

Dr Punjabrao Deshmukh Agriculture University: शिक्षण, प्रशासन, उद्योग, शेती, अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पाठबळाने उद्योगाचे धडे गिरवत ग्रामीण भागातील ज्योती देशमुख (टाकरखेड भागिले, ता. देऊळगावराजा) आणि तृप्ती विनोद महाले (मेहकर) यांनी प्रक्रिया उद्योगातून गावशिवारात स्वतंत्र ओळख तयार केली आहे.
टाकरखेड भागिले (ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) येथील ज्योती अंकुश देशमुख यांच्या कुटुंबाची बारा एकर शेती आहे. याचबरोबरीने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी गृहोद्योगात पाऊल ठेवले. त्यांची मुलगी रोहिणी ही शिक्षणाच्या निमित्ताने हॉस्टेलवर राहत होती. त्या ठिकाणी त्यांनी पॅकिंग केलेले खाद्य पदार्थ पाहिले. त्यांची चव अत्यंत सुमार लागली. त्यामुळे त्यांनी बाजारपेठ ओळखून दर्जेदार खाद्य पदार्थांच्या निर्मितीचे ध्येय ठेवले. बाजारपेठेचा अंदाज घेऊन प्रक्रिया उद्योगाचे अर्थकारण समजाऊन घेतले आणि टप्प्याटप्प्याने त्यांनी आंबा, लिंबू, कारले, करवंद, आवळा, मिरची लोणचे, हळद, मसाला निर्मितीला सुरुवात केली. आज जवळपास सुमारे २५ प्रकारचे खाद्य पदार्थ त्या बनवितात. या प्रक्रिया उत्पादनांचा त्यांनी ‘रोहिणी’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. याबाबत त्यांनी प्रमाणपत्र देखील घेतले आहे.
पहिल्या वर्षात साधारणतः ३० क्विंटलपर्यंत खाद्यपदार्थांची उलाढाल झाली. दुसऱ्या वर्षात हीच उलाढाल सात टनांपर्यंत पोहोचली आहे. हे सर्व पदार्थ त्या स्वतः बनवत असल्याने घरगुती चव आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालला. प्रक्रिया उद्योगात मिळालेले यश उत्साहवर्धक ठरल्याने त्यांनी पापड, शेवई, कुरडया, खारोड्या, काळा मसाला, कांदा-लसूण मसाला निर्मितीला देखील सुरुवात केली आहे.
खाद्यपदार्थ दर्जेदार आणि चविष्ट असल्याने ग्राहकांनी सुरुवातीपासूनच पसंती दिली. परिणामस्वरूप घरूनच बऱ्याचशा पदार्थांची विक्री होते. वेळप्रसंगी त्या स्वतः ग्राहकांपर्यंत पदार्थांची पोहोच देतात. यासोबतच परिसरातील गावांमध्ये किराणा दुकानात हे पदार्थ मागणीनुसार पोहोचविले जातात. ज्योतीताईंनी गावात चिखली-देऊळगावराजा मार्गालगत खाद्य पदार्थ विक्री केंद्र सुरू केले. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने भरविलेले प्रदर्शन तसेच अकोला, बुलडाणा, मुंबई, मेहकर येथील प्रदर्शनात सहभागी होत त्यांनी खाद्य पदार्थांच्या विक्रीला गती दिली आहे. देऊळगावराजा येथील विद्यार्थ्यांचे हॉस्टेल तसेच घरगुती मेस धारकांना जाणीवपूर्वक विविध खाद्य पदार्थांचा पुरवठा करतात.
