Hulgyache Madage Success Story : मोहोळ ते कुर्डुवाडी मार्गावर मोहोळपासून १२ किलोमीटरवरील अनगर येथे गलंदवाडी रस्त्यावर डॉ. स्वाती संतोष थिटे यांची दहा एकर शेती आहे. शेतातील वस्तीवर थिटे कुटुंबीय राहते. डॉ. स्वाती यांनी मराठी विषयात पीएचडी आणि पती डॉ. संतोष यांनी रेशीमशेती पीएचडी केली आहे. दोघेही गावातील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. डॉ. स्वाती यांना शेतीची आवड असल्याने शेतात त्या विविध प्रयोग करतात. देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सकाळच्या सत्रात त्यांचे महाविद्यालय असते. दुपारनंतर त्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमतात. सध्या त्यांच्या शेतीत अडीच एकर कांदा, तीन एकर ऊस, दीड एकर मका लागवड आहे. दोन एकर क्षेत्रावर विविध देशी बियाणांची लागवड असते. त्यांचा मुलगा देवराज हा शिक्षणासाठी बाहेरगावी आहे. स्वातीताईंना डॉ. संतोष आणि सासूबाई लीला यांची शेती व्यवस्थापनात मदत होते. शेतीमधील प्रयोगांसाठी सोलापूर विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटर, महिला आर्थिक विकास मंडळ, आत्मा, उमेद अभियान यांच्यासह लोकमंगल बँकेने मदत केली आहे.
...अन त्या `डॅाक्टर` झाल्या
डॉ.स्वाती यांचे शिक्षण जेमतेम १२ वीपर्यंत झाले होते. लग्नानंतर पती डॉ. संतोष आणि कुटुंबीयांनी स्वाती यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. स्वातीताईंनी लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मोठ्या कष्टाने डीएड, बीए, एमए, बीएड, सेट-नेट परीक्षेत यश मिळवले. २०१४ मध्ये गावामधील महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. २०२४ मध्ये त्यांना मराठी विषयातील डॅाक्टरेट मिळाली. हा प्रवास खरे तर सोपा नव्हता, पण त्यांनी तो पूर्ण केला. पूर्वीपासूनच शिकण्याची, नवं काही तरी करण्याच्या धडपडी स्वभावामुळे त्या कधीच मागे हटत नाहीत. आज प्राध्यापिका असूनही त्या शेतात खुरपणी असो की पिकावरील फवारणी त्या स्वतः करतात, अगदी वीजपंपाच्या दुरुस्तीमध्येही त्या लक्ष देतात.
आरोग्यदायी हुलग्याचे माडगे
हुलगा हे औषधी, आरोग्यदायी धान्य आहे. पारंपारिक पद्धतीने जात्यावर हुलगा दळून त्यांचे पीठ चुलीवर शिजवून माडगे हा पदार्थ तयार केला जातो. हुलग्याच्या माडग्यामुळे कफ, वात आणि मेद कमी होतो. आयुर्वेदात आजारी व्यक्तीस हुलग्याचे कढण दिले जाते. पूर्वी घराघरांत माडगे आरोग्य चांगले राहाण्यासाठी कायम आहारात असायचे. विशेषतः कणकण, सर्दी-पडसे यावर गुणकारी आहे.
माडगे निर्मितीबाबत डॉ.स्वाती थिटे म्हणाल्या की, एक किलो हुलगे स्वच्छ करून लोखंडी तव्यावर भाजले जाते. थंड झाल्यानंतर जात्यावर दळून त्याचे बारीक पीठ तयार करतात. हे पीठ चाळणीने चाळले जाते. तिखट माडग्यासाठी एक किलो हुलगा पीठ, १५ ग्रॅम तिखट, ७ ग्रॅम हळद, १५ ग्रॅम जिरेपूड, १५ ग्रॅम धनेपूड, ४० ग्रॅम सैंधव मीठ आणि १० ग्रॅम ओवा मिसळून एकत्रित केले जाते. त्यानंतर प्रत्येकी १०० ग्रॅमचे पॅकिंग तयार केले जाते. गोड माडग्यासाठी याच पद्धतीने जात्यावर हुलगा दळून पीठ करतात. ५०० ग्रॅम पिठामध्ये ५०० ग्रॅम सेंद्रिय गूळ, २० ग्रॅम वेलदोडा, २० ग्रॅम जायफळ, ५० ग्रॅम बडीशेप, ५ ग्रॅम सैंधव मीठ मिसळून एकत्रित केले जाते. त्यानंतर पॅकिंग केले जाते.
