Seaweed Processing Industry : प्रक्रिया उद्योगासाठी समुद्री शेवाळ महत्त्वाचे...

Technology of Seaweed Production : समुद्री शेवाळास मोठ्या प्रमाणावर औद्योगिक मागणी आहे. या शेवाळांमध्ये अनेक प्रकारची खनिजे, प्रथिने, आयोडीन, ब्रोमीन, जीवनसत्त्वे आणि अनेक जैवक्रियाशील घटक आहेत. कृत्रिम तळे किंवा किनारी भागात समुद्री शेवाळ उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
Seaweed Production
Seaweed ProductionAgrowon
Published on
Updated on

अमिता जैन, नीलेश्‍वरी वऱ्हेकर

Seaweed Farming : समुद्री शेवाळ (सी विड) हे समुद्राच्या किनारी भागातील उथळ पाणी, खाडी आणि बॅकवॉटरमध्ये, समुद्र किनाऱ्यालगतचे दगड, प्रवाळांचा किंवा जो काही आधार मिळेल त्याला चिकटून वाढते. रंगद्रव्यावरून समुद्री शेवाळाचे हरित शेवाळ, भुरे शेवाळ, लाल शेवाळ आणि नील-हरित शेवाळ असे वर्गीकरण होते.

समुद्री शेवाळ हा समुद्रामधील महत्त्वाचा घटक आहे. यास मोठ्या प्रामाणावर औद्योगिक मागणी आहे. या शेवाळांमध्ये अनेक प्रकारची खनिजे, प्रथिने, आयोडीन, ब्रोमीन, जीवनसत्त्वे आणि अनेक जैवक्रियाशील घटक आहेत.

समुद्री शेवाळांचा उपयोग

आगार, कॅरंजिनान आणि अल्जिन इत्यादी पदार्थांच्या निर्मितीसाठी समुद्री शेवाळांचा उपयोग होतो.

जेलिडेल्ला, जेलिडिअम आणि ग्रॅसिलॅरिया इत्यादी जातीच्या शेवाळांपासून आगार निर्मिती केली जाते.

हॅप्निया, काँड्रास आणि गिगार्टिना जातीच्या लाल शेवाळाचा उपयोग कॅरंजिनान तयार करण्यासाठी केला जातो.

भुऱ्या शेवाळांपैकी सरगॅसम, टर्बिनारिया, हॉर्मोफयसा, सिस्टोसेरिया आणि लॅमिनॅरियाचा उपयोग अल्जिनेट निर्मितीसाठी होतो. तयार झालेल्या आगार, कॅरंजिनान आणि अल्जिनेटचा उपयोग अन्न प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमणात होतो. त्याचप्रमाणे दुग्ध पदार्थ प्रक्रिया, औषध निर्मिती उद्योग, कापड उद्योग, कागद उद्योग, रंगोद्योग आणि वॉर्निश निर्मितीमध्ये वापर होतो.

Seaweed Production
Seaweed Farming Project : आचरा खाडीत शेवाळ शेतीला प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ

भरपूर प्रथिनांची मात्रा असलेल्या उल्वा, एंटेरोमॉर्फा, कोलॅरपा, मोनोस्ट्रोमा इत्यादी हरित शेवाळ, सरगॅसम, लॅमिनॅरीया आणि मायकॉस्टीस जातीचे भुरे शेवाळ, प्रीपायरा, गॅसिलॅरिया, अकँथोफोरा इत्यादी जातीच्या लाल शेवाळाचा उपयोग चीन, जपान, कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि दक्षिण आशियायी देशांमध्ये दैनंदिन आहारात सूप, करी किंवा सॅलडच्या स्वरूपात केला जातो. जेली, चॉकलेट, लोणची आणि वेफर्स सारखे पदार्थ बनविता येतात.

अनेक देशांत शेवाळाचा उपयोग पशू खाद्य म्हणून केला जातो. तमिळनाडू, केरळ भागात ताज्या समुद्री शेवाळाचा वापर नारळ बागांमध्ये खत म्हणून केला जातो. समुद्री शेवाळापासून तयार केलेले सेंद्रिय खत शेतातील पिकांसाठी केला जातो. या शेवाळामध्ये असणारी विविध खनिजे, पाण्यात विरघळणारे पालाश व इतर घटक वनस्पतीच्या वाढीसाठी मदत करतात. यातील कर्बोदके व इतर सेंद्रिय घटक मातीचा पोत वाढवतात.

हरित, भुरे आणि लाल शेवाळ जाती तमिळनाडू, गुजरात, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनारी भागात आढळतात. मुंबई, कारवार, रत्नागिरी, गोवा, विशाखापट्टणम, चिल्का सरोवराच्या भागात समुद्री शेवाळ मोठ्या प्रमाणात सापडते.

समुद्री शेवाळाचे सुमारे सातशे प्रकार भारताच्या किनारी भागात सापडतात. त्यापैकी शेवाळाच्या ६० जाती औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यातील किनारी भागात अनेक ठिकणी आगार आणि आल्जिनेट निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.हे सर्व उद्योग निसर्गतः उपलब्ध होणाऱ्या शेवाळावर अवलंबून आहेत. त्यामुळे समुद्री शेवाळाची कृत्रिमरीत्या लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Seaweed Production
Crop Production : सागरी शेवाळातील जनुक वाढवेल पिकांचे उत्पादन

समुद्री शेवाळाचे उत्पादन

मानवी खाद्य पदार्थांमधील समुद्री शेवाळाचा उपयोग लक्षात घेता कृत्रिम तळे किंवा किनारी भागात लागवड करण्याचे तंत्रज्ञान केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन संस्थेने विकसित केले आहे. त्यामुळे कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या शेवाळ जातींचे सातत्यपूर्ण उत्पादन मिळविणे शक्य आहे. त्यामुळे आगार, आल्जिनेट किंवा कॅरंजीनॅन उद्योगासाठी निसर्गतः उपलब्ध होणाऱ्या शेवाळाच्या साठ्यावर किंवा त्यांच्या हंगामावर अवलंबून राहण्याची गरज नाही. शेवाळाच्या विविध जातींच्या प्रजननाच्या नवीन शास्त्रीय पद्धतींच्या वापरामुळे उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये चांगली वाढ होत आहे.

शेवाळ लागवडीच्या मुख्य दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत मोठ्या आकाराच्या शेवाळाच्या लहान देठांना कापले जाते. या देठापासून लागवड केली जाते. यासाठी कापलेले लहान देठ दोरीमध्ये अडकवले जातात. अशा प्रकारच्या अनेक दोऱ्या एका मोठ्या नायलॉनच्या दोरीला अडकवून समुद्रकिनारी उथळ पाण्यात किंवा कृत्रिम तलावांमध्ये सोडल्या जातात. ही शेवाळ संगोपनाची सोपी पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये म्हणजेच बीजाणू पद्धतीमध्ये शेवाळाचे बिजाणू गोळाकरून त्यांना नर्सरी तळ्यांमध्ये बांबूच्या मदतीने वाढविले जाते. ठरावीक वाढीनंतर शेवाळाची लहान रोपे संगोपन तळ्यामध्ये किंवा समुद्र किनारी भागातील उथळ पाण्यामध्ये वाढवली जातात.

गॅसिलॅरिया, जेलिडेल्ला, हॅप्निया, सिस्टोसेरिया, हार्मोफयसा, कोलॅरपा, उल्वा आणि अकँथीफोरा या शेवाळ जातींची प्रायोगिक तत्त्वावर भारतात लागवड करण्यात आली आहे. याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून किनारी भागातील लोकांना समुद्र शेवाळ उत्पादनाचा चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com