Crop Pattern : मुरमाड जमिनीत आदर्श पीक पद्धती

Agriculture Management : बहुतांश शेती मुरमाड, हलकी असल्याने हंगामी- मिश्र पिके व फळे-भाजीपाला पीक पद्धतीची उत्तम घडी बसवून वर्षभर उत्पन्नाचे चक्र ठेवले आहे.
Agriculture Management
Agriculture ManagementAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील नायदेवी हे सुमारे १५०० लोकवस्तीचे छोटे गाव आहे.येथे युवा शेतकरी अर्जुन दामोदर पाटेखेडे यांची ३५ एकर शेती आहे. वडिलांच्या निधनानंतर बीए द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आज आठ वर्षांपर्यंत त्यांना शेतीचा अनुभव तयार झाला आहे. आपल्या ३५ एकरांपैकी २५ एकर शेती एकदम मुरमाड, हलक्या प्रकारातील आहे. उर्वरित १० एकर बऱ्यापैकी आहे.

पीक पद्धतीची हुशारीने निवड

अर्जून सांगतात, की आमची बहुतांश जमीन मुरमाड आहे. एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले, तर एकाचवेळी पाणी देणे शक्य होत नाही. क्षेत्रही जास्त आहे व मनुष्यबळ मात्र कमी आहे. तणही मोट्या प्रमाणात फोफावते. त्याच वेळी वर्षभर उत्पन्नाचे चक्र मात्र सुरू राहिले पाहिजे व दरांची जोखीमदेखील कमी केला पाहिजे असाही विचार होता. त्यातूनच वर्षभराचे ठरावीक प्लॉट तयार करून त्यात पिकांची विविधता ठेवण्याचे ठरवले.

त्यादृष्टीने हंगामी पिके, फळे-भाजीपाला पिके व मिश्र पद्धती असे नियोजन केले. आज ३५ एकरांपैकी १० एकरांत खरिपात कपाशी असते. सात ते आठ एकरांत सोयाबीन व तूर अशी मिश्र पद्धत असते. तर उर्वरित क्षेत्रात कलिंगड, त्यात मिरचीचे आंतरपीक व पपई अशा पद्धतीचा अवलंब होतो. कलिंगड व मिरचीसाठी पॉली मल्चिंगचा वापर कला जातो.

Agriculture Management
Agriculture Success Story : अल्पभूधारक देसले बंधू झाले ४५ एकरांचे मालक

तीन टप्प्यांत कलिंगड

कलिंगडाला बाजारात केव्हा काय दर मिळतो याचा अंदाज अनुभवातून आला असल्याने वर्षभरात जून, नोव्हेंबर व जानेवारी अशी तीन वेळा पॉली मल्चिंगवर कलिंगड लागवड केली जाते. यातील एखाद्या कालावधीत दर कमी असल्यास अन्य कालावधीत ते भरून काढण्याची संधी असते. एकरी १५ ते २० टनांच्या आसपास उत्पादन घेण्यात येते.

जून लागवड काळातील फळाचे दर तुलनेने अधिक म्हणजे किलोला १५ ते २२ रुपयांपर्यंत मिळतात. हिवाळ्यातही ते १४ रुपयांपर्यंत तर उन्हाळ्यात कमी म्हणजे ९ रुपयांपर्यंत मिळतात. कलिंगडात मिरचीचे आंतरपीक घेण्यात येते. त्यास किलोला ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. मिरचीचे एकरी १८ टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. अर्जून सांगतात, की यंदा अति पावसात कलिंगडाचे मोठे नुकसान झाले. परंतु मिरचीने सुमारे ६० हजारांचे उत्पन्न मिळवून दिले.

अन्य पिकांची साथ

अलीकडील काही वर्षांत सोयाबीन-तूर पद्धतीत रासायनिक खतांचा वापर जमिनीतून न करता केवळ फवारणीद्वारे केला जातो. सोयाबीनचे एकरी ८ क्विंटल, तर तुरीचे १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पपईचे यंदा चौथे वर्ष आहे. साडेतीन एकरांत लागवड आहे. किलोला १५ ते २५ रुपये कमाल दर जागेवर मिळविण्यात अर्जून यशस्वी झाले आहेत. दरवर्षी जूनमध्ये टोमॅटो घेण्यात येतो. मागील वर्षी दोन एकरांत २८०० क्रेटपर्यंत उत्पादन घेतल्याचे अर्जून सांगतात. बीटी कपाशीचे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते.

Agriculture Management
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

जमीन सुपीकतेला प्राधान्य

फायदेशीर पीकपद्धती सोबत अर्जुन यांनी शेतीची सुपीकता वाढविण्यावरही जोर दिला आहे. प्रत्येक पिकाचे अवशेष ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर करून जमिनीतच गाडून त्याचे खत तयार केले जाते. त्याचबरोबर एकूण ३५ एकरांपैकी दरवर्षी आलटून पालटून आठ ते १० एकर क्षेत्रावर मेंढ्यांचे कळप बसविण्यात येतात. या पद्धतीमुळे मुरमाड जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. पिकांना जमिनीतून हवे असलेले पोषक घटक सेंद्रिय पद्धतीने मिळू लागले आहेत.

शेतीतूनत घर मोठे केले

आज नायदेवी गाव व परिसरातील गावांमध्ये अर्जुन यांचे शेतीतील प्रयोग व त्यातून साधलेल्या उन्नतीचे दाखले दिले जातात. वेगवेगळ्या माध्यमांतून शेतीतील नवे ज्ञान मिळविण्याचा व त्याचा उपयोग करण्याचा अर्जून यांचा प्रयत्न आजही सुरू असतो. भाऊ कृष्णयोगी यांची मोठी साथ शेतीत मिळते.

शेतीतील उत्पन्नातूनच अर्जून यांना चार एकर शेती विकत घेता आली. स्वतःसह भाऊ, बहिणीचे लग्न केले. चांगले घर बांधले. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर घेतले. तीन कृषिपंप बसवले. स्प्रिंकलरचे चार संच घेतले. सुमारे बारा एकरांत ठिबक सिंचन केले. वर्षाला या शेतीतून काही लाख रुपयांपर्यंतचा नफा आता पाटेखेडे कुटुंब मिळवू लागले आहे.

जलसिंचनाच्या कामांची साथ : पाटेखेडे यांच्या शेताजवळ तलाव आहे. परिसरात झालेल्या जलसंधारण कामांचा त्यामुळे सेतीला मोठा फायदा होत आहे. नाल्याचे खोलीकरण, ठिकठिकाणी बंधारे झाल्याने पावसाचा एक थेंबही वाहून जात नाही. दरवर्षी पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे भूजल पातळी चांगली आहे.

अर्जुन पाटेखेडे ८८८८४८२७४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com