Dairy Business : दुग्ध व्यवसाय आहे प्रगतीचा राजमार्ग

देशाच्या एकूण उत्पादनात चार टक्के तर शेतीच्या उत्पादनात २६ टक्के भर टाकणाऱ्या दुग्ध व्यवसायाकडे शासन-प्रशासनाकडून पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिले जात नाही. देशात हा व्यवसाय नफ्यात आणायचा असेल, तर सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

डॉ. भास्कर गायकवाड

शेतीच्या अनेक जोडधंद्यांपैकी सर्वांत जुना आणि शाश्‍वत जोडधंदा म्हणजे पशुसंवर्धन (animal husbandry). आपल्या पूर्वजांपासूनचा हा पारंपरिक व्यवसाय. भूमाता आणि गोमातेचे संवर्धन करणाऱ्‍या भूमिपुत्राला त्यांनी कधीही अडचणीत आणले नाही.

शेतकऱ्‍यांची या एकत्रित व्यवसायामुळे भरभराटच झालेली आहे. गोमाता आणि भूमाता ‍या शेतकऱ्यांच्या दोन्ही माता- दोघी सख्ख्या बहिणी. त्या एकमेकींशिवाय राहूच शकत नाहीत. निसर्गाने त्यांना एका चांगल्या चक्रामध्ये बसविलेले असूनही आपण मात्र त्यांची ताटातूट करतो.

भूमाता गोमातेच्या पोषणासाठी चारा तयार करते तर गोमाता भूमातेच्या पोषणासाठी शेण- गोमूत्रासारखे अत्यंत उपयुक्त खाद्य तयार करून खाऊ घालते. दुग्ध व्यवसाय तसेच पशुसंवर्धन म्हणजे शेतकऱ्‍यांचे एटीएम; अर्थात जेव्हा पाहिजे तेव्हा पैशांची उपलब्धता! शेतकरी म्हणतात, की दुधाचा पैसा सतत चलनात राहतो.

त्यामुळे दैनंदिन व्यवहार किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे काम दुधाच्या पैशांवरच होते. अनेकदा हवामानातील बदलांमुळे पीक वाया गेले किंवा बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतीमध्ये नुकसान झाले तरीही ज्या शेतकऱ्‍यांकडे दुग्ध व्यवसाय आहे त्यांना त्याचा फार मोठा फरक पडत नाही.

हरितक्रांतीनंतर १९७० च्या दशकात धवलक्रांती झाली. यामुळे दुधाच्या उत्पादनात १० पटीने वाढ होऊन आज वर्षाला २१ कोटी टन पर्यंत दूध उत्पादन वाढले. दरडोई दुधाचा वापर १०७ ग्रॅम होता तो आत्ता ४२७ ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे.

Dairy Business
Animal Husbandry In Sangli : सांगलीतील पशुपालकांना मिळणार चारा बियाणे

देशातील आठ कोटी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंब हा व्यवसाय करतात, ज्यामध्ये महिलांचा वाटा ७० ते ८० टक्के आहे. आज जगातील एकूण दूध उत्पादनापैकी २३ टक्के उत्पादन भारतात होत असल्यामुळे आपला देश दूध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

यात उत्तरप्रदेश (१४.९७%), राजस्थान (१४.६३%), मध्य प्रदेश (८.५७%), गुजरात (७.६%), आंध्र प्रदेश (७.०१%), महाराष्ट्र (6६.५६%), पंजाब (६.३८%), हरियाना (५.३%) अशाप्रकारे अग्रक्रमाने दूध उत्पादन घेतले जाते. देशातून चीज, बटर, तूप आणि दूध पावडर निर्यात करून दरवर्षी ३९.१५ कोटी डॉलरचे परकीय चलन मिळते.

दुधापासून प्रथिने, जैविके, प्रतिजैविके, खनिजे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उष्मांक सर्वांत जास्त आणि स्वस्तही मिळतात. दुधाला पूर्णअन्न म्हणत असताना यामध्ये जैविक गुणधर्म जास्त असल्यामुळे पचनाला सुलभ आणि चांगले आहे.

त्यामुळे चांगल्या दुधाचा वापर करून आपली लहान मुले आणि तरुण पिढी निरोगी तयार केली, तर ते सक्षम आणि सशक्त देश घडवू शकतात. या दृष्टीने दुधाचा वापर वाढविणे ही खरी देश घडविण्यासाठीची मोठी गुंतवणूक ठरणार आहे.

अनेकदा दुधाचा पुरवठा कमी आणि मागणीत वाढ झाली म्हणजे मग त्यामध्ये भेसळ सुरू होते. सणांच्या दिवसांत तर भेसळ जास्त वाढते. दुधाचे भाव वाढले म्हणजे दुधाची पावडर आयात केली जाते. खरं तर हे दुष्टचक्र थांबविणे गरजेचे आहे.

शुद्ध दूधनिर्मिती आणि वापर केला तरच आपली पुढील पिढी निरोगी आणि कार्यक्षम तयार होईल. परंतु या सर्व बाबींची जाणीव आजही नियोजनामध्ये दिसून येत नाही.वार्षिक अंदाजपत्रक मग ते देशाचे असो की राज्याचे त्यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाला फारच नगण्य आर्थिक उपलब्धी करून दिली जाते.

