Processing Food Industry : जळगाव येथील राधेश्याम व ओमप्रकाश हे राठी बंधू मूळचे राजस्थानचे. अनेक वर्षांपूर्वी ते जळगावी स्थायिक झाले. सन १९९५ मध्ये जळगाव ‘एमआयडीसी’ येथे आठ हजार चौरस फूट क्षेत्रात डाळ मिल युनिट उभारून उडीद, मूग, तूर, हरभरा आदी डाळीनिर्मिती उद्योग त्यांनी सुरू केला. त्यातील अनेक खाच खळगे पाहिले. शेतीशी निगडित उद्योगात जोखीमही तेवढीच असते.
संयम व सातत्याने काम करण्याबरोबर दर्जा राखण्याचीही गरज असते हा मंत्र घेतला. दरम्यानच्या काळात कच्चा माल व बाजारपेठेशी निगडित समस्या आल्याने उद्योग बंद करावा लागला. त्यानंतर २००७ मध्ये दोन्ही बंधूंनी मका पोहे निर्मितीवर भर दिला. संपर्क व बाजारातील ओळख यातून जळगाव व त्याच्या सीमेबाहेर आपले पोहे पोहोचविले.
नव्या पिढीने उचलली जबाबदारी
राधेश्याम यांचे पुत्र रोहित यांनी सांगली येथून बीई- ऑटोमोबाइल ही पदवी घेतली. त्यात सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर ‘एमबीए’ केले. दोन वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. करिअरचा आलेख उंचावता असल्याने महानगरात मोठ्या कंपनीत नोकरीची संधी दिसत होती.
परंतु घरच्या उद्योगात ते उतरले तर वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती, प्रयोग करता येईल, त्यासाठी त्यांचे तांत्रिक शिक्षण उपयोगी पडेल असे घरच्यांना वाटू लागले. अखेर कुटुंबातील विचार विनिमयानंतर रोहित यांनी घरच्याच उद्योगाचे मूल्यवर्धन व विस्तार करण्याचा निर्णय घेत त्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
भरडधान्यांवर केले लक्ष केंद्रित
देशात, जगात कोणत्या उत्पादनांना का मागणी आहे याचा रोहित यांनी अभ्यास केला. त्यातून सर्वांत पौष्टिक व आरोग्यदायी भरडधान्ये (मिलेटस) व त्या आधारित उत्पादनांना ग्राहकांकडून प्राधान्य व चांगली मागणी असल्याचे लक्षात आले. हे वर्ष होते १०१८ च्या दरम्यानचे. त्यानंतर २०२० व २०२१ या दोन वर्षांत कोविडचे मोठे संकट आले. त्यातही मिलेटसवर्गीय पदार्थांचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यातूनच आज राठी कुटुंब ‘रेडी टू ईट’ प्रकारातील ‘रोस्टेड फ्लेक्स’ उत्पादनांच्या निर्मितीत पूर्णवेळ गुंतले आहे.
उत्पादनांची विविधता
ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, कोद्रा, राळा, भगर ही मिलेटस तर गहू, बार्ली, मका या धान्यांच्या ‘रोस्टेड फ्लेक्स’ (भाजलेले पोहे) तयार केले जातात. तरुण, वयस्कर, लहानगे अशा सर्वांना पौष्टिक खाऊ म्हणून त्याचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. त्यात प्रथिने, खनिजांचे मुबलक प्रमाण आहे.
बॉक्स व त्यातील प्लॅस्टिक पाऊच स्वरूपात २०० व ५०० ग्रॅम तसेच ‘होलसेल’साठी १५ किलो पॅकिंग आहे. १०० ते ३५० रुपये प्रति किलो असे दर आहेत. उत्पादनांची खास वैशिष्ट्ये सांगायची तर पूर्ण दाण्यांपासून (होल ग्रेन्स) फ्लेक्सची निर्मिती केली आहे. कोणतेही कृत्रिम फ्लेव्हर्स, ॲडिटिव्हज, साखर वा अन्य घटकांचा त्यात अंतर्भाव नाही.
तयार केली बाजारपेठ
स्थानिक स्तरावर प्रभात तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादने पोहोचविण्याचे ध्येय ठेवून ‘न्यूट्री इनरिच’ हा उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. ऑनलाइन (ई कॉमर्स) क्षेत्रात आघाडीवरील कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
राधेश्याम व ओमप्रकाश यांचा डाळ व मका पोहे उत्पादनातील ३० वर्षांचा अनुभवही विपणनसंबंधी उपयोगात येत आहे. सध्या जळगावसह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बंगळूर, केरळ, जयपूर, अमृतसर आदी ठिकाणी उत्पादने पोहोचली आहेत. या फ्लेक्सवर पुढील प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करणाऱ्या
कंपन्यांकडून उत्पादनांना मागणी आहे. दर महिन्याला सुमारे २५ क्विंटलपर्यंत विक्री व २२ ते २५ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. उद्योग बारमाही सुरू असतो. त्यातून १० ते १५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
सहकार्यातून मिळाले बळ
सन २०२३ हे वर्ष केंद्र सरकारने भरडधान्ये वर्ष म्हणून साजरे केले. या अंतर्गत राठी यांच्या लघू उद्योगास चांगले प्रोत्साहन मिळाले. या काळात त्यांना अपेडासह कृषी विभागाने मोठी मदत केली. त्यातून दुबई, दिल्ली, तसेच मुंबई येथील मंत्रालयात आयोजित प्रदर्शनांत राठी यांना सहभाग नोंदविता आला. दिल्ली येथे विविध मंत्री, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी स्टॉलला भेट देत राठी यांच्या प्रयत्नांची दखल घेतली. त्यातून उद्योगास मोठे बळ मिळाले. जळगाव येथील तत्कालीन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनीही मोठे सहकार्य केले. त्यातून राज्यासह अन्य भागांत ही उत्पादने पोहोचण्यास मदत झाली.
उद्योग विस्तारणार
यापूर्वी दोन कोटींची गुंतवणूक उद्योगात केली होती. मात्र उत्पादनांना वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन अजून साडेतीन कोटींची गुंतवणूक करून मोठे युनिट उभारून उद्योगाचा विस्तार करण्यात येणार आहे. रोहित सतत तज्ज्ञ, प्रक्रिया तज्ज्ञ, अभ्यासक, कृषी विभाग यांच्या संपर्कात असतात. उद्योगातील ताज्या घडामोडी, आर्थिक ताळेबंद यांच्या सातत्याने नोंदी ठेवतात. मालाचा गुणवत्ता जपण्यावर कटाक्ष असतो.
रोहित राठी, ९४२१५२२९३९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.