शुभांगी वाटाणे
Making compost from Nirmalya : आपल्याकडे विविध सणांमध्ये सजावटीसाठी तसेच पूजेसाठी पाने, फुले आणि वनस्पतींचे इतर भाग अर्पण केले जातात. विशेषतः श्रावण महिन्यात आणि हरितालिका, गौरी-गणपतीमध्ये घरामध्ये बरेच निर्माल्य गोळा होते. पूजा केल्यानंतर दररोज नवीन निर्माल्य साठत जाते. या निर्माल्याची विल्हेवाट योग्यरीत्या कशी लावावी, अशा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. काही वेळा नद्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये निर्माल्य सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषणात वाढ होते. शहरांतील गटारांचे पाणी नद्या, नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे हे पाणी आधीच दूषित झालेले असते. अशा पाण्यात निर्माल्य सोडल्यास त्याच्या पावित्र्याचा अवमान होतो. शिवाय प्रदूषणातही भर पडते. अशावेळी हे निर्माल्य साठवून त्याची योग्यप्रकारे वर्गीकरण करून त्याचा कंपोस्ट निर्मितीसाठी वापर करता येतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने निर्माल्यापासून कंपोस्ट निर्मिती करता येते. या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पर्यावरणास फायद्याचे ठरेल.
निर्माल्य म्हणजे काय?
विविध सणांच्या कालावधीत देवदेवतांना फुले, हार, बेलपत्र, दूर्वा, रुई इत्यादी वनस्पती अर्पण केल्या जातात. दररोज पूजेवेळी ही आदल्या दिवशीची पाने, फुले, वनस्पती काढून त्या जागी नवीन पाने, फुले अर्पण केले जातात. याला निर्माल्य म्हणतात. असे दररोज गोळा झालेले निर्माल्य साठवून ठेवावे. याशिवाय सजावटीसाठी विविध प्रकारचे थर्माकोल, प्लॅस्टिक इत्यादी साहित्य, तसेच कृत्रिम फुले, मणी, तोरण इत्यादींचा वापर केला जातो.
निर्माल्याचे वर्गीकरण ः
पूजेसाठी वापरलेली पाने, फुले, वनस्पती तसेच सजावटीचे कृत्रिम साहित्य निर्माल्यामध्ये एकत्रित करून टाकून दिले जाते. हे निर्माल्य नदी किंवा वाहते पाणी असलेल्या ठिकाणी टाकले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होण्याचा धोका असतो. त्यासाठी निर्माल्याच्या साहित्याचे व्यवस्थित वर्गीकरण करणे आवश्यक आहे.
- वर्गीकरण करताना निर्माल्यातील कृत्रिम आणि अनैसर्गिक वस्तू आणि इतर साहित्य यांचे वेगळे वर्गीकरण करावे.
- फुलांचे वर्गीकरण करताना त्यांचा रंग आणि आकार यानुसार वेगळे वर्गीकरण करावे.
- पूजेसाठी वापरलेल्या हारांमधील पाने, धागे, चमकी आणि इतर सजावटीचे साहित्य वेगळे काढावे.
- बऱ्याच वेळा निर्माल्यामध्ये रांगोळी देखील मिसळली जाते. ती शक्य असल्यास वेगळी करावी. कारण रांगोळीमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण होण्याचा धोका अधिक असतो.
कंपोस्ट निर्मिती ः
साहित्य ः
मातीची कुंडी किंवा प्लॅस्टिक किंवा रंगाचे डबे, विटांचे तुकडे किंवा नारळाच्या दश्या, निर्माल्य, माती, प्लॅस्टिक हातमोजे.
कृती ः
- प्रथम डबा किंवा मातीची कुंडी घ्यावी. प्लॅस्टिक किंवा रंगाचे डबे घेतल्यास त्यांच्या बुडाशी बारीक छिद्र पाडून घ्यावे. मातीच्या कुंडीला छिद्र पाडण्याची गरज नाही. त्यानंतर कुंडीच्या बुडाशी दोन ते तीन इंच विटांचे तुकडे किंवा नारळाच्या दश्या (शेंड्या) टाकून घ्याव्यात.
- त्यावर गोळा केलेले निर्माल्य पसरवून त्याचा २ ते ३ इंचांचा थर द्यावा. नंतर त्यावर मातीचा थर आणि पुन्हा निर्माल्याचा थर द्यावा.
- अशाप्रकारे कुंडीच्या आकाराप्रमाणे व जमा केलेल्या निर्माल्याचे एकावर एक थर द्यावेत. शेवटचा थर हा मातीचा असावा.
- त्यानंतर कुजण्याची प्रक्रिया होण्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे.
- भरून घेतलेली कुंडी एक ते सव्वा महिना एखाद्या कोपऱ्यात किंवा इतर ठिकाणी तशीच ठेवून द्यावी.
- साधारण एक ते सव्वा महिन्याने त्या कुंडीत उत्तम दर्जाचे कंपोस्ट
खत तयार होते.
- काही वेळा खत तयार होताना कुंडीवर लहान चिलटे किंवा मुंग्या दिसून येतात. त्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद आणि थोडी हिंग पावडर टाकून चांगले एकत्रित करून कुंडीवरील मिश्रणावर शिंपडावे.
वापर ः
तयार झालेल्या खताचा वापर परसबागेत, तसेच घरामध्ये ठेवलेली फुलझाडे, शोभिवंत झाडांच्या कुंड्यांत करता येतो. त्यामुळे या वनस्पतींचे चांगले पोषण होण्यास मदत होते.
इतर उपयोग ः
- एका रंगाची फुले घेऊन त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून वाळवून घ्याव्यात. त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर होळीच्या वेळी रंग म्हणून वापरता येते.
- काही मोठ्या फुलांमध्ये बिया असतात. त्या बिया वेगळ्या काढून फुलझाडांची रोपे तयार करता येतात.
- निर्माल्यामधून वेगळे केलेली प्लॅस्टिक फुले, मणी, चमकी इत्यादींचा वापर घरातील सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी करता येतो.
----------------
- शुभांगी वाटाणे, ९९२१३२९०९४
(प्रमुख, गृहविज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.