Agriculture Story : कैद्यांना मिळाला शेतीचा सन्मार्ग

Agriculture Success Story of Jail Prisoners : शिक्षेतून मुक्त झाल्यानंतर कैद्याने स्वावलंबी, स्वाभिमानी, सन्मार्गी आयुष्य जगावे. या हेतूने त्यांच्या हातांना योग्य दिशा देण्याचे कार्य अणाव (जि. सिंधुदुर्ग) येथील कारागृहाचे अधीक्षक रवींद्र टोणगे यांनी केले
Ravindra Tonge
Ravindra TongeAgrowon

Jail Prisoner Story : पांढरा पायजमा, शर्ट, टोपी असा पेहराव केलेले जेवणाच्या रांगेत उभे असलेले किंवा कारागृहात आपसांत हाणामारी करणारे कैदी अशी दृश्‍ये चित्रपटातून दिसतात. परंतु गुन्हा घडलेल्या हातांकडून सत्कर्म घडत राहावे, त्या हातांना योग्य दिशा मिळावी असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव (ता. कुडाळ) या कारागृहाने करून दाखविले आहे. रंगरंगोटी न केलेल्या इमारतीस भकास परिसर, नापिक, खडकाळ जमीन, त्यात वाढलेले गवत, झुडुपे आणि अशा ठिकाणी वास्तव्यास असलेले कैदी अशी अलीकडील वर्षांपूर्वी इथली स्थिती होती.

क्रांतिकारक बदल

तळोजा कारागृहात कार्यरत असलेले रवींद्र टोणगे यांना बढती मिळून सिंधुदुर्ग कारागृह अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. त्यानंतर इमारत, जमीन, कैद्यांच्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला. कैदी हा देखील माणूस आहे. त्याला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, त्याने स्वावलंबी, स्वाभिमानी, सन्मार्गी आयुष्य जगावे असा विचार त्यांनी केला.

त्यासाठी कैद्यांना शेतीत रमवायचे व अन्न उत्पादन घेण्यासाठी प्रेरित करायचे ठरविले. मग स्वतः प्रत्यक्ष कोयता, कुदळ, पार, फावडा असे साहित्य घेऊन ते अडीच एकरांपैकी एक एकर जमिनीची साफसफाई करण्यास सरसावले. त्यांची धडाडी पाहून कैदीही पुढे आले. सुमारे दीड महिना जमीन लागवडीयोग्य करण्यामध्ये सर्वांनी श्रमदान केले.

Ravindra Tonge
Politics on Farmers : शेतकऱ्यांचे नवीन वर्ष कधी साजरे होणार?

भाजीपाला लागवड

एक एकर जमीन लागवडीसाठी तयार झाली. तिचे माती परीक्षण करण्यात आले. जिल्हयात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात याचा अभ्यास टोणगे यांनी केला. उत्पादन सेंद्रिय. नैसर्गिक असावे असे नियोजन केले. त्यादृष्टीने शेणखत, जीवामृताची उपलब्धता करण्यावर भर दिला. गादीवाफे तयार करून ठिबक सिंचन केले.

उत्पादन वर्षभर सुरू राहील व विविध भाज्यां त्यात असतील यासाठी पालेभाज्या, वेलवर्गीय व फळभाज्या अशी विविधता ठेवण्यात आली. घरच्या अनुभव असल्याने व्यवस्थापनाची जबाबदारी टोणगे यांनीच पाहिली. एकेकाळी भकास दिसणारा कारागृहाचा परिसर हळूहळू हिरवागार होऊन गेला.

कैद्यांना मिळाले शेतीचे धडे

शिक्षेतून मुक्तता झाल्यानंतर कैदी भावी आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतील या हेतूने टोणगे यांनी त्यांना शिस्त लावली. वाफे बनवणे, शेणखत, पाणी देणे इथंपासून ते काढणीयोग्य फळे कशी ओळखावीत, विक्री कशी करावी इथपर्यंतचे सगळे शेतीचे धडे दिले.

टोणगे गावी सुट्टीला गेले तरी त्यांच्या मनात कारागृहातील शेतीचा विचार असायचा. त्यांनी गावाकडून कोथिंबिरीचे बियाणे आणले. उत्तम नैसर्गिक पद्धतीने तिचे इथल्या जमिनीत संगोपन झाले. अनेक ग्राहकांनी खरेदीही केली.

कैदी रमले उत्पादनात

अणाव येथील कारागृहात सुमारे १०० कैदी आहेत. त्यापैकी ३० ते ४० कैदी शेतीत राबतात. पालक, मुळा, मेथी, माठ, मुळा, पडवळ, दोडका, दुधी, भोपळा, काकडी, कारले, भेंडी, गवार, मिरची, वांगी आदी विविध भाज्यांचे उत्पादन ते घेत आहेत.

झेंडू, गुलाब, सूर्यफूल, शेवगा आदींचाही अनुभव ते घेत आहेत. जिल्हा कारागृहातील तसेच सावंतवाडी, रत्नागिरी कारागृहांतील कैद्यांना येथून भाजीपाला पुरविला जातो. जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला भाजीपाला पुरविण्याची मागणीही आली आहे.

Ravindra Tonge
Agriculture Future : ...अशी असेल भविष्यातील शेती

कौशल्यावर आधारित काम

कौशल्य ओळखून कैद्यांना येथे काम देण्यात येते. उदाहरणार्थ, शिवणकाम करणाऱ्या कैद्याला शिलाई यंत्र देऊन त्यांच्याकडून अन्य कैदी आणि अधिकाऱ्यांचे कपडे शिवून घेतले जातात. ‘भगीरथ’ संस्थेने शिलाई यंत्राची मदत केली आहे. कैद्यांसाठी भजन, कीर्तनासह प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित केले जातात.

उच्चपदस्थांकडून प्रसंशा

कैद्यांना नियोजन समितीकडून पॉवर टिलर देण्यात आला. जिवामृत निर्मितीसाठी दोन गायींची खरेदी करण्यात आली. जिवामृत बनविण्याचे प्रशिक्षण कैद्यांना देण्यात आले. भाजीपाला आणि विविध उपक्रमांसाठी टोणगे यांना पोलिस महासंचालक कारागृह अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, प्रमुख कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अलीकडेच कारागृहाची संयुक्त पाहणी केली. बहरलेल्या शेतीचा परिसर पाहून अचंबित होत त्यांनी कारागृह अधीक्षकांचे व कैद्यांचेही कौतुक केले.

विक्री व्यवस्था

विक्रीचीही जबाबदारी कैद्यांनी उचलली आहे. सेंद्रिय असल्याने ग्राहक कारागृहाबाहेर तो खरेदी करतात. काही व्यापारी घेऊन जातात. शिक्षामुक्त कैदी ओरोस फाटा येथे थेट विक्री करू लागले आहेत. मागील वर्षी तब्बल एक लाख ९० हजारांचे उत्पन्न या विक्री व्यवस्थेतून मिळाले. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ पर्यत उत्पन्नाचा हा आकडा चार लाखांच्या आसपास पोचला. आता अडीच एकरांवर ही शेती सुरू असून, लागवडीसाठी पॉली मल्चिंग व ठिबक सिंचन केले आहे. विविध साहित्यांचा वापर करून मंडप केला आहे.

रवींद्र टोणगे ८३८००४३२३७ (कारागृह अधीक्षक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com