Food Processing Industry : खाद्य निर्मिती छंदाचे झाले उद्योगात रूपांतर

Food Production Success Story : अकोला शहरातील रविनगर येथील वैशाली राजेंद्र देशमुख यांच्या खाद्य पदार्थ बनविण्याच्या आवडीने त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. उत्पादन विक्रीसाठी ‘अमृतम गृह उद्योग-निसर्ग फूड’ नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे.
Amrutam Gruh Udyog
Amrutam Gruh Udyog Agrowon
Published on
Updated on

Amrutam Gruh Udyog-Natural Food : अकोला शहरातील रविनगर भागात वैशाली देशमुख राहतात. त्यांनी गृहविज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासून त्यांना नवनवीन खाद्यपदार्थ बनविण्याची आवड होती.

हीच आवड लग्नानंतर अधिक फुलत गेली. हळूहळू वैशालीताईंनी पाककलेचे क्लास घेणे, खाद्यपदार्थ बनविण्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणे अशा माध्यमातून आपली आवड जपत गेल्या. खाद्यपदार्थ बनविण्याच्या स्पर्धांमध्ये ‘खांडोळी’ची भाजी ही विशेष करून त्यांना बक्षीस मिळवून देणारी ठरली.

कोरोनात आली संधी चालून

वैशाली यांचे पती राजेंद्र यांचा चोहोट्टा बाजार येथे मेडिकलचा व्यवसाय आहे. घरी फक्त बसून राहण्यापेक्षा वैशालीताईंनी महिलांसाठी पाककलेचा क्लास घेण्यास सुरुवात केली. साधारणपणे २०१८ पर्यंत त्यांनी क्लास घेतले.

पुढे २०१९ मध्ये ‘श्री’ या नावाने घरगुती मेस सुरू केली. त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा व्यवसाय विस्तारत असतानाच कोरोना आला. त्यामुळे नाइलाजाने मेस बंद करावी लागली. पण खाद्यपदार्थ बनविण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना.

सर्वांना कोरोनाच्या काळात पौष्टिक आहार मिळावा यासाठी घरूनच पार्सल सुविधा सुरू केली. पौष्टिक भाज्या, सलाड, सरबत आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे ज्यूस त्या बनवून देत होत्या. कोरोना काळात आवळ्यापासून विविध पदार्थ बनवून लोणचे आणि सरबत विक्री सुरू केली. येथून त्यांचे खऱ्या अर्थाने प्रक्रिया उद्योगामध्ये पदार्पण झाले. सुरवातीला आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा जॅम, कँडी तयार करून विक्री सुरू केली.

Amrutam Gruh Udyog
Food Production : गुणवत्तापूर्ण पदार्थ निर्मितीतून साधली प्रगती

कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन

या व्यवसायात अधिक निपुणता येण्याच्या उद्देशाने वैशालीताईंनी अकोला कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विभाग प्रमुख कीर्ती देशमुख यांची मदत घेतली. केव्हीकेच्या पुढाकाराने दोन प्रशिक्षणे पूर्ण केली.

अकोला जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी (फलोत्पादन) ज्योती चोरे यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. केव्हीकेने दिलेले सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योगाचे प्रशिक्षण वैशालीताईंसाठी दिशादर्शक ठरले.

शेतकऱ्यांकडून माल खरेदीवर भर

प्रक्रिया उद्योगाची सुरुवात तर केली, मात्र तयार केलेल्या पदार्थांची विक्री व मार्केटिंग करण्यात अनेक अडचणी आल्या. सुरवातीच्या काळात लोणचे उद्योगामध्ये अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागले.

कच्चा माल, पॅकिंग साहित्य, लेबल, प्रिंटिंग यासाठी बरीच धावपळ झाली. मात्र त्यावर त्यांनी पर्याय शोधत मार्ग काढला. विविध लोणचे, चटण्या, मसाले यांच्या निर्मितीसाठी लागणारा सर्व कच्च्या मालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यावर अधिक भर दिला जातो.

लिंबाची खरेदी वाडेगाव, तर कैरीची खरेदी पातूर भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते. यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या कैऱ्या, आवळे उपलब्ध होतात. त्यांची चव ही ग्राहकांना विशेष आकर्षित करणारी असल्याचे वैशालीताई सांगतात.

