Maize Farming : मराठवाडा झाला मक्याचे ‘हब’

Silage Production : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांची मका पिकाचे ‘हब’ अशी ओळख आहे. त्यामुळे मक्याची बाजारपेठही वधारली आहे. सुधारित लागवड पद्धतींचा वापर करण्यासह धान्य उत्पादनासोबत चाराटंचाई लक्षात घेऊन मुरघास निर्मितीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
Silage Produtcion
Silage ProdutcionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : भारतातील आणि महाराष्ट्रातील देखील मका हे महत्त्वाचे पीक आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मका संशोधन प्रकल्प व केंद्रेही आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोटनांद्रा डोईफोडा येथे या पिकासाठी संशोधन केंद्र मंजूर असून त्याला मूर्तरूप येणे प्रलंबित आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही (परभणी) मका पिकावर काम सुरू आहे.

मराठवाड्यातील मक्याचे हब

मराठवाड्यातील अलीकडील वर्षांचा विचार केल्यास मक्याखालील क्षेत्र तीन लाख हेक्टरच्या आसपास आहे. त्यातही छ. संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत तर जालना जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपासून ६० हजार हेक्टरपर्यंत त्याचे क्षेत्र आहे.

त्यामुळे हे दोन जिल्हे मराठवाड्यातील मका उत्पादनाचे हब मानले जातात. सन २०२२ २३ मध्ये एक जिल्हा- एक वाण म्हणून छ. संभाजी नगर जिल्ह्यासाठी मका पीक निश्चित करण्यात आले आहे. कन्नड, फुलंब्री, खुलताबादमध्ये मधुमक्याचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.

Silage Produtcion
Silage Making: मुरघास कसा तयार करावा?

लागवड पद्धती

मराठवाड्यात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात मका घेतला जातो. ‘बीबीएफ’ तंत्र, टोकण, गादीवाफा, जोडओळ अशा विविध पद्धतीचे लागवडीचे तंत्र शेतकरी अवलंबतात. उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर वाढविला आहे. भारी जमिनीत दोन ओळीत ७५ सेंटीमीटर, मध्यम जमिनीत ६० सेंटीमीटर तर दोन रोपांत २० सेंटीमीटर ठेवून शेतकरी लागवड करतात. भारी जमिनीत दीड फुटांपर्यंत अंतर ठेवणारे मराठवाड्यातील शेतकरी हलक्या जमिनीत मात्र अंतर कमी ठेवताना दिसतात. आले पिकातही हे आंतरपीक काही शेतकरी घेतात. जोडओळ पद्धतीत लॅटरलचा खर्च कमी येतो.

तिन्ही हंगामात मका घेतला जात असला तरी फेरपालटीचे प्रमाण तसे कमी आहे. शेणखताचा वापरही म्हणावा तेवढा नाही. खादाड पीक असल्याने जमिनीचा कस कमी झाला असून पूर्वीची उत्पादकता आता मिळत नाही. सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता देखील उत्पादनातील अडथळा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोडा खुर्द (ता. सिल्लोड) येथील रामेश्वर पंडित यांचा प्रातिनिधीक अनुभव सांगायचा तर त्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

Silage Produtcion
Silage Making : तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचे

मुरघासाकडे वाढला कल

अलीकडील काळातील चाराटंचाईची समस्या लक्षात घेता मुरघास निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दुभती तसेच पाचपेक्षा अधिक जनावरे असलेल्या शेतकऱ्यांकडून मुरघासाला प्रथम पसंती आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही मुरघास निर्मिती सुरू केली आहे. काही कुट्टी यंत्रचालक थेट बांधावर जाऊन कंस काढलेल्या किंवा कंसासहित मक्याची कुट्टी करून देण्याचा व्यवसाय करतात. पोल्ट्रीसाठी तर मका मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून जातो. थेट उभे पीक किंवा प्लॉट विकत घेऊनही शेतकरी मुरघास तयार करतात. त्यातून क्षेत्र विस्तारत चालल्याचे किंवा टिकून असल्याचे चित्र आहे.

मक्याची बाजारपेठ

मक्याची बाजारपेठ म्हणून सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. यासह अंभई, अंधारी, भराडी, अजिंठा, शिवना, सोयगाव आदी उपबाजार मिळून हंगामात प्रति दिन ७ हजार ते ८ हजार क्विंटल आवक असते. हंगाम नसण्याच्या काळात ती १२०० ते १५०० क्विंटल असते. संपूर्ण हंगामात दीड लाख क्विंटलपर्यंत आवक व खरेदी होते. बाजार समितीत १२०० परवानाधारक व्यापारी आहेत.

मागील वर्षी संपूर्ण हंगामात सरासरी २००० ते २१०० रुपये तर यंदा आजपर्यंतच्या काळात २२०० ते २३०० प्रति क्विंटलचा दर मक्याला मिळतो आहे. मोठ्या गावातूनही ठोक व किरकोळ व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. शिरपूर, सुपा येथे मक्याला मोठी मागणी आहे. प्रतवारीनुसार दर ठरतात. सुरवातीच्या ओल्या मक्यास १८०० ते १९०० प्रति क्विंटल तर उत्तम प्रतवारी असलेल्या मक्यास अडीच हजार रुपये दर मिळतो.

शेतकऱ्यांनी जोड म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्वीकारला आहे. परंतु बारमाही हिरवा चारा उपलब्ध होत नाही. आम्ही तीन-चार वर्षांपासून मुरघास उत्पादन करून नाशिक, मुंबई, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी मागणीनुसार पुरवठा करतो.
योगेश चौधरी, ९६७३५९९१४४ पेंडगाव आकाश ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी पेंडगाव (आमठाणा) ता. सिल्लोड.
सुरवातीला घरच्या पशुधनासाठी मुरघास तयार करायचो. आता हा आमचा उद्योगच बनला आहे. दरवर्षी पंधराशेपर्यंत शेतकऱ्यांना मुरघास पुरवितो. तयार करून देण्याच्या दृष्टीने ८०० रुपये प्रति टन तर तयार मुरघास हवा असल्यास चारहजार रुपये प्रति टनाने विक्री करतो. त्यासाठी लागणारा मका कंसासह शेतकऱ्यांकडून २५०० रुपये प्रति टन दराने घेतो. या उद्योगातून ५० पेक्षा जास्त मजुरांना रोजगार मिळाला आहे.
अनिल काळे- ७५८८०४५१९६ पाल, ता. फुलंब्री.
भविष्यातील पीक म्हणून मक्याची ओळख आहे. धान्याबरोबरच त्याचा औद्योगिक वापरही वाढला आहे उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधित व संकरित वाण निर्मिती तसेच प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
डॉ. एस बी. पवार- ९४२२१७८९८२ सहयोगी संचालक संशोधन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,छ. संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com