
डॉ. अजित रानडे
Poultry Farm Management: घर बांधणी आणि उपकरणांबरोबरच पक्ष्यांच्या उच्चतम आणि किफायतशीर उत्पादनासाठी आवश्यक असते ते म्हणजे खाद्य. पक्ष्यांच्या उत्पादनात ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो आणि खाद्याची गुणवत्ता ही पक्ष्यांच्या उत्पादनाची पातळी ठरवण्यासाठी कारणीभूत असते. पक्ष्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या अन्नघटकांचा सखोल अभ्यास करून अन्नपदार्थांची निवड केली जाते. त्याचबरोबर खाद्याचा योग्य उपयोग होण्यासाठी पूरक घटकांचा (उदाहरणार्थ एन्झाइम्स वगैरे) वापर करून खाद्य तयार केले जाते.
मॅश, पॅलेट, क्रम्स वगैरे प्रकारचे खाद्य तयार केले जाते. हे सगळे करत असताना खाद्याच्या किमतीवरती सुद्धा लक्ष ठेवले जाते. सध्या मका हा ऊर्जेचा स्रोत म्हणून आणि सोयाबीन पेंड (डीओसी) प्रथिनांचा स्रोत म्हणून प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त इतर कृषी उत्पादने आवश्यकतेनुसार आणि किमतीनुसार वापरली जातात.
कृषी क्षेत्राची वाढ आणि पर्यायाने कृषी उत्पादनांची वाढ ही कुक्कुटपालनाच्या वाढीपेक्षा कमी असल्यामुळे पक्ष्यांचे खाद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेली कृषी उत्पादने कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यांची किंमतही जास्त असते. अशा वेळी इतर वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा वापर करणे अपरिहार्य ठरते. परंतु कोणतेही अन्नपदार्थ वापरले तरीही योग्य ते अन्नघटक पक्ष्यांना मिळतील याची दक्षता घेतली जाते.
विक्रीव्यवस्थेत सुधारणेला वाव
ब्रॉयलर पक्ष्यांच्या आणि अंड्यांच्या विक्री व्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा बरीच प्रगती झाली असली, तरी अजूनही सुधारणेला वाव आहे. पक्ष्यांची आणि अंड्यांची बाजारपेठेतील मागणी सतत बदलत असते. त्यानुसार पुरवठ्याचे नियोजन झाले तर चांगला भाव मिळतो. यासाठी उत्पादन नियंत्रित करणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
भारतात कुक्कुटपालन सुरू झाल्यानंतर बराच मोठा कालखंड म्हणजे २००५- २००६ पर्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे कुक्कुटपालन केले जात होते. म्हणजे शेतकरी स्वतः हॅचरीमधून एक दिवसाची पिल्ले आणत असत. तसेच पक्ष्यांसाठी खाद्य, औषधे व लसी इत्यादी गोष्टी स्वतः विकत आणत असत आणि पक्ष्यांचे संगोपन करत असत. पक्ष्यांपासून तयार होणारे उत्पादन व्यापाऱ्यांमार्फत किंवा स्वतः बाजारपेठेत विकत असत.
कालांतराने ब्रॉयलर फार्मिंग हे करार पद्धतीने केले जाऊ लागले. त्यामुळे आता मोठ्या मोठ्या कंपन्या या व्यवसायात आल्या आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांना पिल्ले, खाद्य, औषधे वगैरे पुरवतात व तयार पक्षी नेऊन बाजारात विकतात. या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना ग्रोविंग चार्जेस म्हणजे संगोपनाचा खर्च मिळतो.
शेतकऱ्यांना काही रक्कम शाश्वत स्वरूपात मिळते; परंतु बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या पक्ष्यांची संख्या कंपन्यांच्या व्यावसायिक उलाढालीवर अवलंबून राहते. तेव्हा सर्वच संबंधितांनी ऋतुमानानुसार, बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादन नियंत्रित केले तर ते फायद्याचे ठरणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.