Indian Agriculture : पीक बदल, गोपालनातून रोहणवाडीची अर्थकारणाला गती

Crop Change : रोहणवाडी (ता.जि. जालना) गावशिवारातील नाल्यांवर ग्रामस्थ, अरुणिमा अर्थ फाउंडेशन आणि दानशूर लोकांच्या सहकार्यातून झालेल्या बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरले. जल, मृद्‍संधारणाच्या कामामुळे शेतशिवारातील जलस्रोतांना पाणी आले.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Success Story of Agriculture : साधारणत: २०१२ च्या दुष्काळापर्यंत रोहणवाडी (ता.जि. जालना) शिवारात कपाशी, बाजरी, रब्बी ज्वारी लागवड असायची. त्यामुळे अल्प, अत्यल्प भूधारकांना जवळच्या जालना शहरात रोजगारासाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण प्रतिकूल परिस्थितीत शेतीतील उत्पन्नातून कुटुंबाचे अर्थकारण सांभाळणे शक्‍य नव्हते.

गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन अरुणिमा अर्थ फाउंडेशनचे प्रमुख रघुनंदन लाहोटी यांनी सेवाभाव म्हणून टंचाई काळात गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर दिले. या टॅंकरवर पाण्यासाठी उडालेली झुंबड पाहून यावर काही कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो का, असा विचार लाहोटी यांच्या मनात आला.

ग्रामस्थासोबत झालेल्या चर्चेतून नाल्यांची संख्या आणि सध्याची स्थिती नोंदविण्यात आली. अडीच वर्षांत गावकऱ्यांच्या सहकार्यातून नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यासोबतच नाल्याच्या रचनेनुसार सिमेंट आणि इतर प्रकारचे ५० बंधारे शासनाच्या मदतीविना फाउंडेशन, ग्रामस्थ आणि मित्रमंडळाच्या सहकार्यातून बांधण्यात आले. गावशिवारात जल, मृद्‍संधारणाची कामे करण्यात आली.

नाल्यातील गाळ शेतशिवारात पसरण्यात आला. गाळ वाहतूक करण्यासाठी अरुणिमा अर्थ फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना ५० रुपये प्रति ट्रीप सूट देण्यात आली होती. पहिल्या पावसापासूनच नाल्यांमध्ये पाणी साठून जमिनीत मुरू लागले. यातून गावशिवारातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली.

पीक पद्धतीमध्ये बदल

गाव शिवारात कापूस, बाजरी आणि रब्बी ज्वारी लागवड असायची. जल, मृद्‍संधारणाच्या कामामुळे गावशिवारातील १२५ च्या आसपास विहिरी, २०० कूपनलिकांमध्ये पाणी येणे सुरू झाले. पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल केला.

कापसासोबत सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला, मोसंबी, फुलशेती, कांदा, भाजीपाला बीजोत्पादन, ऊस, मका, गहू, हरभरा, जनावरांसाठी बारमाही चारा पिकांची लागवड वाढली. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. अरुणिमा फाउंडेशनच्या समन्वयातून शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेती करणारे शेतकरी, हिवरे बाजार गावाला भेट देऊन त्यांचे अनुकरण सुरू केले आहे.

Indian Agriculture
Climate Change Policy : हवामान बदल धोरण अजेंड्यावर कधी येणार?

वीजटंचाईवर केली मात

गावशिवारात वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज वितरण कंपनीसोबत चर्चा सुरू झाली. गावातील वीजबिल थकबाकीदारांची संख्या, रक्‍कम जास्त असल्याने वीज वितरण कंपनी आवश्‍यक वीजपुरवठा करण्यात हतबल असल्याचे पुढे आले. त्यावर तोडगा म्हणून गावकऱ्यांची बैठक झाली. लाहोटी यांनी वीजबिल थकबाकीतून गाव मुक्‍त झाले, तर काय फायदा होऊ शकतो याची माहिती दिली.

त्यावर ग्रामस्थांचे एकमत झाल्यानंतर २०१७ मध्ये थकित वीजबिलाची सुमारे साडेनऊ लाख रक्कम एकाच वेळी भरून गाव थकबाकीमुक्‍त केले. गावशिवारात पाच डीपी होत्या, त्यामध्ये वीज वितरण कंपनीने पुढाकार घेत आणखी पाच डीपीची भर घातली. यातून वीजटंचाईचा प्रश्‍न संपुष्टात आला.

हगणदरीमुक्‍तीसाठी पुढाकार

ग्रामस्थांनी २०१६-१७ मध्ये फाउंडेशनच्या सहकार्यातून गाव हगणदरीमुक्‍त करण्यासाठी पुढाकार घेतला. अरुणिमा फाउंडेशनच्या कविता रघुनंदन लाहोटी यांनी शौचालयाच्या गरजेविषयी महिलांमध्ये जागृती केली. कापूस उत्पादनातील तीन क्‍विंटल कापूस विक्रीची रक्कम शौचालय बांधकामासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय अनेक महिलांनी घेतला.

मोठ्या प्रमाणात सामूहिकरीत्या शौचालय बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लागणारे साहित्य एकाच वेळी खरेदी केल्याने बऱ्यापैकी रक्‍कम वाचली. शौचालय बांधकाम करणारे ठेकेदार आणि मजुरांवर देखरेख ठेवण्यात आली. यामध्ये सर्वांनी पुढाकार घेतला अन गाव हगणदरीमुक्‍त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, अशी माहिती लक्ष्मण तनपुरे यांनी दिली.