Amrutam Gruh Udyog
Food Grains Production : आत्मनिर्भर नव्हे आयातनिर्भर

चव करते ग्राहकांना आकर्षित

ग्राहकांना शुद्ध आणि १०० टक्के नैसर्गिक चवीचे पदार्थ देण्याचा त्यांनी निर्धार कायम टिकवल्याने ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. अकोल्यातील काही मोठ्या सुपर शॉपीमध्येही त्यांनी तयार केलेला माल विक्रीसाठी ठेवला आहे.

आता केवळ अकोलाच नव्हे तर जळगाव, मुंबई, पुण्यासह गुजरातमध्ये पदार्थ पाठविले जातात. याशिवाय काही ग्राहक विदेशातील आपल्या नातेवाइकांना वैशालीताईंनी बनविलेले चविष्ट पदार्थ पाठवितात. विविध ठिकाणच्या प्रदर्शनामध्ये स्टॉल लावून पदार्थांच्या विक्रीला प्राधान्य दिले जाते.

स्वबळावर उद्योगाचा विस्तार

‘अमृतम गृह उद्योग’च्या उभारणीपासून आजपर्यंत कोणतेही कर्ज घेतले नसून हा उद्योग स्वबळावर उभा राहिला असल्याचे वैशालीताई अभिमानाने सांगतात. तयार केलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून ग्राहकांकडून वेळोवेळी त्यांना तसे अभिप्राय सुद्धा मिळतात.

ग्राहकांची मागणी पाहता त्यांनी नुकतेच ‘निसर्ग फूड, स्नॅक्स & पार्सल’ हे प्रतिष्ठानही सुरू केले आहे. तेथून सर्व प्रकारच्या पारंपरिक खांडोळी भाजी, धिरडे भाजी, भरीत, मिरची भाजी, पावभाजी, वडापाव, मिसळपाव, खस्ता असे विविध पदार्थ दिले जातात.

हा उद्योग यशस्वी करण्यासाठी त्यांना विविध मान्यवरांचे मार्गदर्शन तर लाभते आहेच, शिवाय घरच्यांचेही पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. पती राजेंद्र देशमुख यांची प्रत्येक टप्प्यावर विशेष साथ लाभली.

मुलगा यश हा एमएस्सी-ॲग्री, तर मुलगी तन्वी ही अकरावीमध्ये शिकते आहे. या उद्योगात संपूर्ण कुटुंबांचे पाठबळ मिळत असल्याने उद्योगाचा विस्तार होत असल्याचे वैशालीताईंनी सांगितले. राहत्या घरीच उद्योगासाठी बांधकाम करून त्यात वाढ करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

‘निसर्ग फूड’ नावाने पदार्थांची विक्री

वैशाली देशमुख यांनी ‘अमृतम गृह उद्योग- निसर्ग फूड’ या नावाने आता गृहोद्योग आहे. याद्वारे लोणचे, मसाले, विविध प्रकारची सरबते तयार करून त्यांची विक्री केली जाते. आवळ्यापासून सरबत, ज्यूस, जॅम, कँडी, आवळा क्रश, गोड तसेच तिखट लोणचे बनविले जाते.

कैरी लोणचे (गोड), तिखट, कैरी छुंदा, गुळंबा, साखर आंबा, कटकी, टक्कू, मिक्स लोणचे, पन्हे, लिंबू लोणचे गोड व तिखट, लेमन क्रश, लिंबू सरबत, मिरची लोणचे, लिंबू मिरची लोणचे, लेमन चिली सॉस, सांडगी मिरची, दह्यातील मिरची, भोकर लोणचे, केर लोणचे, केर कैरी, मिक्स लोणचे, गोड करवंद लोणचे, तिखट करवंद लोणचे, लसूण लोणचे, अस्सल वऱ्हाडी मसाला, चटण्यांच्या प्रकारात शेंगदाणा चटणी, जवस चटणी, कराळे चटणी, खर्डा चटणी, कारले चटणी, मोरिंगा चटणी (शेवगा पानांची), तीळ चटणी अशी पदार्थांची विविधता असते.

वैशाली देशमुख ९५२७७६३२७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com