Turmeric Processing : शहाबागमध्ये होते ग्राहकांनाच हळद पावडर विक्री

Turmeric Production : रस्त्याकडेला स्टॉल्स उभारून महाबळेश्‍वर, पाचगणी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना थेट विक्री सुरू करून सक्षम, स्थानिक बाजारपेठ तयार केली. त्यातून चांगल्या अर्थार्जनासह रोजगारनिर्मिती झाली आहे. शहाबाग गाव आता हळद पावडर उद्योगासाठी प्रसिद्ध झाले आहे.
Wai Turmeric Business
Turmeric Processing Agrowon
Published on
Updated on

Turmeric Processing Industry : सातारा जिल्हा आले, हळद, ऊस, स्ट्रॉबेरी, राजमा अशा विविध पिकांसाठी विशेषत्वाने ओळखला जातो. सातारी हळदीस राज्यातच नव्हे तर देश, परदेशातूनही मागणी असते. त्याचे बेणे राज्यातील विविध भागांतील शेतकरी लागवडीसाठी आवर्जून घेऊन जातात. वाई तालुका हळदीसाठी प्रसिद्ध आहे.

साहजिकच तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचे ‘क्लस्टर’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच तालुक्यात वाई शहराला लागून कृष्णा नदीच्या काठावर शहाबाग हे सुमारे २३०० लोकसंख्येचे छोटे गाव वसले आहे. गावाला सुमारे शंभर वर्षांची हळद लागवडीची परंपरा आहे. गावचे एकूण क्षेत्र सुमारे ५४६ हेक्टर आहे. त्यातील शेतीयोग्य क्षेत्रात नदी, कॅनॉल, विहिरी यांच्या आधारे ८० टक्के बागायती शेती केली जाते.

प्रक्रियेची उमगली संधी

पूर्वी गावातील शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी बाजारपेठेचाच पर्याय होता. तेथे मिळणाऱ्या दरावरच त्यांचे अर्थकारण अवलंबून होते. मात्र हळदीपासून स्वतःच पावडर निर्मिती सुरू केली व स्वतःची बाजारपेठ तयार केली तर व्यापाऱ्यांना होणारा नफा आपल्याच पदरात पडेल हे गावातील सुरेश कोरडे यांनी वेळीच ओळखले. ते वर्ष होते १९९७-९८ च्या दरम्यानचे. त्यांनी पावडर निर्मितीचे युनिट सुरू केले.

मुंबई, पुणे भागांतून महाबळेश्‍वर, पाचगणी येथे जाणाऱ्या पर्यटकांना शहाबाग मार्गे पुढे जावे लागे. त्यांना चहा, नाश्‍ता यासाठी याच गावचा मुख्य थांबा होता. हे पर्यटकच सुरेश यांच्या हळदीचे मुख्य ग्राहक होते. त्यांच्या आईने साध्या पद्धतीने पॅकिंग करून हळद पावडर विकण्यास सुरुवात केली.

Wai Turmeric Business
Turmeric Processing : हळद प्रक्रियेतून केली ६० लाखांची उलाढाल

अनेक उद्योग राहिले उभे

‘वाईची प्रसिद्ध हळद’ असा बोलबाला असल्याने कोरडे यांच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग गावातील अन्य शेतकऱ्यांनाही त्याची प्रेरणा मिळाली. तेही मग हळद प्रक्रिया उद्योजक झाले. त्यातून विक्रीचे लहान-मोठे स्टॉल उभे राहण्यास सुरुवात झाली. आणि हळद पावडरीच्या थेट विक्रीचे गाव म्हणून शहाबाग पुढे आले.

सुमारे २५ वर्षांपासून ही परंपरा गावाने जपली असून, आजच्या काळात त्याचे प्रमाण वाढले आहे. गावात रस्त्याकडेला लहान-मोठे मिळून ३५ ते ४० स्टॉल कायमस्वरूपी उभे असलेले दिसून येतात. यामध्ये शनिवार व रविवारी ३० ते ३५ तात्पुरते तंबू (टेंट) उभे केले जातात.

