Agriculture Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुमारे १२०० लोकवस्तीचे चितळवेढे हे प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. एकेकाळी निळवंडे धरण बांधण्यासाठी हे गाव सरकारकडून संपादित करण्यात आले होते.
त्यामुळे गाव स्थलांतरित होणार हे निश्चित झाले. आंदोलनाचा पवित्रा घेत ग्रामस्थांनी संघर्ष सुरू केला. अशावेळी गावातील किसन नाना आरोटे, रामभाऊ धोंडीबा आरोटे यांचे कुशल नेतृत्व व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून धरणाची जागा बदलण्यात यश आले.
विकासाला मिळाली चालना
पूर्वी भात, बाजरी भुईमूग, गहू ही मुख्य पिके गावात व्हायची. काळानुसार बदलत गावातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केले. आता गाव पंचक्रोशीत आले, पपई, पेरू, टरबूज, खरबूज, आंबा अशी विविधता दिसून येते. फुलशेतीकडे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचा कल वाढला आहे.चितळवेढे गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
इगतपुरी येथील हभप माधव महाराज घुले यांचा आध्यात्मिक पगडा गावात आहे त्यामुळे भजन, कीर्तन सप्ताह, दिंडी परंपरा या बाबी गावात टिकून आहेत. गावातील शेतकऱ्यांना हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या आदर्श गावांमध्ये सहलीचा लाभ मिळाला. त्यातून जलसंधारणाचे महत्त्व, कमी पाण्यात फळपिके घेणे, आदर्श गाव संकल्पना याबाबत ग्रामस्थ जागरूक झाले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शेतरस्ते, विहिरी, शेततळी आदींच्या माध्यमातून जीवनमान उंचावू लागले. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. आज गावातील शेतकऱ्यांनी सुसज्ज घरे बांधली असून दारात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आदी वाहने दिसून येतात. शेतीतील उत्पन्नातून मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य झाले आहे.
शेतीतून समृद्धी
गावातील तुकाराम काशिनाथ आरोटे हे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांचा प्रातिनिधिक अनुभव सांगायचा तर त्यांची गावात पाच एकर व बाजूच्या गावात सहा एकर शेती आहे. आले, कांदा,ऊस व भाजीपाला ही त्यांची मुख्य पिके आहेत. आले शेतीत आरोटे यांनी हातखंडा तयार केला आहे. जूनमध्ये लागवड केल्यानंतर डिसेंबरनंतर काढणीचा काळ सुरू होतो. एकरी त्यांना १६ ते १८ टनांपर्यंत उत्पादन मिळते.
ते सांगतात की आमच्या भागात वीस किलोच्या पोत्यातून व्यापारी जागेवरून आले खरेदी करतो. मागील वर्षी किलोला १०० ते ११० रुपये दर मिळाला होता. अगदी किलोला ४० रुपये दर मिळाला तरी आठ ते नऊ महिन्यात सुमारे चार लाखांपर्यंतचे उत्पन्न हाती येते. जे उसापेक्षा निश्चित अधिक असते.
फुलशेतीतूनही प्रगती
तुकाराम झेंडूची शेतीही करतात. जूनमध्ये लागवड होते. साधारण ३५ ते ४० दिवसांनी उत्पादन सुरू होते. पुढे ते ४० दिवस चालते. ते सांगतात की माझ्या ५० ते ५५ गुंठ्यांत सुमारे १२ हजार रोपे असतात. प्रत्येक झाडाने सव्वा किलो उत्पादन दिले तरी १४ ते १५ टनांचे उत्पादन मिळते. किलोला ३० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. अशा प्रकारे आले, फुलशेतीतून आमची शेती समृद्ध झाली आहे. तुकाराम सांगतात, की माझी मुलगी आयटीचे तर मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. शेतीतूनच बंगला बांधला आहे. कुटुंब स्थिरस्थावर केले आहे.
फळबागा ठरल्या फायदेशीर
गावातील प्रयोगशील शेतकरी सुनील मोहटे म्हणतात, की खडकाळ माळरान असलेल्या सहा एकर क्षेत्रात पेरू, सीताफळ, आंबा, नारळ, सफरचंद, केळी, पपई, जांभूळ आदींची लागवड मी केली आहे. सध्या एकरी चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. ऊस शेती परवडत नाही. हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने क्षेत्र अधिक काळासाठी गुंतून पडते. फळबागेत मात्र वर्षभरातील विविध हंगामांत उत्पादन मिळत राहते. त्यात आंतरपीक घेता येते. पाण्याच्या शाश्वतीसाठी शेततळेही उभारले आहे. सौरऊर्जेचा उपयोग करून ठिबकद्वारे फळांना पाणी देण्याची सोय केली आहे.
डेरे यांचा अनुभव
गावातील प्रयोगशील शेतकरी व निसर्ग अभ्यासक रमाकांत डेरे यांच्याकडे विविध पिके आहेत. शिवाय बांधावर चंदनाच्या झाडांचा प्रयोग केला आहे. त्यांच्या शेताच्या चहूबाजूंनी जंगलच आहे. ते म्हणतात, की सन १९७७ च्या सुमारास उजाड असलेले चितळवेढे गाव आज आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहे पूर्वी धरणासाठी गावाची निवड झाल्याने गावातील जमिनींवर शासकीय शेरा आला होता. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेना.
अखेर न्यायालयीन लढाई लढून ग्रामस्थांनी ती जिंकली. त्यानंतर शेतीतील पुढील वाटा मोकळ्या झाल्या. पाइपलाइन आली. आज विविध फळपिकांच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध झाला आहे. आज गावात अनेक शेतकऱ्यांकडे दोन हजारांच्या संख्येने फळझाडे दिसून येतात. विशेषतः तरुण पिढी शेतीत असल्याने प्रगतीला चालना मिळाली आहे. शेतकरी शेतीमालाची थेट विक्री करतात. व्यापारी देखील बांधावर येऊन खरेदी करतात.
तुकाराम काशिनाथ आरोटे- ८८८८४०९७७१
रमाकांत डेरे - ७५८८२९६५५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.