Maize Crop Farming : मका पिकात तयार केला हातखंडा

Maize Production : दरवर्षी १५ ते १६ एकर क्षेत्र असलेल्या मक्याचे काटेकोर व्यवस्थापनातून खरिपात एकरी ३० क्विंटल, तर रब्बीत ३५ ते ४० क्विंटल उत्पादन घेण्यापर्यंत मजल त्यांनी मारली आहे. घरच्या दुग्ध व्यवसायासाठी देखील मुरघास किंवा मुबलक चाऱ्यासाठी मक्याची शेती त्यांनी फायदेशीर ठरली आहे.
Narayan Mahajan
Narayan Mahajan Agrowon
Published on
Updated on

Maize Farming Management : जळगाव जिल्ह्यात जामनेर शिवारात नारायण लक्ष्मण महाजन यांची तीस एकर शेती आहे. अन्य २० एकर शेती त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. वडील लक्ष्मण यांच्याकडून त्यांनी शेतीचा वारसा घेतला. किशोरवयीन वयापासूनच शेतीचे ज्ञान ते घेऊ लागले. आज गाढ्या अनुभवातून शेतीचे समर्थपणे व्यवस्थापन ते करीत आहेत. तीन विहिरी, तीन कूपनलिका, ट्रॅक्टर, दोन सालगडी अशी सुविधा आहे.

वडील लक्ष्मण, मोठे बंधू शरद महाजन (उत्राण, ता. एरंडोल) यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. कापूस व मका ही त्यांची मुख्य पिके असून केळी हे साडेचार एकरांत असलेले प्रमुख फळपीक आहे. कापसाचे दरवर्षी १५ ते १६ एकर तर मक्याचेही सर्वसाधारण तेवढेच क्षेत्र असते. यंदा सर्वत्र असलेली मका लागवड व दरांची संभाव्य स्थिती अभ्यासून हे क्षेत्र सहा ते सात एकरांपर्यंत सीमित ठेवले आहे.

मका पिकात बनविला हातखंडा

अनेक वर्षांचा अनुभव व अभ्यास यामुळे मका पिकात महाजन यांचा हातखंडा तयार झाला आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत लागवड असते. मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड ते करतात. मका घेतलेल्या ठिकाणी ते पुन्हा हे पीक घेणे टाळतात. पीक फेरपालटीवर भर दिला आहे. रब्बीत खोल नांगरणी व शेत भुसभुशीत करून ठिबकवर मका घेण्यात येतो. भाडेतत्वावरील क्षेत्रात सिंचनाचे स्रोत बळकट नसल्याने तेथे कोरडवाहू मका असतो.

अधिक उत्पादनक्षम व ११० ते ११५ दिवसांत येणाऱ्या वाणांची निवड करतात. सुमारे १२ बाय १० इंचावर लागवड असते. पेरणी यंत्र आणले असून त्याद्वारे बियाण्याची २० टक्के बचत करणे शक्य होते. पेरणीवेळी जमिनीच्या आवश्यकतेनुसार संयुक्त खत प्रति एकर ७५ किलोपर्यंत देतात. यात १०.२६.२६ वा आदी खतांना प्राधान्य असते.

खरिपात निसवणीनंतर मका पिकात अळीचा प्रादुर्भाव दिसतो. या काळात कीटकनाशकाची फवारणी होते. महाजन सांगतात की खताचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्याचे नियोजन असते. मात्र पीक मोठे झाल्यानंतर मजूरबळ उपलब्ध होत नाही. अशावेळी लागणीनंतर एक महिन्याने हे खत देण्यात येते. खरिपात तणांची मोठी समस्या असते. मजूरटंचाई देखील आहे. अशावेळी उगवणी पश्‍चात तणनाशकाचा वापर केला जातो. दोन वेळेस किंवा आवश्यकतेनुसार विद्राव्य खते ठिबकद्वारे देण्यात येतात.

Narayan Mahajan
Maize Fodder Cultivation : अशी करा सकस, रुचकर चाऱ्यासाठी मका लागवड ?

उत्पादन

महाजन सांगतात, की खरिपातील मक्याचे एकरी ३० क्विंटलपर्यंत, तर रब्बीतील मक्याचे ३५ ते कमाल ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एकरी उत्पादन खर्च ३० हजार रुपयांपर्यंत येतो. मागील दोन ते तीन वर्षे मक्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सन २०२२ मध्ये १८०० रुपये तर २०२३ मध्ये कमाल १६०० रुपये दर मिळाला होता.

धान्याव्यतिरिक्त पशुधनास मुबलक चाराही उपलब्ध होतो. दोन- तीन एकर क्षेत्रातील मक्यापासून घरगुती स्वरूपात मुरघास तयार केला जाते. उन्हाळ्यात तो पशुधनास उपयोगात येतो. मुरघास साठवणुकीसाठी शेड तयार केले आहे. हिरवा मका यंत्राच्या मदतीने चांगला दाबून घेण्यात येतो. मक्याप्रमाणेच कापसाचेही एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले जाते. तर केळीची १६ ते १८ किलोपर्यंत रास मिळते.

Narayan Mahajan
Maize Export : मक्याच्या निर्यातीत ५८ टक्क्यां‍नी घट

मक्यास आहे चांगला उठाव : मका लागवडीत खानदेश किंवा जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत मक्याचे क्षेत्र ४० ते ४२ हजार हेक्टरपर्यंत नोंदवण्यात आले आहे. खानदेशात व त्या लगत स्टार्च कारखाने, पशुखाद्य, प्रक्रिया पदार्थांसाठी मक्याला चांगली मागणी आहे. जामनेर, जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) व नंदुरबार या बाजारपेठा मक्यासाठी प्रसिद्ध आहेत.

मक्याची ७० ते ८० टक्के खरेदी खानदेशात जागेवर केली जाते. या थेट खरेदीत प्रचलित दरांपेक्षा क्विंटलमागे ५० रुपये कमी दर मिळतो. परंतु बारदाना, वाहतूक खर्च, श्रम- वेळेत बचत या बाबी लक्षात घेऊन शेतकरी थेट विक्रीस प्राधान्य देतात. मागील खरिपात मक्याला थेट खरेदीत १४०० ते १५०० रुपये तर रब्बीत किमान १८०० व कमाल २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. मक्याची सर्वाधिक आवक जळगाव, चोपडा या भागांत खरिपात असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर काळात जळगाव, चोपडा व अमळनेर येथे प्रतिदिन सरासरी पाच हजार क्विंटल आवक मागील वेळेस झाली.

दुग्ध व्यवसायाची जोड

सुमारे १२ ते १३ वर्षांपासून महाजन दुग्ध व्यवसायही करतात. त्यांच्याकडे सध्या २५ पर्यंत संकरित एचएफ गायी आहेत. सुमारे ५० बाय ३० फूट आकारातील बंदिस्त तर ७० बाय ५० फूट क्षेत्रात मुक्तसंचार गोठा आहे. दररोज सरासरी २०० लिटर दूध संकलन होते. गायी पंजाबहून आणल्या आहेत. शेती व दूध व्यवसायानिमित्त महाजन सातत्याने तज्ज्ञांच्या संपर्कात असतात. पंजाब भागात त्यांनी अभ्यासदौरे केले आहेत. शेतीतून आलेल्या उत्पन्नाची गुंतवणूक शेतीसह मुलांच्या उच्च शिक्षणामध्ये केली जाते.

नारायण महाजन ९२८४२६२२९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com