
Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील सातगाव पठारचा (ता. आंबेगाव) परिसर बटाटा पिकासाठी प्रसिद्ध आहे. पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरचा घाट सोडल्यानंतर कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगांव, भावडी, कारगाव, पेठ, पारगाव ही सात गावे या पठारात येतात. प्रतिकूल हवामान, दरांची अनिश्चितता यामुळे या भागातील बटाट्याचे क्षेत्र कमी होऊन सहा हजार एकरांपर्यंत येऊन ठेपले आहे. बदलत्या काळानुसार येथील बटाटा शेतीलाही तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची जोड मिळून ही शेती आधुनिक झाली आहे.
सातगाव पठारातील भावडी गावचे अशोक बाजारे यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे ३५ एकर बटाटा शेती आहे. बटाटा चिप्स (वेफर्स) उद्योगात कार्यरत देशातील आघाडीची कंपनी या भागात बटाट्याची कंत्राटी शेती करते.
कंपनी व संबंधित बटाटा उत्पादक यांच्यातील मध्यस्थ म्हणूनही बाजारे जबाबदारी पार पाडतात. शेतकऱ्यांना कंपनीकडील बेणे पुरवणे, उत्पादित बटाटा कंपनीला पुरवणे ही कामेही त्यांच्याकडे असतात. सुमारे दीड हजार शेतकऱ्यांचे आपले नेटवर्क असल्याचे ते सांगतात. कंपनीच्या वतीने लागवडीसंबंधी तांत्रिक मार्गदर्शनही केले जाते.
बटाटा शेतीतील सुधारणा
बाजारे म्हणाले, की पूर्वी पारंपरिक बैलाचलित यंत्राद्वारे बटाट्याची लागवड व्हायची. शेतीत शेणखतही मुबलक असायचे. कालांतराने पशुधन जोपासणे अशक्य होऊ लागले. बैलांची जागा छोट्या ट्रॅक्टरने घेतली. सन २०१५ च्या सुमारास ट्रॅक्टरचलित बटाटा प्लॅंटर तंत्रज्ञान आले.
यात दोन सरींतील अंतर १८ इंचावरून २४ ते २८ इंचावर जाण्यास मदत झाली. पारंपरिक पद्धतीत लागवडीसाठी एकरी १२ ते १३ मजुरांची गरज भासायची. आता प्लँटरद्वारे केवळ तीन मजुरांमध्ये एका दिवसात चार एकरांपर्यंत लागवड करणे शक्य झाले आहे.
प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर नभावडीचे राम सुकाळे सांगतात, की पूर्वी पारंपरिक पद्धतीने बटाटा लागवड करायचो. पाच-सहा वर्षांपासून प्लॅंटरचा वापर ७ ते ८ एकरांवर करू लागलो आहे. त्याच्या वापरामुळे सरी मोठी होऊन माती सरीवर चांगली बसते. बटाटा उघडा पडत नाही. दर्जा चांगला राहतो. मजुरीत बचत होते.
यांत्रिकीकरणामुळे व्यवस्थापन सोपे होऊन बटाट्याची फुगवण, आकार वाढून उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करणे शक्य झाले आहे. श्रम व पैशांची बचतही झाली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संकल्पनेचा वापर वाढत आहे. बाजारे याविषयी म्हणाले, की माझी पुतणी साक्षी आणि पुतण्या सुमीत लंडन येथे ‘एआय’ क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून बटाटा शेतीतही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न आहे.
वाणांमध्येही विविधता
बाजारे सांगतात की पूर्वी मोजकेच वाण असायचे. आता वेफर्स निर्मितीसाठी खास वाणांची विविधता आहे. पंजाबमधूनही काही जाती उपलब्ध होत आहेत. सुमारे ७५ ते ८० दिवसांत म्हणजे लवकर पक्व होणारा वाण आहे. त्यामुळे रब्बीत दुसऱ्या पिकासाठी रान मोकळे होते. एक वाण ९० ते १०० दिवसांत पक्व होतो. तो करपा रोगास प्रतिकारक आहे. अशा वाणांमध्ये घन पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यास तेल कमी लागते.
काढणी यंत्राद्वारे झाली सोपी
बाजारे सांगतात, की शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी विहीरी, बोअरवेल्स यांचा पर्याय आहे. बटाट्यात मिनी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. मात्र काढणी यंत्रात म्हणावे तसे तंत्रज्ञान वापरले जाते. पूर्वी बैलचलित यंत्राद्वारे काढणी व्हायची. आता ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर होतो. पंजाबात बटाट्यात जे हार्वेस्टर वापरले जातात ते आपल्याकडे खरीप बटाट्यासाठी चालत नाहीत. आपल्याकडे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. वरची साल जाण्याची शक्यता असते.
उत्पादन, दर
सातगाव पठार परिसरात खरिपात सर्वसाधारण बटाट्याचे एकरी ६ ते १० टनांपर्यंत तर रब्बीत हेच उत्पादन ९ ते ११ टनांपर्यंत मिळते. मात्र या भागात खरिपातील बटाटा क्षेत्र अधिक असते. त्या तुलनेत रब्बीत १५ ते २० टक्केच असावे. मात्र अलीकडील काळात ते वाढू लागल्याचे बाजारे सांगतात.
करार शेतीतील कंपनीकडून किलोला २० रुपये दर मिळतो. अलीकडील काळात हा दर कंपनीने निश्चित केला आहे. काही शेतकरी पाच एकरांवर बटाटा करीत असल्यास दोन एकरांत कंपनीसोबत करार शेती व उर्वरित तीन एकरांत बाजारपेठेत विक्रीसाठी असे नियोजन असते.
दरांमध्ये चढउतार झाले तर दोन्ही पर्याय खुले असावेत असा त्यामागे विचार असतो. हवामान स्थिती, वाण, व्यवस्थापन असे सर्व घटक पाहता एकरी ५० हजारांपासून ते दीड- दोन लाखांपर्यंत उत्पन्न बटाटा उत्पादकाला मिळत असल्याचे बाजारे सांगतात.
शीतगृहांचे जाळे
सातगाव पठार परिसरात बटाटा बेण्याला मागणी वाढली आहे. लागवड खरिपात होण्याच्या दृष्टीने बेणे फेब्रुवारीत साठवण्यात येते. त्यासाठी मंचर परिसरातील गावांमध्ये शीतगृहांची संख्या वाढली आहे. यानिमित्ताने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उत्पन्नाचे साधन तयार झाले आहे.
सन २०१७ मध्ये भाऊसाहेब सावंत यांनी ‘भीमाशंकर ॲग्रो कोल्डचेन ॲण्ड प्रोसेसिंग कंपनी’ द्वारे दीड लाख गोणी क्षमतेचे भव्य शीतगृह उभारले आहे. अन्य शीतगृहांमध्ये कुरवंडी ( पाचहजार टना क्षमता), पारगाव (सहा हजार टन), अवसरी (दोनहजार ते अडीच हजार टन), थोरांदळे- मंचर (सुमारे पाचहजार टन) आदींचा समावेश आहे. तीन- चार ठिकाणी या स्वरूपाची कामे सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले.
अशोक बाजारे ९९२१३५३१३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.