Turmeric Processing : हळद प्रक्रियेतून केली ६० लाखांची उलाढाल

Turmeric Processing Industry : उटी (ता. महागाव, जि. यवतमाळ) या गावातील ११ शेतकऱ्यांनी एकत्रित येत राजे छत्रपती पुरुष स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून हळद प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. आज या समूहाची वार्षिक उलाढाल ६० लाख रुपयांवर पोहोचली आहे. निव्वळ नफा ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Turmeric Processing Industry
Turmeric Processing IndustryAgrowon

Success Story : यवतमाळ जिल्ह्यातील उटी (ता. महागाव) या गावातील ११ शेतकरी एकत्र आले. त्यांनी राजे छत्रपती पुरुष स्वयंसाह्यता समूह स्थापन केला. या समूहात गणेश वानखेडे (अध्यक्ष) प्रताप साहेबराव वानखेडे (सचिव), गजानन रामराव वानखेडे, दत्ता रमेश वानखेडे, किरण अशोक शिंदे, दिलीप आनंदराव वानखेडे, राम आनंदराव वानखेडे, गणेश मारोती इनकर, श्रीकांत निळकंठ गावंडे, सुदर्शन बापूराव वानखेडे यांचा समावेश आहे. प्रति माह प्रत्येकी २०० रुपये बचतीपासून सुरुवात झाली.

गावातच २०१५-१६ मध्ये लग्नकार्यासह कार्यक्रमासाठी मंडप, बिछायतीचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी दीड लाख रुपयाची भांडी, मंडप साहित्याकरिता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली गेली. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला. बचतीसह या व्यवसायातून १२ लाख रुपयांचे भांडवल या समूहाने जमा केले.

...अशी झाली सुरुवात

समूहातील सदस्य किरण शिंदे हे मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. परंतु त्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे लक्षात येताच वेळीच गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र गावी शेतीही कमीच असल्याने कच्च्या हळदीवर प्रक्रिया करण्याचे ठरविले. त्यासाठी २०१९ मध्ये रुखमाई उद्योग सुरू झाला. २०१९ ते २०२० या कालावधीत हळदीला साडेपाच ते सहा हजार रुपये क्‍विंटलचा दर होता. सुरुवातीला ४९ हजार रुपयांची गुंतवणूक करून दहा क्‍विंटल हळद विकत घेतली.

मुंबईला पाठवून त्यावर प्रक्रिया करून हळद पावडर तयार केली. त्यासाठी २२ रुपये प्रति किलो खर्च आला.वाहतुकीसाठी १६ हजार रुपये लागले. या तयार झालेल्या हळद पावडरची १४० रुपये किलो दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. पण बाजारपेठेमध्ये फारशी ओळखच नसल्यामुळे हळद विक्रीसाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. परिणामी केलेली गुंतवणूक आणि एकूण खर्चाच्या तुलनेत अपेक्षित फायदा शिल्लक राहिला नसल्याचे गणेश वानखडे कबूल करतात. पहिलाच अनुभव निराशाजनक आला असला तरी हिंमत न हारता उद्योग सुरू ठेवल्याचे गणेश सांगतात.

Turmeric Processing Industry
Processing on Turmeric : सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया

खर्च कमी करण्यासाठी धडपड

मुंबईत वाहतूक आणि कांडप यावर अधिक खर्च होतो, हे लक्षात आल्यानंतर जवळच्या भागामध्ये हळद कांडपसाठी शोध सुरू केला. गावापासून ७० कि.मी. वरील हिमायतनगर (जि. नांदेड) येथून कांडप करून घेतले. खर्च आला केवळ सहा रुपये प्रति किलो. जानेवारी २०२४ पर्यंत येथून हळद पावडर तयार करून घेतली. दरम्यान, या हळदीचे

पॅकिंग करण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी केली. येथून हळद पावडरच्या वितरणाची साखळी हळूहळू बसवली.

