Successful Agriculture : निसर्गाच्या परीक्षेतील यशस्वी शेती

Climate Change : सपाट जमिनीवर पेरणी करण्याची पारंपरिक पद्धत आता बदलायला हवी. जमिनीवर बेड (रुंद वरंबा सरी) तयार करून त्यावर पिकाची लागवड करणे म्हणजे बदलत्या हवामानाचा सामना करण्यास सक्षम होणे, म्हणावे लागेल.
Success Story
Success StoryAgeowon
Published on
Updated on

Crop Cultivation Update : बदलत्या हवामानाला तोंड द्यायचे असेल तर पहिली पायरी म्हणजे शेती करण्याची पद्धत बदलायला हवी. पावसाच्या लहरीपणावर मात करायची असेल तर अशी शेती करावी लागेल की कमीत कमी पावसात देखील पिके तग धरू शकली पाहिजेत आणि अतिवृष्टीमध्ये देखील पिकांचे नुकसान टाळता यायला पाहिजे.

पाऊस लांबला, त्याने मध्येच ताण दिला आणि तो लवकर निघून गेला तरी पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक शेतीपद्धती अवलंबली पाहिजे. शेतकऱ्यांचा, संशोधकांचा आणि शेती विकासासाठी कार्यरत सर्वांचाच शेतीपद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे.

शेतीच्या पारंपरिक पद्धतीनुसार सपाट जमिनीवर पेरणी करणे योग्य मानले जाते. हीच पद्धत कायम ठेवून पेरणीच्या तंत्रामध्ये संशोधन होत राहिले आणि त्यालाच अनुरूप अशा औजारांचा व यंत्रांचा देखील विकास होत गेला. उसाची शेती सुरू झाली आणि लागवडीची ‘सरी वरंबा’ पद्धती विकसित होत गेली.

हीच पद्धत पुढे हळद, आले, बटाटा आणि इतर काही भाजीपाला पिकांसाठी योग्य ठरली आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय देखील झाली. त्यानंतर कोरडवाहू पिकांच्या लागवडीसाठी ‘रुंद वाफा व सरी’ (बीबीएफ - ब्रॉड बेड फरो) या पद्धतीचा शोध लागला. गेल्या दशकात बीबीएफ तंत्राकडे शेतकरी हळूहळू वळू लागले आहेत.

यासाठी आवश्यक यांत्रिकीकरणाची मर्यादा आणि खर्चामुळे हे तंत्र अजूनही अपेक्षेप्रमाणे व्यापकपणे स्वीकारले जात नाही. परंतु या तंत्रामुळे एक महत्त्वाचा बदल होत आहे आणि तो म्हणजे सपाट जमिनीवरील लागवडीपेक्षा गादीवाफ्यावरील (बेडवरील) लागवड फायदेशीर आहे, याची जाणीव अनेक शेतकऱ्यांना होत आहे. नेमका हाच फायदा बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी कसा उपयोगी पडत आहे, याचा ऊहापोह सर्व स्तरावर होणे गरजेचे आहे.

Success Story
Climate Change : लिंबाच्या झाडाला एकाच वेळी फुलं आणि निंबोळी; हवामान बदलाचा इशारा?

सन २०१८ मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळेद्वारे बीबीएफ तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणावर प्रसार सुरू केला. त्याच वर्षी खरीप हंगामात पावसाने पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये मोठा ताण दिला अन् हजारो एकारांवरची पिके सुकू लागली. परंतु बीबीएफ तंत्राने पेरणी केलेल्या पिकांना धोका झाला नाही आणि उत्पादनही चांगले मिळाले.

सन २०१९, २०२० व २०२१ मध्ये याच्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली. पिकांच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये अतिपाऊस झाला आणि हजारो एकरांवरील पिके अतिपाण्याने पिवळी पडली. कापसासारख्या पिकामध्ये बोंडसड झाली.

पुन्हा बीबीएफ वरील पिके डौलाने उभी राहिली आणि ते शेतकरी मोठ्या संकटातून बचावले. म्हणजे पिकांची लागवड गादीवाफ्यावर केल्यामुळे लहरी पावसाचा फटका बसला नाही, हे सिद्ध झाले आहे.

