Agriculture Success Story : तूर- सोयाबीन पद्धतीचा भलमे यांचा आदर्श

Agriculture Management : चंद्रपूर या दुर्गम जिल्ह्यातील चारगाव येथील मधुकर भलमे यांनी तूर अधिक सोयाबीन या पद्धतीत काही वर्षांपासून सातत्य जपले आहे. दोन्ही पिकांचे शास्त्र जाणून व्यवस्थापन व तुरीचे स्वतः विकसित केलेले वाण यातून कोरडवाहू क्षेत्रात एकरी ७ ते ९ क्‍विंटल, तर बागायती क्षेत्रात १२ ते १३ क्‍विंटल उत्पादकतेचा पल्ला त्यांना गाठता आला आहे. त्यातून शेतीचे अर्थशास्त्र फायदेशीर केले आहे.
Bhalme Family and Farm
Bhalme Family and FarmAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : चंद्रपूर हा दुर्गम जिल्हा आहे. आमटे कुटुंबीयांनी कुष्ठरोग्यांची सेवा- शुश्रूषा करण्यासाठी उभारलेल्या आनंदवनपासून चारगाव सुमारे २६ किलोमीटरवर आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत असून लोकसंख्या दीड हजारावर आहे. शेती हाच गावचा मुख्य व्यवसाय आहे. गावातील मधुकर चिंदुजी भलमे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

खरे तर जिल्ह्यात भाताखाली (धान) मोठे क्षेत्र आहे. परंतु जिल्ह्याच्या काही भागांत शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर लागवड करतात. भलमे यांच्याकडेही हीच पद्धत आहे. पंचवीस वर्षांपासून त्यांना शेतीचा दांडगा अनुभव आहे. शेती अवघी दोन एकर शेती आहे.

तूर- सोयाबीन पीक पद्धती

यंदा एकूण ७२ एकर क्षेत्र शेतीखाली असून तूर हे भलमे यांचे मुख्य पीक आहे. त्यात ते सोयाबीनचे पीक घेतात. बीबीएफ यंत्राच्या मदतीने सुरुवातीला अडीच फूट रुंदीचे गादीवाफे (बेड) तयार केले जातात. सात जूनच्या दरम्यान पाऊस असो वा नसो, प्रत्येक बेडवर तुरीच्या दोन ओळी (जोड ओळ पद्धत) व त्यात दीड फूट अंतर या पद्धतीने तूर लावून घेतली जाते. दोन रोपांतील अंतर चार ते सहा इंच असते. एकरी सुमारे चार ते साडेचार किलो तुरीचे बियाणे लागते. मात्र एक किलो बियाणे आणि तीन किलो रासायनिक खत या प्रमाणात पेरणी होते.

मजुरांकरवी सलग तूर लावायची झाल्यास बियाणे दर वाढतो. एकाच जागेवर अनेक बिया पडतात. त्यामुळे विरळणी करावी लागते. मात्र सध्याच्या पेरणीयंत्र पद्धतीत बियाणे बचत होत असल्याचे भलमे सांगतात. पाऊस आल्यानंतर सोयाबीन लावण्यात येते. कमी कालावधीत म्हणजे सुमारे ९० दिवसांत पक्व होणाऱ्या वाणाची निवड त्यामध्ये होते. कारण सोयाबीनची काढणी जेवढी लवकर होईल तेवढी पुढे तुरीला वाढण्याची अधिक संधी मिळते.

Bhalme Family and Farm
Dubai Success Story : वाळवंटातील संपन्न आनंदवन : दुबई

चोख व्यवस्थापनातील मुद्दे

ऑगस्ट, सप्टेंबर या काळात तुरीच्या शेंडे खुडणीवर भर दिला जातो. यामुळे फळफांद्यांचे प्रमाण वाढीस लागते. या फांद्यांना शेंगधारणा देखील अधिक होते. शिवाय सोयाबीनलाही सूर्यप्रकाश चांगला मिळतो. बेडवरील लागवडीत तुरीलाही खेळती हवा मिळते. परिणामी उत्पादकता प्रभावीपणे साधली जाते.

१०ः२६ः२६ एकरी चार किलो पेरणीवेळी तर ऑगस्टमध्ये दुसरा डीएपी एकरी १५ किलोप्रमाणे खत देण्यात येते. ‘बेड’मध्ये अंतर जास्त असल्यामुळे रानटी डुकरांना त्या ठिकाणी राहण्यास अडचणीचे ठरते. याउलट अंतर कमी असल्यास त्यांना दोन ओळींत लपण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. त्यामुळे ‘बीबीएफ’वरील पेरणीतून वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान मर्यादित ठेवणे किंवा कमी करणे शक्‍य झाले आहे. रानटी डुकरे शिवारात येतात, परंतु त्यांना वास्तव्यास जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याद्वारे होणारे नुकसान कमी राहते. पाण्यासाठी शेततळे घेतले आहे.

Bhalme Family and Farm
Vegetable Farming Success Story : भाजीपाला पिकांनी उंचावले दानापूरचे अर्थकारण

कृषी विभागाशी झगडून आणले ‘बेडमेकर’

शासनाकडून शेतकरी समूहांसाठी ५० टक्‍के अनुदानावर बेडमेकर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र त्याचे महत्त्व पाहता वैयक्‍तिक स्तरावर ते उपलब्ध व्हावे अशी मागणी भलमे यांनी कृषी विभागाकडे सातत्याने दीर्घ काळ रेटून धरली. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. हसनाबादे यांनी अखेर त्यांची तळमळ पाहता त्यांना हे यंत्र उपलब्ध करून दिले.

मिळणारे उत्पादन

कोरडवाहू क्षेत्रात एकरी ७ ते ८ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात १२ ते १३ क्‍विंटल तूर उत्पादकता भलमे यांनी मिळवली आहे. सोयाबीनचे एकरी सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सोयाबीनच्या उत्पन्नातून तुरीचा खर्च कमी होतो. तुरीचा उत्पादन खर्च एकरी सहा हजार ते आठ हजारांपर्यंत येतो. मागील दोन वर्षांपासून तुरीला क्विंटलला पाच ते साडेपाच हजार रुपयांचा दर होता. या वर्षी १२ हजार रुपये दराचा पल्ला गाठला आहे.

प्रयोगशीलतेचा गौरव

प्रयोगशीलतेची दखल घेऊन भलमे यांना २००३ मध्ये शेतीनिष्ठ शेतकरी तर २००८ मध्ये कृषिभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन २००५ मध्ये पीक स्पर्धेतही त्यांना यश मिळाले आहे. सन २०१८ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने भलमे यांनी इस्राईलचा दौरा केला आहे. मुलगी मीनलला देखील त्यांनी कृषी पदवीधर केले आहे. तिच्या ज्ञानाचा उपयोग आता शेतीत होणार आहे.

स्वविकसित वाणाचा वापर

प्रयोगशीलतेत सातत्य राखणाऱ्या भलमे यांनी निवड पद्धतीने तुरीचे वाण विकसित केले आहे. वंदना असे त्याचे नामकरण केले आहे. गुजरात येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडे त्याच्या मालकी हक्कांसाठी नोंदणी केली आहे. कृषी विद्यापीठाकडील शास्त्रज्ञांनीही हे वाण पाहिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या या वाणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

रंगाने पांढरी.

पाच ते सहा दाण्यांची शेंग

कोरडवाहू व ओलितासाठीही अनुकूल

१८० दिवसांत विकसित होते.

मधुकर भलमे, ९४२००८०८८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com