Farmer Success Story : गोवऱ्या, धूप, हवन टिक्की उत्पादनातून अर्थकारण केले बळकट

Small-Scale Processing Industries : खिरोदा प्रगण यावल, ता. रावेर, जि. जळगाव येथील गीता शिरीष चौधरी यांनी शेतात लहान युनिटमध्ये देशी गाईंच्या शेणापासून गोवऱ्या, धूप, हवन टिक्की आदी निर्मितीचा लघू प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.
Geeta Shirish Chaudhary
Geeta Shirish ChaudharyAgrowon
Published on
Updated on

Processing Industry Story : जळगाव जिल्ह्यातील खिरोदा प्रगण यावल, (ता. रावेर) येथील गीता चौधरी या उच्चशिक्षित. आई-वडील शिक्षक असल्याने माहेरी शेतीचा कधी संबंध आला नाही. मात्र सासरी शेतीचा मोठा व्याप होता. पती शिरीष हे फैजपुरातील एका महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. तर गीता या खिरोद्यातील सप्तपूट ललित कला भवन येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तेथेच त्या प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित असूनही निवृत्तीनंतर त्यांनी शहराची वाट धरली नाही. गावातच वास्तव्य केले.

गीताताईंना शेती, दुधाळ पशुधनाचे संगोपन यात स्वारस्य होते. सासरी शेती आणि सुरुवातीपासून गोसंगोपन केले जात होते. नोकरी सांभाळून त्या पशुधन व शेतीकडे लक्ष द्यायच्या. पती शिरीष यांची साथ होतीच. याशिवाय त्यांना गावच्या सरपंचपदाची जबाबदारीही पार पाडली. याच काळात गावात डबघाईस गेलेली सहकारी दूध संस्था जिवंत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याची धुरा मुख्यतः महिलांकडेच द्यायची, असे निश्‍चित झाले. गीताताई यांनी सहकारी दूध संस्थेबाबत पुढाकार घेत कामधेनू सहकारी दूध उत्पादक सोसायटीची स्थापना केली. या दूध सोसायटीत एकही पुरुष सभासद, संचालक तसेच पदाधिकारी नाही. सर्व संचालक व पदाधिकारी या महिलाच आहेत. शिवाय दूध पुरवठादारही महिलाच आहेत. या सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अजूनही गीताताई सांभाळत आहेत.

Geeta Shirish Chaudhary
Agriculture Success Story : मिश्रपीक, दुग्धव्यवसायातून मिनाक्षीताईंची यशाला गवसणी

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) कार्यकाळात १५ वर्षे प्रशासकीय समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते. दूध उत्पादनातील बारकावे, गरजा, नावीन्य, संधी यांची चांगली जाणही गीताताईंना आहे. यातून दूध व्यवसायाचा व्याप वाढवत त्यात त्यांनी वर्षागणिक सुधारणा आणि बदल केले.

संकटातही दाखविले सामर्थ

गीताताईंचे पती शिरीष यांचे २०१९ मध्ये निधन झाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. परंतु खचून न जाता त्यांनी दुग्धोत्पादन व्यवसाय सुरूच ठेवला. जोडीला गोवऱ्या, धूप, हवन टिक्की आदी उत्पादनांची निर्मिती सुरू केली. दरम्यानच्या काळात सावदा (ता. रावेर) येथे केळी वेफर्स निर्मितीचा व्यवसायही सुरू केला. ‘इटो’ या ब्रॅण्ड नेमने वेफर्सची विक्री सुरू केली. परंतु दूध व्यवसाय व अन्य व्यवसायांचा व्याप यामुळे पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे केळी वेफर्स निर्मिती व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.

