Strawberries Success Story : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा हा आदिवासी, दुर्गम तालुका आहे. येथील उंबरपाडा दिगर गावपट्ट्यातील शेतकरी पूर्वी भात, नागली, वरई आदी पिके घ्यायचे. शेतीशिवाय दुसरा आर्थिक स्रोत नसल्याने परिस्थिती हलाखीची होती. गावातील जयराम गायकवाड देखील यास अपवाद नव्हते.
सन १९९५ पासून ते बागायती भाजीपाला शेतीकडे (Vegetable Farming) वळले. घरखर्च निघू लागला. पण कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. थोरला मुलगा देवेंद्र यास पदवीचे शिक्षण घेण्यास अडथळे आले. लहान भाऊही शिकत असल्याने वडील एकटेच शेतीत राबायचे.
मनुष्यबळाची मोठी टंचाई होती. मग देवेंद्रच शेतीत राबते झाले. गेल्या २० वर्षांपासून प्रयोगशील, अभ्यासू व कष्टवृत्तीने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेती व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी केली आहे.
स्ट्रॉबेरीची अभ्यासपूर्ण शेती
सन २००२ च्या दरम्यान दिंडोरी परिसरातील स्ट्रॉबेरी शेती देवेंद्र यांच्या पाहण्यात आली. सन २००३ च्या सुमारास त्यांनीही १० गुंठ्यात चांडलर वाणाचा प्रयोग केला. तो यशस्वी ठरला. अभ्यासपूर्ण नियोजन व अनुभवातून आत्मविश्वास वाढू लागला.
अनेक चढ-उतार आले. विविध वाणांचे प्रयोगही केले. इटलीतील तसेच स्पेनमधील 'स्वीट सेन्सेशन', एसए अशा वाणांच्या चाचण्या घेतल्या. स्वीट चार्ली वाण काही वर्षे घेतले. त्यास मर रोगाची समस्या येऊ लागली.
आता अलीकडील वर्षांत विंटरडाऊन या वाणाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. सुरगाणा परिसरात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागते. त्यामुळे लवकर म्हणजे नोव्हेंबरच्या दरम्यान उत्पादन सुरू होणाऱ्या या वाणाची निवड केली.
आकर्षक रंग, आकार, अधिक उत्पादन, चकाकी, टिकवणक्षमता व आंबट-गोड असा हा वाण आहे. आज एकूण पंधरा एकर शेतीपैकी दीड ते दोन एकरांत स्ट्रॉबेरी असते.
लागवड व्यवस्थापन- ठळक बाबी
मे ते जून.- मातृवृक्ष उपलब्धता व रोपवाटिका तयारी.
जून ते सप्टेंबर- मातृवृक्षापासून रोपे अभिवृद्धी
१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर- पुनर्लागवड
-माती परीक्षणाद्वारे खत व्यवस्थापन
-लाल माती किंवा हलक्या जमिनीत रोपनिर्मिती
-३० मायक्रॉन जाडीच्या पॉली मल्चिंग पेपरवर लागवड.
-इनलाईन डबल लॅटरल ठिबक.
-झिगझॅग पद्धतीने एक बाय एक फूट अंतरावर रोपलागवड
-दरवर्षी एकरी तीन ट्रॉली शेणखत (चांगले कुजलेले). निंबोळी पेंड ८० किलो, सेंद्रिय खते १० गोणी, शेणखत कमी असल्यास गांडूळ खत.
-पीक फेरपालट. चार वर्षानंतर पुन्हा त्या क्षेत्रावर लागवड.
-मायकोरायझा, ह्युमिक ॲसिड, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास आदी जैविक घटकांच्या वापरावर अधिक भर.
-एकरी उत्पादन- ६ ते ९ टन.
मिळवले ‘मार्केट’
शिर्डी-सापुतारा रस्त्यालगत देवेंद्र यांची शेती आहे. सापुतारा, सप्तशृंगी, शिर्डी येथे येजा करणारे पर्यटक व भाविकांची वर्दळ, संधी अभ्यासली. विक्री स्टॉल उभारून थेट विक्री सुरू केली. सुरत, अहमदाबाद, राजकोट, हैदराबाद आदी भागातील व्यापाऱ्यांचे जाळे तयार केले. देवेंद्र यांच्या प्रेरणेतून परिसरात स्ट्रॉबेरी उत्पादक तयार होऊ लागले.
सर्वांचे संघटन देवेंद्र यांनी केल्याने व्यापाऱ्यांकडून योग्य दर पदरात पाडून घेण्यात हे शेतकरी यशस्वी झाले. योग्य हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग केल्यास अधिक फायदा होतो. गुणवत्ता असेल तर व्यापारी बांधावरही येतात या बाबी जाणल्या.
‘बोरगाव फ्रेश स्ट्रॉबेरी' ब्रॅण्डने आकर्षक पॅकिंगमधूनही विक्री होते. कोरोना काळात अनेक अडचणी, संघर्ष वाट्याला आला. पण हार न मानता काम सुरूच ठेवले. शहरातील मॉल, शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही पुरवठा होतो.
हंगामभर मिळालेले प्रति किलो दर रू.
वर्ष... किमान...कमाल...सरासरी
२०२०...२०...१५०...८०
२०२१... ५०...३००...१००
२०२२...५०...३५०....११०
महिनानिहाय मिळालेले दर
महिना.. दर रू. (प्रतिकिलो)
नोव्हेंबर, डिसेंबर- २०० ते ३००
जानेवारी- १५० ते २००
फेब्रुवारी, मार्च- ७५ ते ५०
एप्रिल- ३० ते ५०
(नोव्हेंबरपासून फळकाढणी सुरू. २५ डिसेंबरपर्यंत नाताळपर्यंत आवक मर्यादित. दरांत तेजी. पुढे आवक वाढून दर एप्रिलपर्यंत कमी होतात.)
आली आर्थिक सक्षमता:
देवेंद्र यांना आई लीलाबाई, वडील जयराम यांचे मार्गदर्शन लाभते. पत्नी सुनीता खांद्याला खांदा लावून शेतीत राबतात. विहीर खोदाई, खोलीकरण,जमीन सपाटीकरण, अवजारे खरेदी, टुमदार घर बांधले.
मुलांचे शिक्षण, आरोग्य, वाहने अशा गरजा पूर्ण करण्याबरोबर उल्लेखनीय प्रगती कुटुंबाने साधली आहे. शेतकऱ्यांत गटशेतीची चळवळ रुजविली आहे. स्वतःच्या घरासमोर देवेंद्र यांचे स्ट्रॉबेरी संकलन केंद्र असून ते थेट विक्रीसह प्रक्रिया उद्योगासाठीही माल पाठवतात.
सूक्ष्मसिंचन, पॉली मल्चिंग आदींसाठी कृषी विभागाचे पाठबळ लाभले आहे. अन्य शेतकऱ्यांनाही देवेंद्र बांधावर जाऊन मदत करतात.
रोपाविक्रीतून उत्पन्नवाढ:
दरवर्षी शेतकरी गटाच्या माध्यमातून पुणे व वाई (सातारा) येथून मातृरोपांची उपलब्धता केली जाते. लागवडीसाठी आवश्यक रोपांची निर्मिती करून अतिरिक्त रोपांची विक्रीही देवेंद्र करतात.
आदिवासी व राज्यासह गुजरात मधील शेतकरीही त्यांच्याकडून रोपे घेतात. प्रति रोप ५ ते ७ रुपये दराने दरवर्षी ३० हजार रोपांची विक्री होते. त्यातून दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
संपर्क:देवेंद्र गायकवाड- ९३५९३०१०८७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.