Grape Farming : दुष्काळात शून्यातून उभारले वैभव

Success Story of Farmer : नाशिक जिल्ह्यातील बिजोटे (ता. सटाणा) येथील एकेकाळी मजुरी केलेल्या व झोपडीत राहिलेल्या अभिमन जाधव यांच्या कुटुंबाने आज ४२ एकर शेतीचे मालक होण्यापर्यंत यश मिळवले आहे. सदैव दुष्काळी या पट्ट्यात परिश्रमपूर्वक दोन एकरांपासून १८ एकरांपर्यंत द्राक्षशेती वाढवली.
Jadhav Family
Jadhav FamilyAgrowon
Published on
Updated on

Success of Grape Farming : नाशिक जिल्ह्यातील बिजोटे (ता. सटाणा) येथील अभिमन जाधव सुमारे ३३ वर्षांपासून प्रयोगशीलतेने द्राक्षशेती करीत आहेत. त्यांच्या यशाचा प्रवास खडतर मात्र प्रेरणादायक आहे. बारावीत विज्ञान शाखेत शिकत असतानाच १९७२ मध्ये त्यांना शिक्षण सोडावे लागले. काही काळ मजुरी केली. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते भाजीपाला घेऊ लागले.

सुमारे २२ व्या वर्षी लग्न झाले. सन १९९० मध्ये भुयाणे (ता. सटाणा) येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक खंडूअण्णा शेवाळे यांच्या मार्गदर्शनातून दोन एकर द्राक्ष लागवड केली. बाग यशस्वीही केली.

पण हा भाग कायम दुष्काळी असल्याने अवघी एक एकर बाग शिल्लक राहिली. पण जिद्द, धाडस, चिकाटी, खडतर संघर्षाची तयारी, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या बळावर अभिमन द्राक्षशेतीत टिकून राहिले. त्यात घवघवीत यश संपादले.

आज त्यांचे वय ६३ आहे. त्यांची मुले देवेंद्र (थोरला) व दीपक आज शेतीचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. दीपक यांनी कृषी पदविका व दूरस्थ विद्यापीठातून उद्यानविद्या शाखेतील पदवी घेतली आहे.

Jadhav Family
Grape Farming : द्राक्षशेतीची भविष्यकालीन वाटचाल महत्त्वाची

आजची प्रगतिशील शेती

एकेकाळी ऑइल इंजिन विक्री करून शेतीला काही भांडवल उभे केले. सन १९९२ मध्ये कुटुंब विभक्त झाले. वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित आठ एकरांत भर घालत आज क्षेत्र ४२ एकरांपर्यंत नेले आहे.

सन २००० मध्ये दुष्काळात द्राक्ष बाग एक एकरवर आली. आज १८ एकरांवर त्याचा विस्तार आहे. डाळिंब १२, तर सीताफळ ४ एकर आहे. द्राक्षात बहुतांश क्षेत्र थॉम्पसन तर एक ते दोन एकरांपर्यंत अन्य वाण आहेत.

द्राक्षशेतीची वैशिष्ट्ये

वाणांची निवड

नैसर्गिक आपत्तीत कमी नुकसान, चव, आकर्षकपणा या बाबी विचारात घेऊन विविध वाणांची निवड. उदा. खालीलप्रमाणे.

थॉम्पसन- निर्यातीसाठी, व्यापारी थेट खुडे करतात.

सोनाका- दुबईसह आखाती देश व बांगलादेशात मागणी.

शरद सीडलेस- दिल्ली मार्केट.

सुधाकर- स्थानिक व निर्यातीसाठी.

रेडग्लोब - नैसर्गिक आपत्तीत ‘क्रॅकिंग’चा धोका कमी. देशांतर्गत मागणी

Jadhav Family
Grape Farming : फुलोरा ते सेटिंग अवस्थेमधील समस्येवरील उपाययोजना

सटाणा भागात आगाप म्हणजे जुलै ते सप्टेंबर गोडी छाटणीचा ‘ट्रेंड’ आहे. जाधव यांचेही तसेच नियोजन. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी दरम्यान मालाची टप्प्याटप्प्याने विक्री. त्यातून नुकसानीची जोखीम कमी केली.