गीर गोपालनास सुरुवात

पीक बदलानंतर गावकऱ्यांनी २०१३ मध्ये शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वेळी लाहोटी यांनी शेतकऱ्यांच्यापुढे असा प्रस्ताव ठेवला, की जे गीर गोपालन करतील त्यांना बीनव्याजी अर्थसाह्य करण्यात येईल. या योजनेमुळे गावात सध्या सुमारे शंभरपेक्षा जास्त गीर गोपालक तयार झाले आहेत.

प्रत्येकाकडे २ ते १५ पर्यंत गीर गायी आहेत. दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाहोटी यांच्याकडून अर्थसाह्य मिळाले होते. या शेतकऱ्यांनी एक रुपयाही न बुडविता परतफेड केली आहे. दरदिवशी सरासरी आठ लिटर दूध देणाऱ्या गायी शेतकऱ्यांकडे आहेत.

गावामध्ये २०१४ मध्ये अरुणिमा डेअरी सुरू करण्यात आली. येथे दूध संकलन करून जालना शहरातील ग्राहकांना वितरित केले जाऊ लागले. आता गावामध्ये अरुणिमा बरोबरच दुर्गेश्‍वरी, वैष्णवी, अमृततुल्य, योगेश, श्रीहरी या डेअरी सुरू आहेत.

हे डेअरीचालक पशुपालक असून दररोज ८०० ते १००० लिटर दूध संकलित करून जालन्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. रतिबाच्या माध्यमातून ७५ ते २०० पर्यंत ग्राहक शेतकऱ्यांसोबत जोडले आहेत. ग्राहकाला ६० रुपये प्रति लिटर दराने दुधाची विक्री होते. संकलन करणारे शेतकरी पशुपालकास ४८ रुपये प्रतिलिटरपर्यंत दर देतात.

फुलशेती, भाजीपाला लागवड

गावातील सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी फुलशेतीला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने गुलाब, गलांडा, शेवंती, बिजली, झेंडू, मोगरा, निशिगंध लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जालना शहर जवळ असल्याने फुलांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

फुलशेतीतून अर्थकारणाला बळकटी आली आहे. फुलशेतीच्या बरोबरीने सुमारे २५ शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. दहा शेतकरी शेडनेटच्या माध्यमातून विविध भाजीपालावर्गीय पिकांचे बीजोत्पादन करतात. एका शेतकऱ्याने बीजोत्पादनाला भाजीपाला रोपवाटिकेची जोड दिली आहे.

‘केव्हीके‘चे मार्गदर्शन

गावातील पीक पद्धती आणि दुग्ध व्यवसाय विस्तारामध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे चांगले मार्गदर्शन मिळाले आहे. या गावामध्ये मुक्‍त गोठ्याविषयी जनजागृती, स्वच्छ दूध निर्मिती, मुरघास याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले.

४० शेतकऱ्यांना चाटण विटा, ४० शेतकऱ्यांना खनिज मिश्रण, चारा उपलब्धतेसाठी डीएचएन १०, डीएचएन ६, फुले गुणवंत आदी गवताचे ठोंब दिल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्रातील पशुविज्ञान तज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे यांनी दिली.

Indian Agriculture
Hirda Medicinal Tree : हिरडा झाला उदरनिर्वाहाचे साधन

ग्रामविकासातील महत्त्वाचे मुद्दे

नाला बांधावर बांबू, वनवृक्ष लागवड.

अरुणिमा फाउंडेशनच्या सहकार्यातून ३५० उपयोगी वृक्षांचे रोपण.

व्यसनमुक्‍तीच्या प्रयत्नाला यश.

चार शेतकऱ्यांकडे शेततळे.

पन्नासहून अधिक शेतकऱ्यांकडे मोसंबीसह पेरू, सीताफळ लागवड.

शेतीला पशुपालनाची जोड, मुक्‍त संचार गोठ्याचा अवलंब.

जमीन सुपीकतेसाठी शेणखत, जिवामृत, शेणस्लरीचा वापर.

गावात पाण्याची समस्या महत्त्वाची होती. ती सोडविण्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीचा वापर करून बंधारे बांधले. यामुळे विहीर, कूपनलिकांना पाणी आले. शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलली. भाजीपाला, फळपिके, बीजोत्पादनाला सुरवात झाली आहे. गीर गोपालन आणि दुग्ध व्यवसाय वाढून अर्थकारण सक्षम झाले आहे.
रघुनंदन लाहोटी ९८६०८१६७८६ (प्रमुख, अरुणिमा अर्थ फाउंडेशन) विजय तनपुरे, (प्रयोगशील पशुपालक) ,८२०८५६२५१२ बाळासाहेब तनपुरे, (प्रयोगशील शेतकरी), ९४२११९१९१८
मी शेतीला गीर गोपालनाची जोड दिली. माझ्याकडे ९ गायी आहेत. ४० लिटर दूध गावातील डेअरीमध्ये पाठवितो. पशुपालनामुळे आर्थिक मिळकत वाढली आहे.
राजेंद्र बुंदेले
लोकसहभागातून शेती आणि पशुपालनाला चालना मिळाली आहे.सुमारे ७५ ग्राहक अरुणिमा डेअरीशी जोडले आहेत. शेतकऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थांना आम्ही शेती आणि पशुपालनाबाबत धडे देत असतो.
डॉ. अक्षय तनपुरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com