Sericulture : अल्पभूधारकाने मिळवली दर्जेदार चॉकी निर्मितीत ओळख

Silk Farming : देउळगाव गात (ता.सेलू, जि. परभणी) येथील संजय नाईकवाडे यांची केवळ एक एकर शेती आहे. सन २००५ मध्ये ते रेशीम शेतीत उतरले. सुमारे १८ वर्षे प्रामाणिकता, सचोटी व निष्ठेने हा व्यवसाय त्यांनी टिकवला. वाढवला.
Silk Farming
Silk Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सेलू ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव गात ( ता.सेलू, जि. परभणी) हे कापूस उत्पादनातील प्रमुख गाव आहे. गावशिवारात खोल काळी, भारी जमीन आहे. मागील काही वर्षांत अनियमित पर्जन्यमानामुळे पारंपारिक शेतीतून उत्पन्नाची खात्री नसल्यामुळे येथील शेतकरी रेशीमशेती करू लागले. त्यापैकी अल्पभूधारक संजय पांडुरंग नाईकवाडे यांची विशेष ओळख सांगावी लागेल.

सुमारे १८ वर्षांपासून रेशीम शेती टिकवलेले व त्यात वृद्धी केलेले जिगरबाज शेतकरी म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांची एकत्रित कुटुंबाची तीन एकर शेती होती. वाटणीनंतर तीन भावांपैकी प्रत्येकाच्या वाट्याला एक एकर जमीन आली. त्यावर कुटुंबाची उपजीविका चालविणे संजय यांच्यापुढे आव्हान होते.

त्यामुळे प्रसंगी शेतमजुरी व हमाली व्यवसायही त्यांना करावा लागला. काही काळ भाजीपाला शेतीही केली. परंतु आर्थिक मेळ बसेना. दरम्यान गावातील माणिकराव गात उत्तम प्रकारे रेशीम शेती करीत होते. यांच्याकडून संजय यांनी रेशीम शेतीची प्रेरणा व माहिती घेतली. याच व्यवसाय करायचा निश्‍चयही केला.

Silk Farming
Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

सुरू झाली रेशीम शेती

व्यवसायाला सुरवात करताना संजय यांनी जिल्हा रेशीम कार्यालयात जाऊन सर्व तांत्रिक माहिती घेतली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ मध्ये एक एकरात व्ही-वन तुती वाणाची लागवड केली. त्या पुढील वर्षी माफक खर्चात १५ बाय १० फूट आकाराचे रेशीम किटक संगोपनगृह उभारले. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंजांचा पुरवठा होई. संजय वर्षभरात ५ ते ६ बॅचव्दारे रेशीम कोष उत्पादन घेत.

त्यांना प्रति बॅच ७५ ते १०० अंडीपुंजांपासून ६० ते ६५ किलो कोष उत्पादन मिळे.कोष खरेदी कार्यालय करायचे. सन २०११ मध्ये ५० बाय २० फूट आकाराच्या पत्र्याचे शेड असलेल्या संगोपनगृहाची उभारणी केली. त्यातून १५० अंडीपुंजांपासून कोष उत्पादन घेणे शक्य होऊ लागले. अभ्यासूवृत्ती, प्रामाणिकपणा व निष्ठा यामुळे व्यवसायात संजय यांनी चांगलीच गती घेतली.

चॉकी निर्मितीवर लक्ष केंद्रित

अनेक वर्षांच्या अनुभवातून रेशीम कोष निर्मितीत कौशल्य मिळवलेल्या संजय यांनी २०१५ पासूनकोष उत्पादन घेणे थांबवून चॉकी (बाल्यावस्थेतील कीटक) निर्मितीला सुरवात केली. त्यात आजगायत सातत्य आहे. संजय यांची जमीन देऊळगाव गात ते राधेधामणगाव रस्त्याला लागून असूनत्याच ठिकाणी ‘चॉकी रेअरिग सेंटर’ व शेजारी घर आहे. चॉकी निर्मिती सुरू करण्यापूर्वीसंजय यांनी हिंदपूर (आंध्रप्रदेश) येथे त्या विषयातील ९० दिवसांचे शास्त्रीय प्रशिक्षणही घेतले. सुरवातीला साडे बारा बाय १० फूट आकाराच्या जागेत चॉकी निर्मिती सुरु केली.

