Hailnet for Crop Protection : कापडासारख्या ‘नेट’ने केले डाळिंब बागेचे संरक्षण

Pomegranate Crop : हवामान बदलांची विविध संकटे आज शेतकऱ्यांसमोर उभी आहेत. सातमाने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील रवींद्र पवार यांनी त्यावर उत्तर शोधताना ओढणीच्या वस्त्राप्रमाणे असलेल्या सुधारित नेटरूपी आच्छादनाचा वापर आपल्या ९० एकर डाळिंब बागेवर केला आहे.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

Agriculture Success Story : अलीकडील काळात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, हवेत जास्त प्रमाणात वाढलेली आर्द्रता, वाऱ्याचा वेग, गारपीट, तेलकट डाग रोग अशी विविध संकटे बागायतदारांपुढे उभी आहेत. बहरनिहाय त्याची तीव्रता पुढीलप्रमाणे सांगता येईल.

-मृग बहर ः फळांची वाढ पावसाळी हंगामात होत असल्याने रोगांचा प्रादुर्भाव जास्त. डिसेंबरच्या काळात गारपिटीचा धोका

-हस्त बहर ः काढणीच्या काळात अति उष्णतेमुळे फळांचा दर्जा घालविण्याचा धोका. गारपीट धोकाही आहे.

-आंबिया ः फळ वाढीच्या काळात सनबर्निंगमुळे फळांना डाग पडणे. फळे पक्वतेला येण्याच्या काळात गारांसह किंवा अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक. त्यामुळे बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त.

पवार यांचा प्रयोग

सातमाने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील प्रयोगशील बागायतदार रवींद्र धनसिंग पवार यांच्या द्राक्ष बागेत २०१५-१६ मध्ये ‘सनबर्निंग’ व ‘दव पडणे’ यामुळे मालाला तडे जाण्याची समस्या उद्‍भविली. अभ्यासातून इंटरनेटद्वारे त्यांना बागेवर पॉली नेटचे आच्छादन करण्याचा उपाय मिळाला.

इटलीहून एकरी दीड लाख रुपये खर्च येणारे नेट आयात केले. त्याचा वापर केला. आपल्या डाळिंब बागेतही याच प्रकारच्या समस्या होत्या. नेटचा वापर तिथेही करायचा होता. पण द्राक्ष बागेतील नेट पुढील वर्षी फाटले.

ओढणी वस्त्राच्या नेटचा शोध

एकेदिवशी पवार एका दुकानात गेले असता त्यांना तेथे नेटसारखे दिसणारे जाळीदार वस्त्र घेऊन बसलेली एक व्यक्ती दिसली. त्यांनी सहज चौकशी केली. त्या वेळी ते ओढणीचे वस्त्र असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. नेटच्या अभ्यासात सतत गर्क असलेल्या पवार यांनी त्याचाच वापर डाळिंब बागेत होऊ शकेल का, असा विचार केला.

त्यानुसार संशोधन व अभ्यास सुरू झाला. आपल्याला हव्या तशा आच्छादनाची निर्मिती त्यांनी संबंधित व्यावसायिकाकडून करून घेण्यास सुरुवात केली. अनेक प्रयत्नांमधून २२ मेश जाडीचे आच्छादन तयार करून घेण्यास पवार यांना यश आले. आज त्याचाच वापर त्यांनी आपल्या तब्बल ९० एकर डाळिंब बागेवर केलाआहे.

Crop Protection
UPSC Success Story : भिवापूरचा शेतमजूर प्रथमेश झाला ‘आयएफएस’ अधिकारी

आच्छादन केल्याचे झालेले फायदे

सनबर्निंग, बुरशीजन्य रोग व रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य झाले.

तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळला.

फळांचा रंग व चकाकी सुधारली.

अवकाळी पावसामुळे होणारे बागेचे नुकसान रोखता आले.

यंदा गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. मात्र गारा नेटवर पडल्या. आतील झाडे, फळे सुरक्षित राहिली.

