Rabi Maize Farming : एकरी ६० क्विंटलपर्यंत गाठली रब्बी मका उत्पादकता

Maize Production : खैरा (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथील रवींद्र मापारी यांनी रब्बी मका या पिकात मास्टरी मिळवली आहे. विविध वाणांचे प्रयोग, पट्टा पद्धत, खते व पाणी यांचे काटेकोर नियोजन करून त्यांनी लागवड व्यवस्थापन चोख ठेवले आहे.
Ravindra Mapari and his Family
Ravindra Mapari and his FamilyAgrowon
Published on
Updated on

Farming Success Story : विदर्भात बुलडाणा जिल्हयात रब्बी हंगामात सुमारे १५ ते २० हजार हेक्टरदरम्यान मक्याची लागवड केली जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा, गहू या पिकांना मक्याचा हुकमी पर्याय मिळाला आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील शेतकरी चांगल्या व्यवस्थापनाच्या साह्याने एकरी उत्पादकता वाढवण्यात यशस्वी झालेले आहेत. यामध्ये खैरा (ता. नांदुरा) येथील रवींद्र बाबूराव मापारी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मका पिकातील मास्टर झालेल्या मापारी यांनी सातत्याने एकरी ५५ क्विंटलच्या पुढे उत्पादनात सातत्य जपले आहे. त्यांचे पीक व्यवस्थापन जरूर अभ्यासण्याजोगे आहे.

मापारी यांचे मका व्यवस्थापन

मापारी पाच वर्षांपासून रब्बी हंगामात मका घेतात. सुमारे अडीच एकरांत खरिपात कापूस असतो. त्याची काढणी झाल्यानंतर त्याच क्षेत्रात त्यांचे मका लागवडीचे नियोजन सुरू होते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम होते. लागवड पट्टा पद्धतीने असते. यात दोन तासांतील (ओळ) अंतर दीड फूट, त्यानंतर अडीच फूट मोकळे अंतर व त्यानंतर पुन्हा दीड फूट अंतर व त्यात लागवड अशी पद्धत ते वापरतात. दोन रोपांतील अंतर नऊ इंच ठेवतात. सरी काढून झाल्यानंतर डीएपी एकरी दोन बॅग्जचा वापर करून टोकण यंत्राद्वारे लागवड होते. त्यामुळे पेरणीच्या मजुरीसाठीचा खर्च कमी होतो.

Ravindra Mapari and his Family
Maize Farming : मराठवाडा झाला मक्याचे ‘हब’

वाण निवड

मापारी सातत्याने विविध खासगी कंपन्यांचे विविध वाण वापरून पाहतात. त्यामुळे प्रत्येकाची उत्पादनक्षमता अजमावून पाहता येते. ज्या कणसाची बिट्टी बारीक त्याला अधिक दाणे लागतात असा त्यांचा अनुभव आहे. सुमारे चार ते साडेचार महिन्यांत पक्व होणाऱ्या वाणाला पसंती असते.

खत व्यवस्थापन

योग्य रासायनिक खते व पाणी व्यवस्थापनाच्या आधारे मका पीक चांगले येऊ शकते असा मापारी यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. लागवडीपूर्वी डीएपीचा वापर झाल्यानंतर पुढील खतमात्रा १५ ते २० दिवसांनी १०.२६.२६ अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची राहते. सुमारे ४० दिवसांनी ०.५२.३४ या खताचा वापर होतो. पीक ५० दिवसांचे झाल्यानंतर युरिया व झिंक यांचा वापर होतो. वाणाच्या वैशिष्ट्यांनुसार, अर्थात त्याची जशी वाढ असेल तर त्यानुसार नत्राचा वापर अवलंबून असतो. सुमारे ६० ते ६५ दिवसांनी ०-०-५० या खताचा वापर होतो. तुरे येण्यास सुरवात झाल्यानंतर एकरी अर्धा किलो याप्रमाणे बोरॉन देण्यात येते.

सिंचन व्यवस्था

मक्यासाठी सिंचनाच्या सुविधा तयार केल्या आहेत. लागवड झाल्यानंतर पहिले एक ते दोन पाणी हे स्प्रिंकलरच्या माध्यमातून देण्यात येते. त्यानंतर ठिबकद्वारे गरजेनुसार पुढील पाणी दिले जाते. विद्राव्य खतेही ठिबकद्वारेच दिली जातात. मक्यामध्ये तणाची अधिक समस्या असते. त्यासाठी टोकणीनंतर १५ दिवसांनी उगवणपश्‍चात तणनाशकाचा वापर होतो. किडी किंवा अळीचा प्रादुर्भाव पाहून गरजेनुसार तीनपर्यंत फवारण्या घेण्यात येतात.

Ravindra Mapari and his Family
Maize Farming : हंगामी मका पिकातून साधले उत्पन्नाचे गमक

उच्च उत्पादन क्षमता

मागील तीन वर्षांची उत्पादकता सांगायची तर मक्याचे एकरी ५५, ५७ ते ६० क्विंटलपर्यंत उत्पादन मापारी यांना मिळाले आहे. एकरी उत्पादन खर्च किमान ३५ हजारांपर्यंत असतो. यंदा प्रति क्विंटल सुमारे दोन हजार, मागील वर्षी १७२० रुपये व त्यामागील वर्षी २१७५ रुपये असा दर मिळाला आहे. मका काढणीनंतर कोणतेही पीक उन्हाळ्यात न घेता जमिनीला विश्रांती देऊन थेट खरिपात कापूस लागवड केली जाते.

होय! एकरी ६० क्विंटल उत्पादन शक्य...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे म्हणाले, की मका हे असे पीक आहे की ज्या प्रकारे पीक व्यवस्थापन, खते- पाणी नियोजन कराल तसा प्रतिसाद हे पीक देते. उच्च उत्पादन मिळण्यासाठी अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. यात मका पीक घेतलेल्या शेतात जमिनीस विश्रांती देणे, पीक फेरपालट, वातावरण, जमीन व वाण या बाबीही कारणीभूत ठरतात. त्यातून एकरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन रब्बी हंगामात मिळू शकते.आमच्याकडील चाचणी प्रक्षेत्रातही एकरी ५० ते ५५ क्विंटल उत्पादन आम्हाला अनुभवण्यास आले आहे. सुधारित तंत्राचा वापर करून मक्याची उत्पादकता वाढविण्यास खूप वाव आहे.लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थयुक्त आणि जलधारणशक्ती असलेली जमीन चांगली मानली जाते. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी १० ते १२ टन शेणखत जमिनीत मिसळणे फायदेशीर ठरते. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. पेरणी १५ ऑक्टोबर ते १० नोहेंबर या काळात व टोकण पद्धतीने करावी.

डॉ. दिनेश कानवडे ८८३०६३६८७८

शेतीतूनच मिळाले वैभव

रवींद्र यांनी शेतीतील उत्पन्नातूनच वैभव उभे केले आहे. शेती उत्पादकतेच्या जोरावरच घर बांधकाम केले. दुचाकी घेतली. मुली नम्रता, अमृता तसेच मुलगा शिवराज यांना चांगले शिक्षण देण्यात येत आहे. रवींद्र तंटामुक्ती समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. पत्नी हर्ष यांनी २०१५ ते २०१८ या काळात अडीच वर्षे सरपंचपद भूषविले आहे. रवींद्र यांनी कपाशी व सोयाबीनचेही १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.

रवींद्र मापारी ९४२२३५१०५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com