
Marine Plant Cultivation : दरवर्षी पाच एप्रिल हा राष्ट्रीय सागरी विकास दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. सन १९१९ पासून त्याची सुरुवात झाली. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे.
आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम ही पिके तर मासेमारी या कोकणातील उदरनिर्वाहाच्या प्रमुख बाबी आहेत. जिल्ह्यात देवगड-मालवण मार्गावर हिंदळे (ता. देवगड) गाव आहे. गावातील प्रसिद्ध काळभैरव मंदिरानजीक आंबा बागायतदार शेखर राणे यांचे घर आहे.
त्यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातून बीएस्सी ॲग्री ही पदवी घेतली. देवगड तालुका हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राणे यांनी आपली आंबा शेती सांभाळताना अन्य बागायतदारांकडील आंबा खरेदी करून सुमारे २५ वर्षे व्यवसाय केला. आजही त्यात सातत्य आहे. परंतु उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी अजून काही पर्यायांच्या ते शोधात होते.
सागरी शेवाळ शेतीचा शोध
शेतीत कार्यरत असताना सागरी शेवाळांमधील अर्कांचा वापर करून (सी वीड एक्स्ट्रॅक्ट) जैव उत्तेजके तयार केली जातात ही माहिती राणे यांना मिळाली होती. दरम्यान मागील वर्षी भावनगर (गुजरात) येथील केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल सॉल्ट ॲण्ड मरिन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील वरिष्ठ संशोधक मोनिका कावले सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्या होत्या.
त्यांना सागरी वनस्पती उत्पादनाच्या काही चाचण्या येथील शेतकऱ्यांसोबत घ्यायच्या होत्या. त्यानुसार आचरा (ता. मालवण) येथे चाचणी प्लॉट घेतला. मात्र काही कारणाने तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र त्यावेळी अशा सागरी शेवाळांबाबत उत्सुकता बाळगून असलेल्या राणे यांनी आचरा येथे डॉ. कावले यांच्याशी भेट घेतली.
अशा शेवाळाच्या अर्कापासून व चोथ्यापासून पिकांसाठी जैवउत्तेजके तसेच ‘आगार सोल्यूशन’ तयार केले जाते. या सोल्यूशनचा उपयोग विविध औद्योगीक व अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये केला जातो. तमिळनाडू भागात या शेवाळाची शेती केली जाते. ही सर्व माहिती समजल्यानंतर राणे यांनी शेतकरी दौऱ्याच्या माध्यमातून रामेश्वर परिसरातील अशा प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेतला.
राणे यांच्याकडील प्रयोग
डॉ. कावले यांचा मागील वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा सिंधुदुर्गात दौरा झाला. त्या वेळी हिंदळे- मोरवे, तांबळडेग आणि मुणगे या तीन ठिकाणी समुद्र शेवाळ उत्पादनासाठी पोषक स्थिती दिसून आली. यातील हिंदळे मोरवे येथे ज्या ठिकाणी अन्नपूर्णा नदी समुद्राला मिळते ती जागा उत्पादनासाठी निश्चित करण्यात आली.
या प्रयोगाचे व्यवस्थापन, देखरेख या सर्व जबाबदाऱ्या राणे यांच्याकडे सोपविण्यात आल्या. प्रयोगाचे सर्व साहित्य व शेवाळ देखील संस्थेकडून पुरवण्यात आले. सव्वीस नोव्हेंबरला हिंदळे येथे प्रयोगाला सुरवात झाली.
यात सुमारे पॉलिथिनच्या सुमारे १० ट्यूबचा वापर करण्यात आला. त्यात संबंधित शेवाळाच्या जाती भरून त्या समुद्रात सोडण्यात आल्या. सुमारे ४५ दिवसांनंतर ट्यूब बाहेर काढण्यात आल्या. त्यात शेवाळाची अपेक्षित वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
प्रयोगाचा विस्तार
यशस्वी उत्पादन मिळाल्याने तांबळडेग आणि मुणगे या दोनही ठिकाणी प्रयोगाचा विस्तार करण्यात आला. तांबळडेग येथे गजबाई देवीच्या मंदिर समोरील समुद्रात ट्यूब सोडण्यात आल्या. त्या प्रकल्पाची जबाबदारी मंदार सनई यांच्यावर सोपविण्यात आली.
तर मुणगे येथे निश्चित केलेल्या ठिकाणी यश मालणकर आणि मारुती धुवाळी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. राणे म्हणाले, की पहिल्या प्रयोगात १० ट्यूब तर अन्य प्रयोगांत प्रत्येक ठिकाणी १० यानुसार २० ट्यूब वापरून तेथे शेवाळाचे उत्पादन घेण्यात आले. कप्पा फायकस आणि ग्रासी लारिया या दोन जातींचा वापर करण्यात आला.
या ट्यूबची लांबी सुमारे १२ मीटर आहे. ट्यूब समुद्री लाटांनी वाहून जाऊ नयेत म्हणून चिरे, दोरखंड यांचा वापर करून नांगर तयार करण्यात आला. ट्यूबमध्ये शेवाळ भरल्यानंतर सातत्याने पाण्याची क्षारता, तापमान, हवेतील आर्द्रता यांच्या नोंदी घेण्यात आल्या. ट्यूबमध्ये काही घटक अडकल्यास शेवाळाची वाढ होत नाही. त्यामुळे दररोज साफसफाई करण्यात आली.
उत्साहवर्धक उत्पादन
समुद्रात सोडताना शेवाळ भरलेल्या ट्यूबचे वजन १२ ते १४ किलो होते. ४५ दिवसांनी काढणीवेळी हे वजन दुप्पट चे तिप्पट अर्थात ४० ते ४५ किलोपर्यंत भरले. साधारणपणे तिप्पट वजन भरल्यास ती जागा शेवाळ शेतीसाठी पोषक मानली जाते. सध्या संबंधित ठिकाणी प्रयोग यशस्वी झाले असून ते पुढे सुरू आहेत.
राणे म्हणाले की या प्रयोगांमुळे सागरी शेवाळाचे व्यावसायिक उत्पादन घेता येऊ शकते याचा आत्मविश्वास आम्हाला आला आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी काही टनांमध्ये मागणी आहे. त्यादृष्टीने भांडवल उभारून तेवढी गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला तसे प्रकल्प उभे करावे लागतील.
सध्या कप्पा जातीच्या ओल्या शेवाळाला प्रति किलो २० रुपये, सुकविलेल्या शेवाळाला २०० रुपये, तर ग्रासी लारिया ओल्या शेवाळाला प्रति किलो १० रुपये तर वाळविलेल्या शेवाळाला १०० रुपये दर सुरू आहे. आता उत्पादित शेवाळाची शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने विशिष्ट तंत्रज्ञानाच्या आधारे साठवणूक करणार आहोत.
शेखर राणे ९४२०७४१७२२, ७६२०३८४७४१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.