Dairy Business : पुन्हा जागविली नवी उमेद

Dairy Production : एका दुर्घटनेत २४ गाई, चार कालवडींचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ रोहिदास ढेरे (लोहगाव, जि. नगर) या कुटुंबावर आली. तीस लाखांचे प्रचंड नुकसान झाले. पण पंचक्रोशीतील असंख्य हात मदतीला सरसावले. कुटुंबानेही नवी उमेद, नव्या इच्छाशक्तीतून मोडून पडलेला व्यवसाय हिमतीने सावरला.
Rohidas Dhere and Family
Rohidas Dhere and FamilyAgrowon

Success Story of Milk Farmer : नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यात लोहगाव आहे. भागातील पर्जन्यमान कमी असले तरी कॅनॉलची सोय झाल्याने पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असते. तीन हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या या लोहगावात बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. गावातील रोहिदास जनार्दन ढेरे यांची पाच एकर शेती आहे.

सन २००८ मध्ये त्यांनी काही कालवडी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु केला. गोठ्यातच पैदास करण्यावर भर देत चाळीस ते पन्नास गाईंच्या क्षमतेचा गोठा बांधला. संपूर्ण कुटुंबाचे कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर १६ वर्षात व्यवसाय चांगला नावारूपाला आणला. बघता बघता दररोज चारशे लिटरच्या आसपास दूध संकलन होऊ लागले.

आणि तो काळा दिवस ठरला

सर्व काही सुस्थितीत असताना ढेरे यांच्यासाठी २१ सप्टेंबर, २०२२ हा काळा दिवस ठरला. सुमारे २८ संकरित गाई आणि सहा कालवडींनी भरलेल्या व्यवसायाला दृष्ट लागली. त्या दिवशी सायंकाळी दूध काढल्यानंतर जनावरांना चारा देण्यात आला.

रात्री उशिरा दोन-तीन गाई आजारी पडल्याचे दिसले. पशुवैद्यकांना बोलावून उपचार सुरु केले. मात्र आजारी गाईंची संख्या वाढत चालली. सकाळपर्यंत तीन गाई व एका कालवडीचा मृत्यू झाला. दिवसागणिक आजारी गाईंची संख्या वाढू लागली.

गावकरी, सहकारी, नातेवाईक यांची ढेरे वस्तीकडे रीघ लागली. औषधोपचारांवर दोन लाखांपेक्षा अधिक खर्च केला. पण उपयोग होत नव्हता. तीन दिवसांत दहा दुभत्या गाईंचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली. सर्व सदस्य खचून गेले. घरच्यांना रुग्णालयात दाखल होण्यापर्यंत मानसिक धक्का बसला.

दहा दिवसात सुमारे २४ गाई आणि चार कालवडींचा मृत्यू झाला. भरलेली दावण रीती झाली. सुमारे तीस लाखांचे जबर नुकसान झाले. गाईंच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी चारा, अन्य बाबी प्रयोगशाळांकडे पाठवल्या. मात्र मृत्यूचे स्पष्ट कारण अद्याप निश्‍चित व्हायचे आहे.

Rohidas Dhere and Family
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

मदतीचे हात सरसावले

मोडून पडलेल्या ढेरे कुटुंबाला पंचक्रोशीतील गावकरी, नातेवाईक, मित्र परिवार, शासन आदींनी आर्थिक मदतीचा हात दिला. कडूभाऊ काळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील नागेबाबा मल्टिस्टेट बॅंकेने दोन लाख देऊ केले.

माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने दीड लाखांची मदत दिली. कुकाण्याचे डॉ. बाळासाहेब कोलते यांनी गाय दिली. एकूण सात लाखांपर्यंत भांडवल असा प्रकारे गोळा झाले. त्यातून रोहिदास यांनी

टप्प्याटप्प्याने १७ पर्यंत गाई खरेदी केल्या. मोकळी झालेली दावण पुन्हा गजबजली. सध्या २२ गाई असून दिवसाला १५० लिटरच्या जवळपास दूध संकलन होते. दोन कंपन्यांना दूध पुरवठा होतो. ‘फॅट’ व ‘एसएनएफ’ नुसार सध्या लिटरला २७ रूपये दर मिळतो आहे.

Rohidas Dhere and Family
Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

असे आहे गोठा व्यवस्थापन

बंदिस्त पध्दतीचा गोठा बांधला आहे. पहाटे पाच वाजता कामास सुरवात होते. दूध काढणीसाठी पूर्वीपासूनच यंत्राचा वापर होतो. गाईंच्या खुरांना बाधा येऊ नये म्हणन रबरी मॅटचा वापर होतो. गाईंना धुतल्यानंतर शेण, गोमुत्राचे पाणी एका जागी जमा करून त्याचा शेतीसाठी वापर होतो. पाच एकरांपैकी दोन एकरांत गिन्नी गवत, लसूण घास, मका अशी चारा पिके घेण्यात येतात.

उर्वरित अडीच एकरांत कापूस व त्यानंतर कांदा अशी पीक पद्धती असते. पाणी कमी पडू नये म्हणून ५० लाख लिटर क्षमतेचा शेततलाव आठ वर्षापूर्वी बांधला आहे. या व्यवसायामुळे वर्षाला सुमारे ४० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते.

त्यामुळे रासायनिक खतांऐवजी शेणखत वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. साहजिकच कांद्याची गुणवत्ता व टिकवण क्षमता वाढली आहे. गरजेच्या वापरानंतर उर्वरित शेणखताची प्रति ट्रॉली साडेतीन हजार रुपये दराने विक्री होते.

मुरघासातून चारा टंचाईवर मात

दर दिवसाला ७०० किलो चारा लागतो. स्वतःच्या शेतातून तो उपलब्ध होत असला तरी गरजेच्या वेळी व शाश्‍वत साठा म्हणून सात वर्षांपासून मुरघास तयार केला जातौ. यंदा आठ टनांपर्यंत मुरघास तयार करून दुष्काळी स्थितीत चाराटंचाईवर मात केली आहे.

बायोगॅसमधून इंधन बचत एका कंपनीकडून अल्प दरात बायोगॅस युनिट मिळाले आहे. जनावरे संगोपनामुळे शेण पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ही यंत्रणा चालवणे सोपे झाले आहेच. शिवाय महिन्याला इंधन खर्चात चांगल्या प्रकारे आर्थिक बचत होत आहे.

कुटुंबाची साथ

रोहिदास यांना आई हिराबाई, वडील जनार्दन यांचे मार्गदर्शन मिळते. पत्नी जयश्री शेती व दुग्धव्यवसायात मोलाची मदत करतात. संचिता, समीक्षा या मुली व मुलगा आयुष देखील शाळेतून शक्य त्यावेळी आईवडिलांना मदत करतात. बंधू रामदास यांचाही व्यवसायात हातभार लागतो.

रोहिदास ढेरे- ९८३४२७८८८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com