना सुरुवातीला वनविभाग आणि आता कांदळवन उपजीविका उपक्रमांतर्गत अंडी, पिलांच्या संख्येनुसार अनुदान देण्यात येते. त्यातून एक कुटुंब प्रति हंगामात ५० ते ६० हजार रुपये रोजगार मिळवते.

संवर्धनातील शिलेदार

सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी कासव संवर्धनात कार्य करणाऱ्या सर्वांना भक्कम पाठबळ दिले आहे. दफ्तरदार हे प्राध्यापकी पेशा सांभाळून सिंधुदुर्ग जिल्हा वनविभागांतर्गत मानद वन्यजीव रक्षक म्हणून १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत तेव्हापासून वन्यजीव रक्षक सागर मालंडकर व सुहास तोरसकरदेखील खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. ‘कासव’ या चित्रपटाचे चित्रीकरण तांबळडेग येथे झाले आहे. या चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट स्वर्ण कमल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात सुरू असलेल्या या कासव संवर्धन प्रकल्पांना जिल्हा, गोवा तसेच विविध राज्यांतील अधिकारी, तज्ज्ञांनी भेटी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रति हंगाम एकूण प्रातिनिधिक आकडेवारी

वर्ष घरटी संख्या अंडी संख्या सोडलेली पिले

२०२१-२२ ३३५ ३२,९२९ २१,९४२

२०२२-२३ ७७४ ८६,०१७ ५४,५४४

ठळक बाबी

कासव स्वतः अंडी उबवत नाही. ते अंडी एका खड्ड्यात पुरून ठेवते. वाळू तापल्यानंतर मिळणारी ऊबच अंड्यांना मिळते. त्यातून पिले बाहेर पडतात.

कासवाच्या घरट्यांमधील तापमानानुसार मादी किंवा नर जन्माला येतो. घरट्यातील तापमान २७ अंश सेल्सिअस व त्या आसपास राहिल्यास नर- मादींची संख्या एकसमान राहते. तापमान २७ अंशांच्या पुढे गेल्यास सर्व मादी, तर त्यापेक्षा खाली गेल्यास सर्व नर होतात.

समाजात कासव संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी जत्रा, कासव महोत्सवांचे आयोजन केले जाते.

स्पीड बोटी, एलईडी मासेमारीमुळे अनेकदा कासवांना दुखापत होते. जाळ्यात अडकलेली कासवे देखील जखमी होतात. त्यांची सोडवणूक करून त्यांच्यावर उपचार केले जातात.

कासवांचे आयुष्यमान ५५ ते ६० वर्षे असते. वयाच्या २५ ते ३० वर्षांनंतर ती अंडी घालण्यास सुरुवात करतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासवे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर आढळतात पाच जातींची कासवे.

ऑलिव्ह रिडले, लेदर बॅक, ग्रीन टर्टल (२५० किलो) हॉक्सबिल, लॉगर हेड अशी त्यांची नावे.

प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य वेगवेगळे. उदा. ऑलिव्ह रिडलेचे अंडी घालण्याचे प्रमाण अधिक.

लेदर बॅक आकाराने मोठे. त्याचे वजन ५०० किलोपर्यंत. जेलफिशसारख्या माशाला ते सहज खाते. समुद्रातील विविध जीव त्यांचे खाद्य.

ग्रीन टर्टलचे खाद्य समुद्री शेवाळ आहे.

हॉक्सबिलचे तोंड चोचीसारखे. मऊ कातडीचे जीव हे त्याचे खाद्य.

लॉगर हेडचे डोके मोठे. खेकडे, शिंपले अशा कडक कवच असलेले जीव त्याचे खाद्य.

नागेश दफ्तरदार ९४२११४६१४३

(प्राध्यापक व मानद वन्यजीव रक्षक, देवगड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com