Silk Market : ‘ई-नाम’द्वारे बारामतीत रेशीम कोष विक्री

Silk Cocoon Procurement : बारामती (जि. पुणे) येथे ई-नाम प्रणालीद्वारे असलेले देशातील पहिलेच रेशीम कोष खरेदी- विक्री ‘मार्केट’ सुरू झाले आहे. पुण्यासह राज्यातील रेशीम उत्पादकांनाही त्याद्वारे हक्काची बाजारपेठ तयार झाली आहे.
Silk Market Baramati
Silk Market BaramatiAgrowon
Published on
Updated on

Silk Industry : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीचे महत्त्व वाढत आहे. पूर्वी कर्नाटकातील रामनगर हीच रेशीम कोष विक्रीसाठी महत्त्वाची बाजारपेठ होती. अलीकडील काळात मात्र राज्यातच बाजारपेठ तयार होऊ लागल्याने शेतकऱ्यांची गैरसोय कमी झाली आहे. आता तर बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ऑनलाइन पद्धतीची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.

नागपूर येथील रेशीम संचालनालयाने १९ जानेवारी २०१९ रोजी त्यास मान्यता दिली. तर २८ सप्टेंबर २०२२ पासून प्रायोगिक स्तरावर ‘ई-नाम ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ कार्यान्वित झाला. कोष विक्रीसाठी या प्रणालीचा वापर करणारी बारामती ही देशातील पहिलीच बाजारपेठ ठरली आहे. कोष गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेसाठी बंगळूर येथे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली कार्यरत केंद्रीय रेशीम महामंडळाचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले यांचेही सहकार्य लाभले आहे.

Silk Market Baramati
Sericulture : बारामतीत उभारतेय कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र

ई-नाम प्रणालीची कार्यपद्धती

बाजारपेठ व दरांत पारदर्शकता आणण्यासाठी संपूर्ण देशात खरेदी-विक्री एकाच प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने करणे हा ई-नाम प्रणालीचा उद्देश आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आधारे ‘स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कसॉर्शियम ही स्वायत्त संस्था ही प्रणाली राबविते. पुणे, नगर, सातारा, सांगली, बीड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध भागांतून रेशीम उत्पादक बारामती येथे कोष घेऊन येतात.

पुणे विभागातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रयोगशाळेत कोष प्रतवारी तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल ‘ई -नाम’च्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध केला जातो. देशपातळीवरील खरेदीदार व रेशीम प्रक्रिया उद्योजक परवाना घेऊन ऑनलाइन ॲपद्वारे लिलाव बोलीत व खरेदी विक्रीत सहभागी होतात.

कोषांच्या प्रतीनुसार दर देण्यात येतो. या प्रणालीमुळे रेशीम उत्पादकांनाही गुणवत्तेनुसार आपल्या कोषांना योग्य दर मिळाला की नाही हे समजते. विक्रीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. कोष सुकविण्यासाठी ‘ड्रायर’ची सुविधाही पुरवण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील पवार आणि उपसभापती नीलेश लडकत व संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून या प्रणालीची कार्यपद्धती राबविण्यात येत आहे.

Silk Market Baramati
Sericulture : अल्पभूधारकाने मिळवली दर्जेदार चॉकी निर्मितीत ओळख

१५५ टनांची कोष विक्री :

ई-नाम प्रणालीद्वारे मागील दोन वर्षांपासून रेशीम कोषांना सरासरी प्रति किलो ४८० रुपये दर मिळाला आहे. सध्या हा दर ५२० रुपये आहे. सन २०२२ पासून सुमारे १९५४ शेतकऱ्यांकडीलएकूण १५५ टन ८१ किलो कोषांची विक्री झाली.

त्यातून सात कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांची उलाढाल झाली. ई-नाम प्रणालीसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत या बाजार समितीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. बाजार समितीत ७० हजार ८८२ शेतकऱ्यांची व तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगण, पश्‍चिम बंगाल राज्यांतील खरेदीदारांनीही नोंदणी केली आहे.

लघू चित्रपटाची निर्मिती

ई-नाम प्रमालीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण विभाग व कृषी व्यापार संघातर्फे लघू चित्रपट बनविला जाणार आहे. त्यासाठी देशातील आठ बाजार समित्यांची निवड झाली आहे. पैकी महाराष्ट्रातून बारामती बाजार समितीचा त्यात समावेश आहे.

कोषोत्तर प्रक्रियेला चालना

बाजार समितीच्या एकर जागेत कोषोत्तर प्रक्रियेचे पथदर्शक प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येत आहे. शासनाकडून सोईसुविधा उभारण्यासाठी सुमारे ९ कोटी ५६ लाख ६२ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भविष्यात गूळ आणि तेलबिया हा शेतीमाल ई-नाम प्रणालीत घेण्याचा बाजार समितीचा मानस आहे. त्यातून देशभरातील बाजार समित्या समान ‘प्लॅटफॉर्म’ येणार असून, आंतरराज्य व्यापारास चालना व देशभरातील शेतकऱ्यांना रास्त दर मिळणार आहे अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

सोमनाथ जगताप ९७३०६९३७१० (ई-नाम, रेशीम कोष बाजारपेठ, बारामती)

माझे पाऊण एकर तुती क्षेत्र आहे. त्या आधारे १०० अंडीपुंजांपासून कोष उत्पादन घेतले. ‘ऑनलाइन’ पद्धतीद्वारे कोषांना चांगले दर मिळाले. पारदर्शकतेमुळे विश्वास वाढला आहे.
जालिंदर निवृत्ती पाटील, कारुदे, माळशिरस
पंधरा दिवसापूर्वी ९२ किलो रेशीम कोषांची ई-नाम प्रणालीद्वारे विक्री केली. प्रति किलो ४४५ रुपये दर मिळाला. त्यापासून सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ‘ई-नाम’मुळे आम्हाला जवळचे हक्काचे मार्केट उपलब्ध झाले आहे.
सोमनाथ शहाजी काकडे, खेड, अहिल्यानगर
ई-नाम प्रणालीद्वारे १०० टक्के ऑनलाइन ‘ऑक्शन’ करणारे बारामती हे देशातील पहिले मार्केट आहे. यात देशातील खरेदीदार सहभागी होत असल्याने स्पर्धा होऊन कोषांना चांगला दर मिळण्यास मदत होत आहे.
सुनील पवार, सभापती, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
ई-नाम पद्धतीद्वारे रेशीम कोषांची खरेदी विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा एकप्रकारे फायदाच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची त्यांना संधी आहे.
डॉ. कविता देशपांडे, सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com