देशातील कृषी क्षेत्रातील एकूण उत्पादनाच्या २५ ते २६ टक्के वाटा असलेल्या या क्षेत्राला कृषी क्षेत्राच्या एकूण बजेटपैकी फक्त ११ ते १२ टक्के वाटा मिळतो. आजही देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत अनेक योजना, अनुदान, कार्य करणारे विभागीय कर्मचारी यांचे प्रमाण पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायासाठी कमीच आहेत.

आजही या व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यंत कमी प्रमाणात केला जातो. कारण या क्षेत्रात तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसाराचे कार्य कमी चालते. या व्यवसायातील चांगले उत्पादन देणारे १८ ते १९ टक्के पशुधन विविध रोगांना बळी पडत असताना या पशुधनाला विम्याचे संरक्षण फारच कमी आहे.

शेतीसाठी १८ टक्के पीक कर्ज देणे विविध बँकांना बंधनकारक केलेले असताना दुग्ध व्यवसायासाठी फक्त चार ते पाच टक्केच कर्जपुरवठा करण्यात येतो. पिकांच्या चांगल्या बीजोत्पादनात संकरित जातींची निर्मिती होत असते. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि स्पर्धा चालते.

परंतु दुग्ध व्यवसायासाठी चांगल्या जाती आणि त्यांचे चांगले वीर्यपुरवठा आणि गुणनियंत्रणाबाबत मात्र उदासीनता दिसते. या व्यवसायासाठीच्या चांगल्या योजना, नियोजन आणि अंमलबजावणीचा अभाव यामुळे जगाच्या सरासरी उत्पादन पातळीच्या केवळ २० ते ३० टक्क्यांपर्यंत आपला देश पोहोचू शकलेला आहे.

या व्यवसायासाठी देशातील फक्त चार टक्के जमीन वापरली जाते. देशाच्या एकूण उत्पादनात चार टक्के, तर शेतीच्या उत्पादनात २६ टक्के भर हा व्यवसाय टाकत असूनही याकडे पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिले जात नाही.

Dairy Business
Dairy Import : दुग्धजन्य पदार्थ आयातीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

सध्या ५३ टक्के हिरवा तर ४१ टक्के वाळलेल्या चाऱ्याची कमतरता आहे. आजमितीला ८५ कोटी टन हिरवा आणि ५४ कोटी टन वाळलेला चारा उपलब्ध आहे, ज्याची गरज २०५० मध्ये अनुक्रमे १०५ & ६३ कोटी टन असेल.

वाळलेला चारा अत्यंत निकृष्ट प्रतीचा म्हणजेच बहुतांश पिकाचे वाया जाणारे अवशेष वापरले जातात. चांगल्या प्रकारचे खाद्य, चारा पिकांचा प्रसार, ब्रीडिंग- फीडिंग पॉलिसीचा प्रत्यक्ष अवलंब, रोग- आजारांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या नियंत्रणासाठीची योग्य कार्यवाही या सर्व बाबी झाल्या तरच हा व्यवसाय भारतीय शेतकऱ्‍यांसाठी सर्वांत मोठा आधारस्तंभ होणार आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर पश्‍चिम महाराष्ट्र तसा दगड-धोंड्यांचा डोंगराळ प्रदेश, जमिनी कमी प्रतीच्या आणि पाऊसमानही कमी. परंतु दुग्ध व्यवसायाशी संगत केल्यामुळे विकास झाला. या प्रकारचा विकास राज्यातील इतर प्रदेशात झाला नाही कारण एक पीक पद्धतीचा अवलंब आणि एकत्रित शेती पद्धतीचा अभाव.

कमी होत असलेली जमीनधारणा, पाण्याची टंचाई, हवामानात होत असलेले बदल, वाढत चाललेली बेरोजगारी या सर्व बाबींचा विचार केला तर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा व्यवसाय अल्प व अत्यल्प भूधारक विशेषतः जिरायती भागातील शेतकरी तसेच तरुण बेरोजगार युवकांसाठी मोठा आधारस्तंभ नव्हे, तर प्रगतीकडे घेऊन जाणारा राजमार्ग होणार आहे. यासाठी सर्वांच्या सांघिक प्रयत्नांची आणि नवीन तंत्रज्ञान पद्धतीची गरज आहे.

चांगल्या प्रतीच्या गाईचा अभाव, चुकीच्या पद्धतीने अन्नद्रव्य आणि इतर व्यवस्थापन यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे. दुधाला कमी दर हा विषय ऐरणीवर असला तरीही दुधाची उत्पादकता आणि गुणप्रत वाढ याशिवाय हा व्यवसाय शाश्‍वत होऊ शकणार नाही.

याचाच विचार करून भविष्यात या व्यवसायात आमूलाग्र बदल करावे लागणार आहे. विशेष करून पशुसंवर्धनाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून दुधाचे उत्पादन आणि गुणप्रतीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com