Agriculture Success Story : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका आहे. डाळिंब, द्राक्ष ही प्रमुख पिके. साखर कारखानाही आहे. तालुक्याच्या दक्षिणेला वसलेलं शिंदेवाडी (हिंगणगाव) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचं व दुष्काळी गाव. येथील सहदेव मिरजे यांची सहा एकर शेती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
शाश्वत पाण्याची सोय नसल्याने खरीप आणि रब्बीतील पिकेच हाती पडायची. वडील महावितरण कंपनीत नोकरी करायचे. सन १९९६ पासून त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या. तीन शस्त्रक्रिया झाल्या.
मग मात्र शेतीच्या माध्यमातून पर्यायी आर्थिक आधार उभा करायला हवा असे सहदेव यांना वाटू लागले. पण त्यासाठी नगदी पिके व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज होती.
शिंदेवाडी हे द्राक्षांचं गाव. त्या दृष्टीने हेच पीक सोयीचे वाटले. सन २००० मध्ये द्राक्ष बाग लावली. टॅंकरने पाणी देऊन ती जगवली. मेहनत व अभ्यासाच्या जोरावर दर्जेदार द्राक्षे पिकविण्यास सुरुवात झाली. कृष्णा नदी म्हैसाळ योजनेच्या रूपाने गावात आल्यानंतर शाश्वत पाण्याची सोय झाली.
मग द्राक्ष शेतीचा विस्तार केला. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ यातून द्राक्ष बागेची जोपासना कठीणच. होती. पण जिद्द, चिकाटी, मेहनत व अभ्यासातून पाच एकरांत या बागेचा विस्तार केला. सध्या सुपर सोनाका, अनुष्का, सोनाका हे तीन वाण घेतले जातात. स्थानिक निर्यातदार कंपनीमार्फत द्राक्षाची आखाती देशांमध्ये निर्यात सुरू आहे.
संरक्षित शेतीचा पर्याय
अवकाळी पाऊस, गारपीट वा अन्य हवामान बदलात केवळ द्राक्ष शेतीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्याला संरक्षित शेतीची जोड द्यायला हवी असे वाटू लागले. त्यातून पॉलिहाउस उभारणीचे प्रयत्न सुरू झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील मित्र प्रवीण बोरगावे पॉलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरची घेत होते. त्यांचे मार्गदर्शन घेऊन जरबेरा फुलांची शेती करण्याचा विचार मनात आला.
हा निर्णय वडील आणि बंधू सूर्यकांत यांना सांगितला. त्या वेळी आपल्याला पॉलिहाउसमधील पिकांची माहिती नाही. त्याची बाजारपेठ कशी शोधणार? विनाकारण खर्चात पडायला नको असा सूर उमटला.
पण त्यात उतरल्याशिवाय माहिती कशी होणार, अभ्यास व जोखीम व्यवस्थापन करीत पुढे जाऊया असे सहदेव यांनी पटवून दिले. अखेर घरचे राजी झाल्यानंतर त्यांनी पुणे- तळेगाव येथील संस्थेत संरक्षित शेतीविषयीचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले.
पॉलिहाउसमधील शेती
सन १०१५-१६ मध्ये २० गुंठ्यांत २२५ बाय ८० फूट आकाराच्या पॉलिहाउसची उभारणी केली. त्यासाठी १२ लाख रुपये खर्च आला. त्यापैकी ५० टक्के कृषी विभागाकडून अनुदान मिळाले. सहदेव सांगतात की मुळात आमची शेती मुरमाड. त्यामुळे गाळाची माती आणून लागवड केली. व्यवस्थापन सुरू झाले.
फुलांच्या विक्रीतून दोन पैसे हाती येऊ लागले. त्यातच नोटाबंदी आली. त्याचा विक्री व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. पुढेही दरांचे गणित विस्कळित झाले. हे पीक थांबविण्यापर्यंत वेळ आली. पूर्वी घेतलेले प्रशिक्षण, मित्रांचा सल्ला आणि बाजारपेठेतील अभ्यास यातून रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे ठरविले.
अभ्यासातून बसली ‘ढोबळी’ची घडी
दादर येथील भाजीपाला बाजारपेठेत जाऊन आवक, दर, कोणत्या काळात अधिक मागणी असते याबाबत बारकावे घेतले. सहदेव सांगतात, की रंगीत ढोबळीला तारांकित हॉटेल्स, तसेच मोठ्या शहरात लग्न समारंभातूनही चांगली मागणी असते. त्यानुसार वर्षभराचे कॅलेंडर तयार केले. यात सण-समारंभ, लग्न आदी तारखा नोंदविल्या.
त्यानुसार लागवड, काढणी आणि विक्रीचे नियोजन केले. मुंबईचा एक व्यापारी निश्चित केला असून चार वर्षांपासून त्यालाच विक्री केली जाते. गावाहून मुंबईला ट्रॅव्हल्स गाडीतून माल पाठवला जातो. आता या पिकाची आर्थिक घडी चांगली बसली आहे.
ढोबळी मिरची व्यवस्थापन- ठळक बाबी
लाल आणि पिवळ्या ढोबळीची २० गुंठ्यांत एकूण ६२०० ते ६५०० रोपांची लागवड.
पुण्यातून बियाणे मागविले जाते. जानेवारीच्या २५ ते ३० दरम्यान लागवड. डिसेंबरपर्यंत प्लॉट चालतो.
दीड फुटावर एक रोप अशी झिगझॅग पद्धतीने लागवड.
गादीवाफा तयार करताना दरवर्षी चार ट्रेलर शेणखताचा वापर.
काही गांडूळ खत घरी तयार केले जाते. गरजेनुसार विकतही घेतले जाते.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केले असून त्याचे पाणी शेततळ्यात साठवले जाते.
घरचे सर्व सदस्य शेतात राबतातच. शिवाय सहा महिला मजूर कायमस्वरूपी.
उत्पादन, दर
गेल्या चार वर्षांचा विचार केल्यास २० गुंठ्यांत सात, नऊ टनांपासून ते १३ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सरासरी दर प्रति किलो ५० रुपयांपासून ते १०० व कमाल २०० रुपयांपर्यंतही मिळाला आहे. उत्पादन खर्च सुमारे सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत येतो.
- सहदेव मिरजे ९६६५९०९८९६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.