Onion Processing Industry : कांदा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योगातील ‘सन्मित्र’

Onion Dehydration : नगर येथील काही मित्रांनी चार वर्षांपूर्वी ‘सन्मित्र’ शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करून कांदा निर्जलीकरण उद्योग सुरू केला. कंपनीच्या युनिटसह जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडेही अशी निर्जलीकरण युनिट्स उभारून रोजगार निर्मितीसह कंपनीच्या अर्थकारणाला मोठी गती दिली आहे.
Onion Processing Industry
Onion Processing Industry Agrowon

Success Story of 'Sanmitra' Farmer Producer Company : नगर येथे स्नेहालय ही सामाजिक विषयांवर काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून याच भागातील अनिल गावडे, गणेश सानप, कृष्णा वामन, सुनील मोरे, संजय चाबुकस्वार आणि दिलीप कातोरे यांची घनिष्ठ मैत्री झाली. शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, शेतीमालाचे दर आदी समस्यांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या.

शेती शाश्‍वत करणे आणि मालासाठी विक्री व्यवस्था उभारणे या उद्दिष्टांतून या मित्रांनी सन २०१९ मध्ये ‘सन्मित्र’ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. मित्रांपैकी गावडे कंपनीचे अध्यक्ष असून उर्वरित सर्व जण संचालक आहेत. यातील वामन अभियंते आहेत. सभासदांची संख्या ५०० च्या वर आहे.

कांदा प्रक्रिया उद्योग

छत्रपती संभाजीनगर येथील एक खासगी कंपनी कांदा निर्जलीकरण व पावडर, फ्लेक्स निर्मिती उद्योगात कार्यरत आहे. त्यांचा प्रकल्प ‘सन्मित्र’ च्या संचालक मंडळींच्या पाहण्यात आला. सन्मित्र कंपनी पूर्वी कांदा संकलन व ट्रेडिंग व्यवसाय करायची.

आपणही कांदा प्रक्रिया उद्योगात उतरावे, त्यात चांगले भविष्य आहे असे संचालकांना वाटले. त्यांनी संबंधित कंपनीशी चर्चा करून करार केला. त्यानुसार कंपनीच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली नगर येथे प्रकल्प उभारला आहे.

Onion Processing Industry
Onion Dehydration Process : कांदा निर्जलीकरण प्रक्रिया

‘सन्मित्र’ कंपनीचा प्रकल्प उद्योग

निबंळक (ता. नगर) शिवारात प्रकल्प. कंपनी प्राथमिक प्रक्रिया करते. म्हणजे शेतकऱ्यांकडून कांदा घेऊन त्याचे संकलन, कांदा स्वच्छ धुणे व यांत्रिकदृष्ट्या काप करून त्याचे निर्जलीकरण करते.

त्यासाठी आवश्‍यक सुमारे ३० ‘एफबीडी’ यंत्रे, सौरऊर्जेवरील यंत्रणा, कांदा कटर, गोदाम अशी सामग्री व सुविधा. त्यासाठी ३० ते ४० लाखांपर्यंत गुंतवणूक. केंद्र व राज्य सरकारच्या दोन योजनांद्वारे अनुदान, सहा टक्क्यांनी कर्ज.

दररोज चार ते पाच टन कांदा प्रक्रियेची प्रकल्पक्षमता. कंपनीच्या ठिकाणी ६५ टक्के निर्जलीकरण होते.

उर्वरित प्रक्रिया (ग्रेडिंग, फ्लेक्स व पावडर निर्मिती) ही एमआयडीसी येथील एका कंपनीकडून करून घेण्यात येते. अंतिम उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीला पुरवण्यात येते.

ऑक्टोबर ते जूनपर्यंत प्रकल्प चालतो. वर्षाला ५०० ते ६०० टन कांदा, तर यंदा ८० टन टोमॅटो प्रक्रिया केली आहे.

परिसरातील शेतकऱ्यांकडून होते कांद्याची खरेदी. बाजारभावापेक्षा अधिक दर त्यांना देण्यात येतो.

या भागातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच मोठा प्रकल्प असावा.
विविध भागांतील महिला उद्योजक, बचत गट येथे भेट देत आहेत. सर्वांसाठी तो पथदर्शी ठरत आहे.

Onion Processing Industry
Onion Processing Industry : कांदा पेस्ट निर्मितीसाठी लागणारी यंत्रे

सहकार्य

प्रक्रिया उद्योगासाठी कंपनीचे संचालक दिलीप होळकर यांनी स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिली.

संचालक डॉ. अंबादास काळोखे, डॉ. मालोजीराजे तनपुरे, कालिदास खेडकर यांचे मार्गदर्शन. जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, प्रभारी कृषी उपसंचालक किरण मोरे, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी अधिकारी क्रांती चौधरी, तालुका समन्वयक श्रीकांत जावळे, उमेश डोईफोडे यांचे सहकार्य.

अन्य ठिकाणीही युनिट्स

सन्मित्रच्या प्रकल्पाखेरीज नगरसह परिसरातील दोन तालुक्यांतील कंपनीच्या सदस्यांकडेही
कांदा निर्जलीकरणाची सुमारे ६० छोटी युनिट्स देण्यात आली आहेत. त्यातून अडीचशेहून
अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. प्रक्रियेसाठी त्यांना प्रति कांदा बॅगेप्रमाणे पेमेंट केले जाते.

उदाहरण सांगायचे, तर सुषमा व अमोल या एडके कुटुंबाने दोन वर्षांत दोन लाख वीस हजार रुपयांची कर्जाची परतफेड या उद्योगातून केली. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे यांचे मार्गदर्शन त्यासाठी मिळाले. एकूण व्यवसायातून कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अलीकडेच सुमारे शंभर एकर जागा कंपनीने शेती महामंडळाकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यात विविध पिके व सेंद्रिय शेती आकारास आणण्याचे उद्दिष्ट आहे.

‘सन्मित्र’चे अन्य उपक्रम

कोरोना काळात शेतकऱ्यांकडील भाजीपाला खरेदी करून नगर, पुणे, मुंबईत थेट ग्राहकांना
८० टनांपर्यंत विक्री.

एका कंपनीच्या सहयोगाने नाममात्र दरात मागील वर्षी ६५ हजार झाडांचे वाटप.

१०० हून अधिक शेतकरी, महिला बचत गट ‘सन्मित्र’ला जोडले आहेत. पंधराशेहून अधिक जणांना सेंद्रिय शेती प्रशिक्षण.

मागील वर्षापासून सन्मित्रचा डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभाग.
घेतला आहे. १२५० एकरांवर सभासद शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादन करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

सभासद शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. वर्षभरात सुमारे ४५० टन खत तयार केले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शेणाची सव्वा ते दीड रुपये प्रति किलो दराने खरेदी तर खताची १२ रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

नगर तालुक्यासह अन्य भागातील शंभर शेतकऱ्यांना बायोगॅस निर्मितीचे ५४ हजार रुपये किमतीचे युनिट ‘सीएसआर’ निधीच्या मदतीने साडेचौदा हजार ५०० रुपयांना दिले आहे. त्यात तयार होणारी स्लरी ‘सन्मित्र’ खरेदी करते. त्यातून जैविक निविष्ठा तयार केल्या जात आहेत.

संपर्क :
गणेश सानप, ८९५६८७१२४४
कृष्णा वामन, ८८८८५१६७६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com