बारा महिलांना रोजगार
ज्योती देशमुख यांच्या गृहोद्योगामध्ये प्रक्रिया हंगामात १२ महिला आणि २ पुरुषांना रोजगार मिळाला आहे. वर्षभर चार ते पाच महिला त्यांच्याकडे कायमस्वरूपी कामाला आहेत. प्रक्रियेला गती येण्यासाठी त्यांनी विविध यंत्रांची खरेदी केली आहे. प्रक्रिया उद्योगाला पुढील टप्प्यात गती देण्यासाठी त्यांची मुलगी रोहिणी ही सध्या फूड टेक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
- ज्योती देशमुख ९०२८७८५९४९
‘केव्हीके’तून मिळाली दिशा
ज्योती देशमुख या रोहिणी महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. फळ प्रक्रिया उद्योगाची वाढ, पदार्थांचे पॅकिंग, लेबलिंग कसे करावे, असे विविध प्रश्न त्यांच्या समोर होते. या दरम्यान त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रक्रिया व मूल्यवर्धन प्रशिक्षण वर्गामध्ये आंबा, करवंद, लिंबू लोणचे निर्मिती आणि विक्रीबाबत प्रशिक्षण घेतले. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने त्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवून पदार्थ विक्रीस सुरुवात केली. आता त्या विविध प्रदर्शनात पदार्थ विक्रीस ठेवतात.
रेणुका माता महिला बचत गटाच्या सदस्या तृप्ती विनोद महाले यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्रिया व मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारची लोणची, पापड निर्मिती, ज्यूस निर्मिती, चटणी, आंबा, पेरूपासून मूल्यवर्धित पदार्थ, तृणधान्याचे पदार्थ निर्मितीबाबत प्रशिक्षण घेऊन दोन बहिणींच्या सहकार्याने प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांच्यापर्यंत उत्पादने पोहोचविण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न चालू आहे.
-कृतिका गांगडे ८८०५००८३४७ (गृहविज्ञान शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)
उभारले विक्री केंद्र...
गेल्या आठ वर्षांपासून मेहकर (जि. बुलडाणा) येथील तृप्ती विनोद महाले या ज्यूस सेंटर चालवतात. यासोबतच मागील दोन वर्षांपासून त्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. साधारणतः आठ वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर कुटुंब चालवणे, स्वतःच्या अस्तित्वाला एक ओळख देण्यासाठी तृप्तीताईंनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. कोणतेही मोठे भांडवल किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, त्यांनी ज्यूस सेंटर सुरू करून उद्योजकतेचा पहिला टप्पा गाठला. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाने कुटुंबाला आधार मिळू लागला. पण यावरच थांबायचं नव्हतं, त्यांनी आपली व्यावसायिक ओळख विस्तारायचे ठरवले.
बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रातून सांडोळी, कुरडई आणि पापड निर्मितीचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाने त्यांना केवळ कौशल्यच नव्हे तर व्यवसायाची दिशा दिली. प्रशिक्षणानंतर त्यांनी प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीला गती देऊन स्थानिक बाजारात विक्री सुरू केली. महिला गटामार्फत त्यांनी २ लाख ४४ हजार रुपयांचे कर्ज घेतले. हंगामानुसार गटातील महिलांकडून त्या कामे करून घेतात. सध्या त्या सात प्रकारच्या चटण्या, उडीद, मूग, बीट, नाचणी, टोमॅटो, पालक पापड आणि सात प्रकारची लोणची त्या तयार करतात.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी मेहकरमधील राजमाता संकुलात स्वतःचे विक्री केंद्र सुरू केले. ग्राहक मिळतील की नाही, याची सुरुवातीला शंका होती. पण मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला. स्थानिक बाजारापुरता मर्यादित राहणारा व्यवसाय आता प्रदर्शनांमधून, कुरिअरद्वारे इतर शहरांमध्ये पोहोचू लागला आहे. कर्जाचा योग्य वापर करून व्यवसायात नवे बदल त्यांनी घडवले. कौटुंबिक सहकार्य हा त्यांच्या यशाचा कणा ठरला आहे. पती विनोद महाले, दोन मुली, बहिणी व कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वेळोवेळी कामात साथ दिली आहे. त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.
- तृप्ती महाले ८६०५८९०९९६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.