Organic Milk Production : आरोग्यदायी सेंद्रिय दूध उत्पादन आणि थेट विक्रीचा यशस्वी प्रयोग

माळीचिंचोरे (ता. नेवासा) येथील बाबासाहेब व नरेंद्र या कदम बंधुंच्या एकत्रित परिवाराने दुग्ध व्यवसायाद्वारे आरोग्यदायी सेंद्रिय दूध उत्पादनाच्या निर्मितीवर भर दिला आहे. दररोज सुमारे २०० लिटरपर्यंत संकलित होणाऱ्या दुधाला पुणे येथील स्वविक्री केंद्रातून बाजारपेठ दिली आहे. जिरॅनियमची शेती, तेलनिर्मिती, कंपोस्ट खत आदी उपक्रमांतून शेतीचाही चांगला विकास साधला आहे.
Organic Milk Production
Organic Milk ProductionAgrowon

Success Story : नगर- औरंगाबाद राज्य मार्गावर नेवासा फाट्याजवळ माळीचिंचोरे (ता. नेवासा) हे गाव आहे. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने शेती सधन. गावातील शंकरराव कदम हे भागातील जुन्या काळात नावाजलेले वकील. त्यांना बाबासाहेब व नरेंद्र हे दोघे मुलगे.

सत्तर एकर संयुक्त शेती (Organic Farming). बाबासाहेब एमएस्सी (ॲग्री), तर नरेंद्र एम.कॉम.पर्यंत शिक्षण झालेले. नाशिक व मुंबईत बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक पदी असलेल्या बाबासाहेबांनी २०१५ मध्ये नोकरी सोडली. आज ते पूर्णवेळ दुग्धव्यवसाय (dairy business) व शेतीत कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी अस्मिता पुण्यात खासगी बॅंकेत कार्यरत आहेत.

बाबासाहेबांना वडील शंकरराव, आई नंदाबाई, बंधू नरेंद्र व त्यांची पत्नी धनश्री यांची शेतीत समर्थ साथ मिळते. सामाजित कार्यात सतत अग्रेसर आजोबा स्व. पंढरीनाथ कदम मुख्याध्यापक, तर आजी स्व. कुसुमबाई कदम प्राथमिक शिक्षिका अशी कदम कुटुंबाची शैक्षणिक पार्श्‍वभूमी आहे.

दुग्ध व्यवसायास चालना

बाबासाहेबांनी आठ वर्षांपासून शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याला सुरुवात केली. त्यांच्या घरी आजोबांच्या बहिणीने देशी गाय भेट दिली होती. हाच धागा पकडून त्यांनी दुग्ध व्यवसायाला चालना दिली.

सन २०१६ मध्ये लोणी बाजारातून १० एचएफ गायी, २०१८ मध्ये वेगवेगळ्या भागांतून आठ गीर गायी, तर २०२० मध्ये हरियाना येथून १० म्हशी व दोन देशी गायी आणल्या.

सध्या सुमारे १३ म्हशी, आठ देशी व ९ संकरित गायी आहेत. दररोज एकूण मिळून २०० लिटर, तर कमाल ३०० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

Organic Milk Production
Dairy Business : दुग्ध व्यवसाय आहे प्रगतीचा राजमार्ग

दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन

-शेती व दुग्ध व्‍यवस्थापनासाठी दररोज वीस ते पंचवीस मजूर कामाला असतात.

-पहाटे चारला कामाला सुरुवात होते. आहार व चारा व्यवस्थापनात सेंद्रिय घटकांचा वापर केला आहे.

-चारा पिकांतही रासायनिक निविष्ठांचा वापर केला जात नाही.

-गाईसाठी सहा गुंठ्यांवर मुक्तसंचार गोठा तयार केला आहे. दर सहा महिन्यांनी एकदा शेणाची उचल होते.

-दरवर्षी पन्नास ते साठ टनांपर्यंत मुरघास निर्मिती होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात ही प्रक्रिया केली जाते.