...अशी आहे उलाढाल

घरगुती वापरासाठी १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि एक किलो अशा पाऊच पॅकिंगमध्ये, घाऊक व्यापारासाठी १० आणि २५ किलो हे पोत्यामध्ये विक्री होते. उन्हाळ्यात हळदीवर प्रक्रिया अधिक प्रमाणात केली जाते. मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यात हळदीला मागणी अधिक राहते. त्यामुळे या कालावधीत दहा टन हळद पावडरचा पुरवठा होतो. त्यानंतर उर्वरित कालावधीत पाच टन हळद

विकली जाते, असे गणेश सांगतात. विक्रीचा दर साधारणतः २०० ते २२० रुपये किलो असा असतो. पहिल्या टप्प्यामध्ये व्यवसाय वाढविण्यावर भर देत असून, केवळ १५ टक्के नफ्यावर व्यवसाय केला जातो.

Turmeric Processing Industry
Turmeric Processing : हळद पावडर, खपली गव्हाला दिली बाजारपेठ

हळदीची शेतकऱ्याकडून थेट खरेदी

हिगणी, वाडी, मुडाणा, उटी या परिसरांतील शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदीवर भर दिला जातो. त्याचा परतावा धनादेश किंवा थेट बॅंकेत हस्तांतराद्वारे (आरटीजीएस) आठ दिवसांच्या आत देण्याचा

प्रयत्न असतो. त्यासाठी बाजार दरापेक्षा प्रति क्विंटल १०० रुपये कमी दर दिला जात असला

तरी शेतकऱ्यांना अन्य वाहतूक, आडत व अन्य

खर्च (जो ३५० रुपयांपर्यंत जातो.) सोसावा लागत नाही.

...असा मिळतो उतारा

१५००० रुपये क्‍विंटल (१५० रुपये किलो) कच्च्या मालाचा दर आहे. प्रति क्विंटल मालासाठी ग्रेडिंग ७०० रुपये, पॅकिंग ७०० रुपये, वाहतूक खर्च ८०० रुपये क्‍विंटल, हमाली दोन रुपये यानुसार ३६०० रुपये (म्हणजे ३६ रुपये प्रति किलो) खर्च होतो. कच्च्या मालाचा खर्च यात जोडल्यास हा खर्च प्रति किलो १८६ रुपये होतो. सरासरी एक क्‍विंटल हळकुंडापासून ९२ ते ९३ किलो या प्रमाणात पावडर मिळते. प्रक्रियेनंतर हळद पावडरची विक्री २१० रुपयांनी केली जाते.

विक्री आणि विस्तार

हळद पावडरच्या विक्रीसाठी सुरुवातीला मुंबई शहराचा पर्याय निवडला. नंतर हळूहळू वसई, नालासोपारा, दादर, ठाणे तसेच शिर्डी (नगर), नाशिक या भागातील व्यावसायिकांना हळदीचे उत्पादन दाखवणे, त्यांचा विश्‍वास संपादन करणे यावर भर देण्यात आळा. या मार्केटिंगसाठी किरण शिंदे यांनी प्रचंड धडपड केली. आता या श्रमामुळे मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. त्यामुळे दहा टन हळद पावडर विक्रीचा टप्पा पार करता आला. आज या समूहाची वार्षिक उलाढाल ६० लाख रुपयांवर पोहोचली असून, समूहाचा निव्वळ नफा ९ लाख रुपयांच्या घरात आहे. वाढत्या मागणीनुसार व्यवसायात आणखी विस्तार करण्याचे नियोजन केले जात आहे.

...असा उभारला उद्योग

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून १४ लाख ६० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. या प्रकल्पाकरिता ३५ टक्‍के (५ लाख ११ हजार रुपये) अनुदानही शासनाकडून मिळाले आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्हा कृषी विभाग तसेच आत्मा यंत्रणेचे विशेष सहकार्य मिळाले, असे ते सांगतात. यातून गजानन वानखेडे यांच्या शेतात उद्योगासाठी २५ बाय ४० फूट आकाराचे शेड उभारले. येथे पाणी आणि विजेची उपलब्धता होती. त्यामुळे त्यासाठी वेगळा खर्च करावा लागला नाही. अहमदाबाद (गुजरात) येथून २५ एचपी क्षमतेचे ग्रेडिंग मशिन आणि फरीदाबाद (दिल्ली) येथून ऑटोमॅटिक पॅकिंग मशिन खरेदी केले.

गणेश बाबाराव वानखेडे, ९७६४९६७६२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com