प्रखर सूर्यप्रकाशापासून बागेचे संरक्षण झाले. चालू वर्षी एप्रिलमध्ये तापमान ४५ अंशांपर्यंत होते. मात्र तापमान नियंत्रित राहून फूलगळ झाली नाही. फळांच्या वाढीच्या अवस्थेतही प्रादुर्भाव दिसला नाही.

पवार यांना डाळिंबाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळत आहे. फळाची गुणवत्ता निर्यातक्षम असून, २०० ते ४०० ग्रॅम वजनाचे फळ तयार होत आहे. किलोला १०० ते त्याहून अधिक दर मिळवणे शक्य झाले आहे.

या नेटसाठी एकरी किमान दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र त्याचे फायदेही तसेच असल्याचे पवार यांनी सांगितले.

बागेतील आच्छादनाची रचना

९० एकरांवर अवलंब

लागवडीचे अंतर- १४ बाय १० फूट

दोन पोलमधील अंतर- ५० फूट

नेटची रुंदी- ११.५० फूट

पोलची जमिनीपासून उंची- ८.५० फूट

पांढऱ्या रंगाच्या आच्छादनाची दोन्ही बाजूंना उताराची रचना

आधार व फाउंडेशन पोलसाठी एमएस अँगल- ५० बाय ५० बाय ५ मिमी.

मुख्य पोलच्या टोकाला प्लॅस्टिक कॅप

नेट व जीआय वायर बांधण्यासाठी ‘टाय वायर’चा वापर

तालुक्यातील सातमाने, दाभाडी, आघार तसेच सटाणा तालुक्यातील फोपीर येथे या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू लागले आहेत.

Crop Protection
Agriculture Success Story: सुरुवातीला टोमणे मारली, शेवटी त्यांनीच कौतुक केलं; खडकाळ माळरानावर पठ्यानं फुलवली शेती!

झाडांवर आच्छादन

सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक विनोद जाधव पाच वर्षांपासून डाळिंब थेट झाडांवर संरक्षक जाळी आच्छादनाचा वापर करीत आहेत. अलीकडे २० एकरांवर त्याचा अवलंब केला आहे. त्यातून ‘सन बर्निंग’ समस्येवर मात करता आली. झाडे सशक्त, पाने हिरवीगार राहून थंडी व उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान नियंत्रण झाले. फळांची गुणवत्ता कायम राहिली. संरक्षक नेट व मजुरी असा एकरी ४० हजार रुपये खर्च येतो. सुमारे चार हंगामांपर्यंत आच्छादन टिकते. गरज नसतेवेळी काढून ठेवता येते.

भामरे यांनाही फायदा

कजवाडे येथील युवा डाळिंब उत्पादक सागर सुरेश भामरे यांनी चालू वर्षी चार एकर बागेला आच्छादन केले. ते म्हणाले, की दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त उन्हाळा जाणवला. मात्र वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे संरक्षण करणे शक्य झाले. सततच्या वातावरण बदलामुळे डाळिंब बागेला धोका निर्माण झाला होता. मात्र अवकाळी पाऊस व गारपीट यांपासून बागेचे संरक्षण झाले तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. पक्ष्यांपासून होणारे नुकसान कमी झाले.

तज्ज्ञांची शिफारस

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ समितीने समस्याग्रस्त विविध भागांत पाहणी करून शास्त्रीय दृष्टिकोनातून नेट आच्छादना संबंधी शिफारशी केल्या आहेत. नेट, एमएस. ॲगल, स्ट्रक्चर आदी सर्व मिळून अंदाजे किंमत ४ लाख २४ हजार ६३९ रुपयांपर्यंत येते अशी माहिती डाळिंब संशोधन केंद्र (लखमापूर, ता. सटाणा) येथील प्रमुख डॉ. सचिन हिरे यांनी दिली.

संपर्क ः

रवींद्र पवार, ९८२३०३३६००

विनोद जाधव, ९८९०६०९२९६

सागर भामरे, ९२८४६३१७२१

डॉ. सचिन हिरे, ७६९८५३६८७३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com