मजूरटंचाईमुळे यांत्रिकीकरणावर भर. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा वापर.

जागेवर तणाची भुकटी करण्याऱ्या ट्रॅक्टरचलित ‘मल्चर’चा वापर.

जिवामृत वापरण्यासाठी स्लरीगाडा.

दरवर्षी विकत घेऊन प्रति झाड २० किलो शेणखत वापर.

केंद्रीकृत सिंचन पद्धती. एका ठिकाणाहून पाच ठिकाणी सिंचन.

एरंडी पेंड, बोनमिल, शेंगदाणा पेंड, सेंद्रिय खत, जिवाणू स्लरी आदींचा आलटून पालटून वापर.

सेंद्रिय घटक बोदावर कुजवून खतनिर्मिती.

नवीन रेड ग्लोब वाण वाढण्यासाठी शेडनेट वापर

मोबाईल ॲप्सद्वारे हवामान अभ्यासून नियोजन.

एकरी १० ते १२ टन उत्पादन. मागील दोन वर्षांत अति पावसामुळे उत्पादनात घट.

परदेशात निर्यात

द्राक्षे विविध राज्यांसह निर्यातदारांमार्फत बांगलादेश, रशिया व युरोपमध्ये निर्यात.

आगाप माल असल्याने किलोला ७०, ७५ पासून ९० ते १०० रुपयांपर्यंत दर.

सध्या काढणी हंगाम सुरू असून १२५ रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला आहे.

अधिक जोखीम अधिक दर हे सूत्र. आगाप मालास नवरात्री, लग्नसराई, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मागणी. दिवाळी, ख्रिसमस काळातही उत्पादनात सातत्य. विक्री नियोजन.

उल्लेखनीय प्रगती

अभिमन यांना वसंतराव माळी (जि. सांगली), ओढा येथील प्रगतिशील शेतकरी कै. विजयलाल ब्रह्मेचा, खेडगाव (ता. दिंडोरी) येथील श्रीराम ढोकरे, शरद ढोकरे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. वडनेर भागात फिरून लांबट वाणांचे व्यवस्थापन शिकून घेतले.

इस्राईलचा दौरा जोडीने केला आहे. युरोप, चीनला भेटी दिल्या. अभिमन हे बिजोटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांना कृषी विभागाचा आदर्श शेतकरी पुरस्कार, गिरणा गौरव, पत्नी मीराबाई यांना बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून शारदाबाई पवार आदर्श महिला शेतकरी पुरस्कार, दीपक यांनाही कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे.

सुना सविता व कोमल यांचाही शेतीत मोठा हातभार आहे. कुटुंबीयांचा जीवन व आरोग्यविमा उतरविला आहे. पावसात नुकसानीचा धोका ओळखून उत्पन्नातील २० टक्के रक्कम संरक्षित करून भांडवल म्हणून बाजूला ठेवली जाते.

मिळवली कौटुंबिक समृद्धी

सन २००९ मध्ये फयान वादळ तर २०१६ मध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. काढणीवेळी द्राक्षाला तडे गेले. दरवर्षी दुष्काळ असतोच. अवकाळी पाऊस अनेकवेळा काही क्षेत्राचे नुकसान करून जातो.

पण त्याची सवय झाल्याचे दीपक सांगतात. त्यांचे वडील अभिमन यांनी द्राक्ष उत्पन्नातून काटकसर करीत योग्य गुंतवणूक केली. दोन मुले व एका मुलीचे लग्न केले. ३४ एकर शेती खरेदी केली. दहा किलोमीटरवर असलेल्या नदीजवळ जागा घेऊन विहीर खोदून पाइपलाइन केली.

दीड एकरात १.७५ कोटी लिटर, तर अर्धा एकरांत ५० लाख लिटर क्षमता अशी शेततळी उभारली. पूर्वी छोट्या झोपडीत कुटुंब राहायचे. आज बंगला, गाडी आहे. हे सारे वैभव स्वहिमतीवर मिळवले.

अभिमन जाधव ९४२१५०००६८, दीपक जाधव ९९२१६२९९४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com