माडग्याची निर्मिती
एक किलो माडग्याच्या पिठासाठी साधारणपणे १०० वाटी पाणी पुरेसे आहे.स्टीलच्या पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे.
कढईत दोन चमचे तेलात लसणाची फोडणी देऊन त्यात गरम पाणी ओतावे. या पाण्यात माडग्याचे तयार पीठ मिसळून ते चांगले एकत्रित करून घ्यावे.
१० ते १५ मिनिटे मिश्रण चांगले शिजवल्यानंतर चुलीवरुन खाली उतरावे. त्यानंतर पिण्यासाठी माडगे तयार होते.
`यशदा`मध्ये प्रशिक्षण
शेतीसोबतच डॉ. स्वाती यांना पूरक उद्योगामध्येही रस होता, त्यातूनच त्यांनी विविध प्रयोग केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी पूरक उद्योगाच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. वसुंधरा स्वयंसाह्यता महिला बचत गट तयार केला. २०२१ मध्ये गटाच्या माध्यमातून त्यांना पुण्यातील ‘यशदा‘मध्ये अन्नप्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि निर्यात या विषयासंबंधी प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. २०२० मध्ये कोरोना काळ आणि त्याआधी त्यांचे पती डॉ. संतोष आणि त्यांना स्वतःलाही आजारपणामुळे मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागले. त्या काळात आणि एरवी त्या हुलग्याचे माडगे आहारात घेत होत्या. माडग्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि आरोग्याबाबत सजग झालेल्या लोकांची गरज ओळखून त्या माडगे निर्मिती व्यवसायात उतरल्या.
माडग्याचा `वसुंधरा ब्रॅण्ड`
माडग्याच्या विक्रीस चालना मिळण्यासाठी डॉ.स्वाती थिटे यांनी ‘वसुंधरा’ ब्रॅण्ड तयार केला. १०० ग्रॅमच्या प्रिमिक्सचे आकर्षक पाकिटाचे पॅकिंग तयार केले. १२० ते १५० रुपयाला एक पाकीट (१०० ग्रॅम) याप्रमाणे तयार पिठाची विक्री होते. कृषी प्रदर्शन, महिला बचत गट मेळावा तसेच सोशल मिडियाद्वारेही विक्री होते. ग्रामीण भागाच्या बरोबरीने पुणे,मुंबईतील ग्राहकांकडून माडग्याला खास मागणी असल्याने दर महिन्याला १५ ते २० किलोपर्यंत माडग्याच्या पिठाची विक्री होते.
देशी बियाणे बँक
शेतीत ऊस, कांदा लागवड तसेच माडग्याच्या पूरक उद्योगाबरोबर डॉ. स्वाती थिटे यांनी देशी बियाणे बँक विकसित केली आहे. देशी बियाणांच्या संवर्धनाचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी खास दोन एकर शेती त्यांनी राखीव ठेवली आहे. शेतीमध्ये शेपू, मेथी, चुका, पालक, माठ, तांदुळजा, राजगिरा, भेंडी, वांगी, गवार, टोमॅटो, मिरची, कारले, दुधीभोपळा, घेवडा, काकडी, बीट, गाजर आदी प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्यांच्या देशी वाणांची हंगामानुसार लागवड केली जाते. मागणीनुसार वर्षभर शेतकऱ्यांना विविध बियाणांची विक्री केली जाते.
डॅा. स्वाती थिटे, ८९९९९१५१५२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.