पुण्यातून दुधाची थेट विक्री

आपल्या आरोग्यदायी दुधाला पुणे येथे बाजारपेठ उपलब्ध केली आहे. त्यासाठी धानोरी-लोहगाव येथे आउटलेट सुरू केले आहे. अर्धा व एक लिटर पाऊच पॅकिंगमधून खासगी वाहनाने दररोज पुण्याला दूध पाठविले जाते.

ऑरगॅनिक फार्म या नावाचे पॅकिंग असलेले तीन रंगांचे पाऊच तयार केले आहेत. देशी गायीच्या दुधासाठी हिरवा, संकरित गाईसाठी लाल व म्हशीच्या दुधासाठी जांभळा असे हे प्रकार आहेत.

देशी गाईच्या दुधाची ८२ रुपये, संकरित गायीच्या दुधाची ६४ रुपये, तर म्हशीच्या दुधाची ७२ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. पुणे भागातील निवासी सोसायट्यांमध्ये फिरून सुरुवातीला आरोग्यदायी दुधाचे ‘प्रमोशन’ व त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागले. त्यासाठी व्हॉट्‍सॲप व माहितिपत्रकांचा आधार घ्यावा लागला.

काही सोसायट्यांनी शुल्क घेऊन आपल्या जागेत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिले. शिल्लक दुधापासून पनीर, खवा, पनीर व पारंपारिक पद्धतीने तूप तयार केले जाते. देशी गाईच्या तुपाला २८०० रुपये, तर संकरित गायीच्या तुपाला १३०० रुपये प्रति किलो दर मिळतो.

दुग्ध व्यवसायासाठी बँक ऑफ बडोदाने ४० लाखांचे कर्ज दिले आहे. कृषी विभागातील पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रकिया उद्योगासाठी १० लाखांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

शेतीतील प्रयोग

-सध्या बारा एकरांवर जिरॅनियम शेती. एकूण क्षेत्रातून वर्षातून सुमारे ४०० लिटरपर्यंत तेल उपलब्ध होते. मुंबई येथील सुगंधी तेल कंपनीला साडेअकरा हजार रुपये प्रति लिटर दराने अलीकडेच विक्री केली आहे.

-जिरॅनियम पाल्यात शेणखत मिसळून वर्षाला सहाशे टनांच्या आसपास कंपोस्ट खत निर्मिती. त्यातून रासायनिक खतांच्या वापरात बचत.

-३५ एकरांवर ऊस, पाच एकर केळी व एक एकर आंबा. बेबी कॉर्नही घेण्यास सुरुवात. एकरी सहा टन कणसे व १५ टन चारा उपलब्ध होत आहे. मुरघासासाठी त्याचा फायदा होत आहे. यंदा १० एकरांवर मका.

-वीस वर्षांपासून ठिबकचा पूर्ण क्षेत्रावर वापर. प्रत्येकी एक एकरांत दोन कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी. त्याच्या भिंतीलगत आंब्याची झाडे लावल्याने तलावाच्या मातीची धूप थांबण्याला मदत होत आहे. तालुका कृषी अधिकारी श्री. डमाळे, कृषी सहायक पी. आर. कोपनर यांचे मार्गदर्शन होते.

Organic Milk Production
Cow Milk : गायीच्या दुधातील जैवरासायनिक घटकांचे महत्त्व

कंपोस्ट खत निर्मिती

साठ टक्के शेणखत, वीस टक्के गोमुत्रासह शेळ्यांची लेंडी, कोंबडी खत व कडुनिंबाचा पाला यांच्या पासून ‘बेस्टग्रोवर’ कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. शेळ्या, कोंबड्याचेही पालन होत असल्याने ही निर्मिती शक्य होते.

पुण्यातील आउटलेटमधून त्याची ९० रुपये प्रति किलो दराने १०० किलोहून अधिक विक्री होते. सोबत विविध डाळी, पीठ, गहू, त्याचे व तांदळाचे पीठ आदींचीही विक्री होते.

बाबासाहेब कदम, ९३०९११३२४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com