अभिजित डाके
Indian Agriculture : खानापूर तालुक्यातील (जि. सांगली) वाझर हे दुष्काळीपट्ट्यातील गाव. बहुतांश शेती कोरडवाहू, पावसावर खरीप आणि रब्बी हंगामाची मदार. या गावात आरफळ योजनेचे पाणी आल्याने शिवारात सिंचनाची सोय झाली. त्यामुळे गाव टप्प्याटप्प्याने दुष्काळ मुक्त झाले. बहुतांश कोरडवाहू शेती बागायती झाली. शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडे कल वाढला. याच गावातील रूपाली शिवाजी होवाळ या प्रयत्नपूर्वक चांगल्याप्रकारे शेती नियोजन करीत आहेत.
रूपाली यांचे वडील मुंबईत रोजगाराच्या निमित्त स्थायिक झाले होते. शेतीकामानिमित्त त्यांचे गावाकडे येणे-जाणे होते. रूपाली यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईमध्येच झाले. रूपाली यांनी एमएमएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. रूपाली यांचे बंधू अनिल आणि सुनील हे नोकरीनिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. होवाळ कुटुंबाचे वाझर गावामध्ये घर आणि पाच एकर शेती आहे.
शेती तशी माळरानच. रूपाली यांचे आजोबा १९९० पर्यंत शेती करायचे. त्यांच्या वडिलांचे १९८५ मध्ये निधन झाले. आई श्रीमती मीनाबाई वडिलांच्या जागी नोकरी करू लागल्या. शेती करण्यासाठी कोणी नसल्याने पडीक होती. परंतु काही अडचणीमुळे रूपालीताईंना गावाकडे यावे लागले. त्यांच्या आईने नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रूपाली यांनीही चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि २०१६ मध्ये त्या कायमस्वरूपी गावी शेती नियोजन करण्यासाठी स्थायिक झाल्या. बरेच वर्षांपासून पडीक असलेली शेती त्यांनी लागवडीखाली आणण्याचे नियोजन केले.
शेती विकासाच्या दिशेने...
शेती नियोजनाच्यादृष्टीने रूपाली होवाळ यांचा मुंबई ते वाझर असा प्रवास झाला. घरची शेती असल्याने ऊस शेती, खरीप, रब्बी हंगाम याची जुजबी माहिती होती. परंतु प्रत्यक्ष शेती करण्याचा प्रसंग कधी आला नाही. आजोबांच्या नंतर तब्बल २६ वर्षे शेती तशीच पडून असल्यामुळे झाडेझुडपे वाढली होती.
पहिले सहा महिने शेत जमीन व्यवस्थित करण्यात गेली. त्यासाठी सुमारे तीन लाखांचा खर्च आला. शेतात विहीर होती, परंतु त्यास पुरेसे पाणी नव्हते, त्यामुळे केवळ खरीप हंगामच साधणे शक्य होते. २०१६ पासून त्यांनी भुईमूग, मूग, चवळी लागवडीवर भर दिला. पीक व्यवस्थापनाचा आत्मविश्वास आल्याने शाश्वत पाण्यासाठी विहीर खोदली. त्यामुळे पाच एकरांपैकी साडेचार एकर शेती लागवडीखाली आणली. शेतामध्ये सर्व ठिकाणी पाणी पोहोचण्यासाठी पाइपलाइन आणि ठिबक सिंचनाचे नियोजन केले.
पीक लागवडीबाबत रूपाली होवाळ म्हणाल्या, की २०१७ च्या दरम्यान १५ गुंठ्यांमध्ये पहिल्यांदा ऊस लागवड केली. नैसर्गिक शेती पद्धतीने ऊस व्यवस्थापन केले. यातून आठ टन ऊस उत्पादन मिळाले. या दरम्यान सोशल मीडियावर संजीव माने, सुरेश कबाडे यांचे ऊस व्यवस्थापनाचे मार्गदर्शन वाचण्यात आले. तसेच गावशिवारातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. याचा फायदा स्वतःच्या शेतातील ऊस उत्पादन वाढीसाठी झाल्याने शेती विकासाला चालना मिळाली.
कुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी बांधावर येऊन मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांना शेतामध्ये ऊस रोपवाटिका तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे मी देखील गादी वाफ्यावर को-८६०३२ या ऊस जातीच्या रोपांची निर्मिती सुरू केली. यातून अतिरिक्त खर्च वाचला. ऊस लागवडीसाठी साडेचार फूट सरी सोडून दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवले जाते.
कारखान्याकडून अनुदानावर खतांची उपलब्धता होते. तसेच पीकवाढीच्या टप्यानुसार मार्गदर्शन मिळते. मला आडसाली हंगामातील उसाचे एकरी ८० टन आणि खोडव्याचे ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. उसामध्ये भुईमूग, मूग, चवळी ही आंतरपिके घेतली जातात. त्यातून मिळणारे उत्पादन घरी खाण्यापुरते ठेवून उर्वरित शेतीमालाची विक्री केली जाते. आंतरपिकांमुळे ऊस व्यवस्थापनाचा काही प्रमाणात खर्च निघून जातो. शेतीमध्ये कायमस्वरूपी तीन महिलांना रोजगार दिला आहे. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार सात ते दहा महिलांना तात्पुरता रोजगार दिला जातो. शेती कामासाठी महिलांना कायम प्राधान्य दिले आहे.
भाजीपाला, आले लागवडीस चालना
भाजीपाला लागवडीबाबत रूपालीताई म्हणाल्या, की उसाप्रमाणे भाजीपाला पीकदेखील महत्त्वाचे असून दररोज पैसा मिळतो. त्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक आणि दर याचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केले आहे. बाजारपेठेचा विचार करूनच यंदा मार्चमध्ये दहा गुंठे क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली आहे. त्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑगस्ट महिन्यात घेवडा लागवड केली जाते.
घेवडा आणि टोमॅटोची स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. भाजीपाला पिकातून सरासरी वीस हजारांचे उत्पन्न मिळते. या वर्षीपासून एक एकर आले आणि दहा गुंठे क्षेत्रावर शेवगा लागवड केली आहे. लागवडीसाठी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले असून बाजारपेठेचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने पीक बदलाला सुरुवात केली आहे. जमिनीची सुपीकता जपत सुधारित तंत्राने शेती नियोजन केले आहे.
विविध पिकांची लागवड
आडसाली ऊस तीन एकर
टोमॅटो दहा गुंठे
शेवगा दहा गुंठे
आले एक एकर
शेती नियोजनाची सूत्रे
प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने ऊस, भाजीपाला लागवड, व्यवस्थापन. शिवारफेरीमध्ये सहभाग.
५० टक्के कोंबडी, कंपोस्ट, सेंद्रिय खत आणि ५० टक्के रासायनिक खतांचा वापर.
जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांची लागवड.
खोडवा पिकामध्ये पाचट कुट्टीचे आच्छादन केल्यामुळे वाफसा राहण्यास मदत.
संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन, यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक वापर.
येत्या काळात शेळीपालनाचे नियोजन.
रूपाली होवाळ, ९७०२९७६४४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.