बेडवर उगवलेल्या पिकांच्या मुळाभोवती हवा खेळती राहते, तेथील सूक्ष्मजिवांना पोषक वातावरण मिळते, परिणामी मुळांची वाढ चांगली होते. ज्या पिकांची मुळे सशक्त आणि निरोगी त्या पिकांची जमिनीवरील वाढ तितकीच सशक्त होते आणि भरघोस उत्पादन मिळते, हा अनुभव हजारो शेतकऱ्यांना येत आहे.

यापैकीच काही शेतकऱ्यांनी हे बेड न मोडता त्यावरच पुढच्या पिकाची टोकन पद्धतीने लागवड केली, कमीत कमी खर्चाने व विनामशागतीने चांगले उत्पादन घेतले, आणि हे शेतकरी चतुर ठरले. अशा चतुर शेतकऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे.

निसर्गाने कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण केल्यास आपल्या पिकाचे नुकसान होऊ द्यायचे नाही पण खर्चही कमी करायचा, असा अत्यंत क्रांतिकारी विचार या शेतकऱ्यांनी अवलंबला आहे आणि तो जमिनीवर दिसत आहे.

शाळेमध्ये सांगितलेल्या गोष्टीमध्ये जसे देवाने परीक्षा घेताना शेतकऱ्याने मोठ्या चतुराईने आपले पीक पदरात पाडून घेतले, तसे सध्या निसर्ग घेत असलेल्या कठोर परीक्षेमध्ये हे शेतकरी चतुराईने आपली पिके वाचवत आहेत. आनंदी होत आहेत. चालू वर्षी मोसमी पावसाचे आगमन शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे ठरत आहे.

पावसाचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. परंतु चतुर शेतकरी याला अपवाद ठरत आहेत. ते सध्या निश्चिंत आहेत. चांगला पाऊस झाला की तणनाशके फवारून टोकन करण्यासाठी ते तयार आहेत. कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचे सहकार्याने कृषी विभागाने पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेल्या शून्य मशागत - सगुणा संजीवन तंत्राचा (एसआरटी) प्रसार हा या नवीन शेतीपद्धतीला पाठबळ देत आहे.

सध्या राज्याच्या सर्व भागात नावीन्याचा ध्यास घेतलेल्या आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाडलेले बेड दिसू लागले आहेत. यामध्ये मागील सहा-सात वर्षापासून बेड न मोडणारे आणि नुकतेच पहिल्यांदा बेड तयार करणारे सर्वच क्रांतिकारी शेतकरी सहभागी आहेत.

माळेगाव ठोकळ (जि. छत्रपती संभाजीनगर) सारख्या गावाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथेला जागून या वर्षी ३०० एकरावर बेड तयार केले आहेत. विविध भागांत अगदी लहान शेतकऱ्याने पाडलेल्या एक एकराच्या बेडपासून ते मोठ्या शेतकऱ्याने पाडलेल्या ५० एकराचे बेड म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊलच! पंढरपूरच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल जसे विठ्ठलाचे दर्शन घडवते तसे बेडवरील शेतीचे हे मोठे पाऊल देशात पुढची हरितक्रांती घडवणार यात शंका नाही!

चला तर गड्यांनो, बेड पाडा रे....

- चार ते साडेचार फूट रुंदीचे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे अर्धा ते एक फूट उंचीचे बेड तयार करून घ्यावेत.

-  पिकाच्या प्रकारानुसार आणि ओळींच्या संख्येनुसार बेडच्या रुंदीमध्ये बदल करावा.

-  बेडवर बियाण्यांची टोकन करावी. बियाणे व खते एकत्रितपणे टोकावीत.

-  बियाण्यांची टोकन मजुरांमार्फत, टोकन यंत्रामार्फत किंवा टोकन साचा वापरून करावी.

Success Story
Climate Change : हवामान बदलतंय, आपणही बदलूया

-  पिकाच्या लागवडीनंतर व उगवणीपुर्वी शिफारशीत तणनाशक फवारावे.

-  उभ्या पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास शिफारस केलेली निवडक तणनाशके वापरावीत.

-  कोणत्याही परिस्थितीत तणे उपटून काढू नयेत तसेच निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी करू नये.

 - तयार केलेले बेड मोडू नयेत.

(लेखक मृदा विज्ञान विशेषज्ञ तथा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात कृषिविद्यावेत्ता आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com