Silk Farming
Sericulture : आदिवासी भागातील हिरकणींकडून रेशीम शेती

आत्तापर्यंत मिळवलेल्या उत्पन्नाचे योग्य आर्थिक नियोजन केल्याने यंदा ४२ बाय ३२ फूट जागेत सिमेंट, विटांचे पक्के बांधकाम करून अद्ययावत ‘चॉकी रेअरिंग सेंटर’ उभारले आहे. त्यात हॅचिंग रुम, साठवणूक कक्ष व कार्यालय अशी रचना आहे. केंद्रीय रेशीम महामंडळ अंतर्गत कोल्हापूर येथील केंद्रातून अंडीपुंजांचा पुरवठा होतो. ‘चॉकी रेअरिग सेंटर’ चे बांधकाम करून शिल्लक जमिनीवर तुती लागवड आहे. परंतु वर्षभर चॉकी निर्मितीसाठी एवढ्या कमी क्षेत्रावरील तुती पुरेशीनसल्यामुळे अडीच एकर जमीन भाडेतत्वावर घेऊन तेथेही लागवड केली आहे.

आश्‍वासक अर्थकारण

परभणी, जालना व बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांना चॉकीचा पुरवठा होतो. रेशीम उत्पादक १२ ते १५ दिवस आधी चॉकीची आगाऊ मागणी नोंदवितात. चारहजार ते पाचहजार अंडीपुंजांची प्रति बॅच असते. महिन्याला १३ ते १६ हजार चॉकीची विक्री होते. प्रत्येकी १०० अंडीपुंजांचे १० ट्रे मध्ये पॅकिंग करून मागणीनुसार चॉकीचा पुरवठा होतो. सध्या १०० चॉकीचे दर ३५०० रुपये आहेत. वर्षभराचा विचार केल्यास या व्यवसायातून सुमारे ३० टक्क्यांपर्यंत नफा होतो.

आर्थिक प्रगती साधली, कर्जाचा बोजा नाही

संजय यांना व्यवसायात आई भगीरथी, पत्नी अनिता व पुतण्या श्रीकांत यांची समर्थ साथ आहे. संजय सांगतात की रेशीम व्यवसायातूनच मोठा मुलगा दीपक यास एम.एस्सी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) पर्यंतचे शिक्षण देणे शक्य झाले. तो नुकताच खासगी कंपनीच्या सेवेत रुजू झाला आहे. छोटा मुलगा दिनेश वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला आहे. सुमारे तीस लाखांची गुंतवणूक करून शेतात घरही बांधता आले.

याच उत्पन्नातून आर्थिक नियोजन करून कुटुंबातील सर्व सदस्यांचा विमा उतरवला. आत्तापर्यंत कोणतेही खासगी कर्ज काढण्याची वेळ आली नाही. कर्जाचा कोणताही बोजा डोक्यावर नाही. सर्व काही गुंतवणूक शेतीतूनच केली याचे समाधान आहे. मध्यंतरी जोडीला शेळीपालनही सुरू केले. शेळ्यांची संख्या ४० पर्यंत झाली होती. गावातील एकाला त्या अर्धालीने पालनासाठी दिल्या. परंतु चॉकी निर्मिती आणि एकाचवेळी शेळ्यांचे पालन करणे शक्य होईना म्हणून आता शेळ्यांची संख्या १० पर्यंत मर्यादित ठेवली आहे.

सन्मान

कष्ट व अभ्यासाच्या जोरावर साधलेल्या प्रगतीसाठी संजय यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोकराव देशमुख, धनंजय मुंडे आदी मान्यवर तसेच पुणे येथील संस्थेकडून कृषिभूषण पुरस्काराने सन्मान झाला आहे. केवळ चॉकी निर्मिती व पुरवठा करीत नाही. तर शेतकऱ्यांना दर्जेदार कोष निर्मितीसाठी संपूर्ण मार्गदर्शन करतो. त्यांच्या अडचणी सोडवतो. ज्यावेळी शेतकरी बाजारपेठेत कोष विक्री करतात व त्यांच्या हातात चांगल्या रकमेची पट्टी पडते त्यावेळी ते फोन करून त्यांच्या आनंदात मलाही सहभागी करून घेतात हेच माझे खरेखुरे समाधान असते.

संजय नाईकवाडे- ७६२०५५३६१२, ९९२२१००९८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com