पुणे, मुंबईहून महाबळेश्‍वर, पाचगणीला जाणारे पर्यटक या गावातून जात असल्यानेगावात दैनंदिन तीन ते साडेतीन टन तर शनिवार, रविवारी वा सुट्ट्यांच्या दिवशी चार ते पाच टनांपर्यंत थेट विक्री होत असते. किलोला ३०० ते ३२० रुपये दर असतो. २५०, ५०० ग्रॅम ते एक किलो पॅकिंग उपलब्ध असते. मुंबई, पुणे, सातारा, वाई आदी ठिकाणी पाच किलो ते ५० किलो पॅकिंगचाही पुरवठा होतो.

Wai Turmeric Business
Turmeric Processing Industry : सोन्यावाणी आमची हळद पावडर!

काही लाखांच्या उलाढालीस चालना

गावात ऊस, स्ट्रॉबेरी, सोयाबीन, भाजीपाला, वाटाणा, घेवडा, ड्रॅगन फ्रूट, आले आदींचीही शेती होते. सर्वाधिक उसाचे क्षेत्र असून त्यानंतर हळद पीक घेतले जाते. यातील स्ट्रॉबेरी व भाजीपाल्याची थेट विक्रीही हळद पावडरच्या स्टॉलवरून शेतकरी करतात. त्यातून त्यांच्या हाती खेळता पैसा राहतो. शिवाय २५ टक्के अधिकचा फायदाही होतो. ग्राहकांनाही एकाच जागेवर विविध शेतीमाल उपलब्ध होतो. एकूण विक्रीच्या माध्यमातून दररोज काही लाख रुपयांची उलाढाल होते.

सन्मान

शहाबाग गाव विकासाच्या बाबतही आघाडीवर आहे. ते निर्मल ग्राम, पर्यावरण ग्राम झाले असून, २०१०-११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गावाचा सन्मान करण्यात आला आहे. गावात कृषी विभागाच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या जातात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व अन्य अधिकाऱ्यांची त्यासाठी मदत होते.

शहाबाग व हळद पावडर उद्योग (ठळक बाबी)

गावात दरवर्षी ६५ हेक्टरपर्यंत हळद क्षेत्र. देशी, सेलम, आंबेहळद, राजापुरी आदी वाणांचा लागवडीसाठी वापर

उत्पादित पावडरीपैकी ५० टक्के विक्री स्टॉलच्य माध्यमातून.

गावात प्रक्रियेची चार मोठी युनिट्स. तसेच छोट्या शेतकऱ्यांना गरजेएवढीच पावडर तयार करता यावी यासाठी छोट्या युनिट्सचीही सुविधा.

कुटुंबातील महिलाच सांभाळतात थेट विक्रीची जबाबदारी.

गावात सेंद्रिय हळद उत्पादनही होते. गुजरात, अन्य राज्ये तसेच परदेशातूनही या हळदीला मागणी आहे. साहजिकच दरही चांगले मिळत आहेत. निर्यातदार व्यावसायिकांच्या रूपाने निर्यातीला चालना मिळाली आहे.

हळद पिकविण्यासह आमच्या गावातील शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचा सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यातून कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला आहे. मुख्य म्हणजे महिलांना रोजगार मिळाला आहे. आता या पुढे जाऊन पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने गावात निवासी कृषी पर्यटन केंद्र उभारणीवर आम्ही भर देणार आहोत.
- सागर जमदाडे (सरपंच) ९९२१२२९६७७
घरच्या शेतीची जबाबदारी कुटुंबातील पुरुष सांभाळतात. तर घरच्या हळदीचाच वापर असलेले पावडर निर्मिती युनिट चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे असते. आमच्या स्टॉलवरून दररोज दहा किलोपेक्षा अधिक पावडरची विक्री होते. सण- सुट्ट्यांच्या दिवशी त्यात वाढ होते. आमच्या मातीतील हळदीचा दर्जा चांगला असल्याने पर्यटक फोनवरून देखील हळदीची ‘ऑर्डर’ देत असतात.
प्रिया जमदाडे, हळद प्रक्रिया उद्योजक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com