...असा आहे दुग्धव्यवसाय

घरानजीकच्या शेतात सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रात प्रशस्त गोठा उभारला आहे. गोठ्यात सुमारे २० गाई व पाच म्हशी आहेत. रोजचे ३० लिटर दूध संकलन होते. तसेच अलीकडे २० शेळ्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. शेळीपालनातून अद्याप मोठी उलाढाल झालेली नाही. गोठ्याजवळ एका युनिटमध्ये गोवऱ्यांसह धूप, हवन टिक्की आदी उत्पादनांची निर्मिती केली जाते. पशुधनाची संख्या कायम राखत, दूध उत्पादनाऐवजी शेणापासून गोवऱ्यांची निर्मिती अधिक कशी होईल यावर भर दिला जातो. कारण, गोवऱ्यांना बारमाही चांगली मागणी असते. पावसाळ्यात गोवऱ्यांसह धूप निर्मितीचे काम बंद असते. परंतु ऑक्टोबर ते जून या कालावधीत हे काम बऱ्यापैकी सुरू असते. काम अधिक असल्यास दोन महिला मजूर ठेवल्या जातात. त्यांच्यासोबत गीताताई देखील गोवऱ्या, धूप निर्मितीच्या कामात व्यस्त असतात. शेतीकामांसाठी एक सालगडी, तर गोठा व्यवस्थापनासाठी बारमाही एका मजुराची नियुक्ती केली आहे.

Geeta Shirish Chaudhary
Vegetable Farming Success Story : भाजीपाला पिकांनी उंचावले दानापूरचे अर्थकारण

सेंद्रिय शेतीवर भर

गीताताई यांच्याकडे सहा एकर शेती आहे. त्यापैकी काही क्षेत्रात अल्प स्वरूपात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. त्यात भेंडी, गवार, कोबी, वांगी, कांदा, लसूण, मेथी, गिलके, दोडकी, कडीपत्ता आदींचा समावेश आहे. भाजीपाला लागवडीमध्ये रासायनिक निविष्ठांच्या वापर कटाक्षाने टाळला जातो. संपूर्णपणे सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. याशिवाय गांडूळ खत निर्मितीचे एक लहान युनिट तयार केले आहे.

अनुभवातून साधली प्रगती

गीताताईंना पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, डॉ. धीरज नेहेते या तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. गीताताईंचा मुलगा राहुल चौधरी हे खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्रात मृद् शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ही शेतीसंबंधी नवी माहिती, ज्ञान कायम मिळते. सुरुवातीच्या काळात शेती व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन आदी शेतीविषयक बाबींची कोणतीही माहिती नसलेल्या गीताताईंनी जिद्दीच्या जोरावर काम करत यश प्राप्त केले आहे.

शेणापासून बनविलेल्या उत्पादनांची विविधता

शेणापासून वेगवेगळ्या आकारात गोवऱ्या तयार केल्या जातात. त्यात तीन इंच, साडेचार इंच व सहा इंच अशा आकारांची विविधता असते. हवन टिक्की व धूप यांचीही विविध आकार, वजनातील पॅकिंग असते. ‘निरमई काऊडंग प्रॉडक्ट’ या अंतर्गत या उत्पादनांची विक्री केली जाते. तीन इंच व्यासाची एक गोवरी दोन रुपये, साडेचार इंचाची एक गोवरी अडीच रुपये, तर सहा इंचाची एक गोवरी चार रुपये प्रमाणे विक्री केली जाते. तसेच धूप ५० रुपयांत ३० नग, हवन टिक्की २० रुपयांत २५ नग प्रमाणे विक्री होते.

...असे आहे विक्री व्यवस्थापन

गोवऱ्या, धूप, हवन टिक्की यांची विक्री ठाणे, पुणे यांसह रावेरमधील विविध भागांत केली जाते. तूप, ताक या दुग्धोत्पादनांना गावामध्येच अधिक मागणी असते. गोवऱ्या, धूप यांना श्रावणमास, सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती काही वेळेस होते. त्यामुळे ग्राहक शोधण्याची आवश्यकता भासत नाही, असे गीताताई सांगतात.

व्यवसायातील अर्थकारण

वर्षाला सुमारे ४०० किलो धूपची विक्री केली जाते. तर महिन्याला १५ ते २० हजार गोवऱ्यांची विक्री होते. मागणीनुसार देशी तुपाची निर्मिती केली जाते. दर महिन्याला ४ ते ५ किलो देशी तुपाची विक्री होते. दूध व्यवसायातून दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांवर उलाढाल होते. यात किमान एक लाख रुपये नफा असतो. गोवऱ्या, धूप आदींच्या विक्रीतून दर महिन्याला खर्च वजा जाता १५ हजार रुपये नफा हाती राहतो. पावसाळ्यात व्यवसाय बंद असल्याने या काळात उलाढाल कमी असते.

गीता चौधरी, ९९२२८४९१०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com