Turmeric Processing Industry : सोन्यावाणी आमची हळद पावडर!

Baliraja Gold Turmeric Brand : देशातील हळद बाजारपेठेसाठी प्रसिद्ध वसमत येथील प्रकाशराव व ज्ञानेश्‍वर या करंडे पिता-पुत्रांनी हळद प्रक्रिया उद्योगात चांगला जम बसवला आहे.
Turmeric Processing
Turmeric Processing Agrowon
Published on
Updated on

Turmeric Farming Success Story : राज्यात हिंगोलीची हळद उत्पादक जिल्हा म्हणून ख्याती आहे. वसमत आणि गोली या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये स्वतंत्र हळद बाजारपेठ विकसित झाली. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या उत्पादक कंपन्या हळद प्रक्रिया उद्योगात कार्यरत झाल्या आहेत.

बाजारपेठेची संधी ओळखली

मूळ गाव पहेनी (ता. हिंगोली) असलेले व वसमत येथे स्थायिक झालेले करंडे कुटुंब सध्या हळद पावडर निर्मितीत आश्‍वासक वाटचाल करीत आहे. कुटुंबातील प्रकाशराव एका महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होते. नोकरी सोडून ते पूर्णवेळ याच उद्योगात आहेत. त्यांची चार एकर शेती आहे. प्रकाशराव यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर (वय २५) बीएचे शिक्षण घेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शेतीची जबाबदारी पाहत आहे.

खरे तर बारावीच्या शिक्षणानंतर पोलिस सेवेत भरतीची तयारी त्याने सुरू केली होती. दरम्यान, सहलीच्या निमित्ताने तमिळनाडू व दक्षिणेकडील अन्य राज्यांत त्याला हळद पावडर निर्मिती व देशभरात त्यास असलेली मागणी अभ्यासता आली. आपल्या जिल्ह्यात या उद्योगाला असलेले महत्त्व त्याने ओळखले. संधीचा फायदा घेऊन आपणही हळद प्रक्रिया उद्योजक व्हायचे असे त्याने ठरवले.

सुरुवातीचा टप्पा

वसमत येथील सरस्वती नगर बाजार समिती जवळ आहे. त्या ठिकाणी स्वतःच्या जागेत उद्योग सुरू केला. तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणात दोन वेळा ज्ञानेश्‍वर सहभागी झाले.

‘बळीराजा गोल्ड फूड ॲण्ड स्पायसेस’ या नावाने केली उद्योगाची नोंदणी. सव्वा लाख रुपये किमतीचे ग्राइंडर यंत्र अमरावती येथून खरेदी केले. सन २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात उद्योग सुरू झाला.

या यंत्राद्वारे प्रतिदिन ३ ते ४ क्विंटल हळद पावडर तयार होते.

Turmeric Processing
Turmeric Cultivation : देशात ७० टक्के हळदीची लागवड

पॅकिंग, लेबलिंग

घाऊक विक्रीसाठी ५० किलो तर किरकोळ विक्रीसाठी ५०० ग्रॅम व एक किलो वजनामध्ये फूड ग्रेड पॉलिथिन बॅग्ज व प्लॅस्टिक बरण्यांमध्ये हळद पावडरीचे पॅकिंग.

‘बळिराजा गोल्ड’ असा ब्रँड.

उलाढाल

सन २०२० मध्ये (पहिल्या वर्षी) ५० क्विंटलपर्यंत पावडरीचे उत्पादन.

दरवर्षी टप्प्याटप्प्याने वाढत आजमितीला ते ५०० क्विंटलपर्यंत.

प्रति किलो एसआरपी २२० रुपये. सध्या महिन्याला ५ टन निर्मिती.

वार्षिक ४० ते ४५ लाख रुपयांची उलाढाल.

कच्चा माल खरेदी

परिसरातील हळद उत्पादकांकडून काढणी हंगामात तर इतर वेळी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतून कच्चा माल घेण्यात येतो.

घरच्या शेतातही आहे हळद लागवड.

हळद खरेदीनंतर बाहेरून ‘ग्रेडिंग’, ‘पॉलिशिंग’ करून घेतात. त्यामुळे हळकुंडाचा दर्जा सुधारतो.

...अशी तयार केली बाजारपेठ

कोविडच्या काळात होटेल्स, खाणावळींना ज्ञानेश्‍वर हळद पावडर देत. ५० ते १०० ग्रॅमचा नमुना देऊन त्यांचा प्रतिसाद घेत. मालाची उत्कृष्ट क्वालिटी, स्वाद व रंग पसंतीस उतरू लागल्यानंतर ‘माउथ पब्लिसिटी’ होऊ लागली. नांदेड, परभणी, हिंगोली, पाथरी, माजलगाव, गेवराई आदी ठिकाणी करंडे यांच्या पावडरीला मागणी आहे. वसमत परिसरातील शेतकरी, महिला घरच्या हळकुंडांपासून प्रति किलो ३० रुपये दराने पावडर तयार करून घेतात.

Turmeric Processing
Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

मिळवल्या बाहेरील बाजारपेठा

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, धाराशिव, नगर आदी ठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांमधून अलीकडील काळात स्टॉल घेणे सुरू केले. त्या वेळी ग्राहकांना व्हिजिटिंग कार्डस देण्यास सुरुवात केली. त्यातून मोठ्या शहरांबरोबरच राज्यभरातील ग्राहकांना मागणीनुसार पुरवठा होतो. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथील मसाले उद्योगांच्याही ‘ऑर्डर्स’ येत आहेत.

मिरची पावडर निर्मितीतून विस्तार

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन मिरची व धना पावडर निर्मितीतून उद्योगाचा विस्तार सुरू केला आहे. पूर्वी बाहेरून मिरची पावडर करून घ्यायचे. अलीकडेच इंदूर येथून प्रति तास १५० किलो मिरची पावडर तयार करणारे दोन लाख रुपये किमतीचे यंत्र घेतले आहे. त्यातून उद्योगात स्वावलंबत्व आणले आहे. खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. मिरची पावडरचे प्रति किलो २०० ते २५० रुपये, तर धना पावडरचे १८० ते २०० रुपये दर आहेत. मिरचीची हैदराबाद तर धन्याची गुजरातहून खरेदी होते.

चौघांवर उद्योगाची भिस्त

प्रकाशराव पावडर निर्मिती, पॅकिंग तर ज्ञानेश्‍वर हळद खरेदी, विक्री बाजारपेठा आदी जबाबदाऱ्या सांभाळतात. या व्यतिरिक्त दोन मजूर तैनात केले आहेत.

आम्ही दर्जेदार कच्चा माल घेतो. त्यात तडजोड करीत नाही. हिंगोली हा हळदीचा जिल्हा असल्याने आम्हाला कच्चा माल आमच्या परिसरातच उपलब्ध होतो. पावडरीची गुणवत्ताही जपल्याने बाजारपेठ मिळवण्यात यशस्वी झालो आहोत.

ज्ञानेश्‍वर करंडे, ८५५२०८२६९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com