Cashew Oil : तिघा मित्रांचा काजू टरफलापासून तेलनिर्मिती उद्योग

रत्नागिरी येथील विवेक बारगीर, मुकेश देसाई आणि वीरेंद्र श्रीरंग विखारे या तिघा मित्रांना काजूच्या टरफलांपासून तेलनिर्मिती सुरू केली आहे. शंभर टन टरफल प्रक्रियेपासून सुरू झालेला हा ‘सह्याद्री अ‍ॅग्रो ऑइल उद्योग तीन- चार वर्षांत ४०० टन प्रक्रियेपर्यंत पोहोचला आहे. उद्योग भविष्यात मोठी भरारी घेण्यासाठी सज्ज असून, वर्षाला तीन हजार टन काजू टरफलांवर प्रक्रिया करण्यासाठी आराखडा तयार झाला आहे.
Cashew Oil Production
Cashew Oil Production Agrowon

रत्नागिरी येथे राहणारे विवेक देवजी बारगीर, वीरेंद्र श्रीरंग विखारे व मुकेश देसाई हे घनिष्ठ मित्र आहेत. वीरेंद्र यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली असून, ते आखाती देशात (Gulf Countries ) नोकरी करतात. अधूनमधून ते रत्नागिरीत येतात.

मुकेश आंबा व्यावसायिक (Mango Business) असून, कृषिविषयक व्यावसायात त्यांचा अभ्यास आहे. विवेक यांनी बीकॉम पदवी व ‘आयटीआय’मधून ‘डिझेल मेकॅनिक’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची बेकरीही आहे.

Cashew Oil Production
Edible Oil : देशातील खाद्यतेलाचा वापर वाढणार

सुरुवातीचा व्यवसाय

सुरुवातीच्या काळात विवेक काजू बी (Cashew Seed) गावागावांतून गोळा करून ती काजू प्रक्रिया उद्योजकांना देण्याचा व्यवसाय करायचे. पंधरा वर्षे ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत त्या निमित्ताने पोहोचले. काजू प्रक्रियादारांना काजू बी वेगळी केल्यानंतर उर्वरित टरफलाचा उपयोग नसायचा.

मग विवेक त्यांच्याकडील वाया जाणारी टरफले गोळा करीत. टरफलापासून तेलनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना ती पुरवीत. ३ ते ४ रुपये प्रति किलो दराने टरफल खरेदी करून ती सावंतवाडी येतील कारखान्यापर्यंत पोहोचायची. त्यातून किलोला पन्नास पैसे ते एक रुपयांपर्यंत फायदा मिळायचा.

तेलनिर्मितीची संधी

टरफलाचे दर निश्‍चित नव्हते. त्यावरच नफ्या-तोट्याचं गणित अवलंबून होतं. या निमित्ताने विवेक यांच्या लक्षात आले, की टरफले भरपूर उपलब्ध आहेत, पण तेलनिर्मिती कारखाने अत्यंत कमी आहेत. या तेलाला कॅश्यूनट शेल ऑइल असे संबोधतात. औद्योगिक क्षेत्रात त्याला मोठी मागणी आहे. हीच मोठी संधी होती.

तिघा मित्रांनी चर्चा केली. सन २०१८ मध्ये स्वतःच तेलनिर्मिती सुरू करण्यावर एकमत झाले. जांभारी येथे (विवेक यांचे गाव) छोट्या जागी उद्योग सुरू झाला. मागील वर्षी रत्नागिरी ‘एमआयडीसी’ येथे भाडेतत्त्वावर वीस गुंठे जागा घेतली.

व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी विवेक व मुकेश यांच्यावर आहे. वीरेंद्र तेलाच्या दर्जाबाबत सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यामुळे गुणवत्ता जपली जाते. सह्याद्री अ‍ॅग्रो प्रकल्प असे उद्योगाचे नामकरण केले आहे.

Cashew Oil Production
Edible Oil : खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचे गाजर

तेलनिर्मिती उद्योग दृष्टिक्षेपात

यंत्रसामग्री व कार्यपद्धती

-टरफलांवर प्रक्रिया करण्यासाठीची यंत्रसामग्री लुधियाना (पंजाब) येथून आणली.

-त्यात घाणा, ‘क्रशिंग’ आणि चोथा बाहेर काढण्यासाठी दोन कन्वेअर बेल्ट, बॉयलर, १२ टन क्षमतेचे दोन, तर आठ टन क्षमतेचा एक असे एकूण ३० टन तेल साठवणुकीचे टॅंक्स.

-आजमितीला एकूण गुंतवणूक चाळीस लाखांपर्यंत.

Cashew Oil Production
Cashew Orchard : काजू बागांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रक्रिया व गुणवत्ता

रत्नागिरी भागात काजू बी प्रक्रिया करणारे छोटे-मोठे सुमारे दीडशे ते दोनशे उद्योजक आहेत. त्यांच्याकडील टरफले गोळा करून ती प्रकल्पा ठिकाणी आणली जातात. मार्च ते डिसेंबर या कालावधीत तेलनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू असते. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत कच्चा माल कमी मिळत असल्याने ती क्षमता कमी होते. तेलाची गुणवत्ता त्यातील घटकांवर उदा. घनता, ‘व्हिस्कॉसिटी’,

विशिष्ट गुरुत्व (स्पेसिफिक ग्रॅव्हिटी) यांच्या निश्‍चित केलेल्या प्रमाणावर मोजली जाते. त्यातील अ‍ॅसिड व्हॅल्यू अत्यंत कमी असावे लागते. ती प्रक्रिया केली जाते. अखेरीस गडद चॉकलेटी रंगाचे तेल तयार होते.

उत्पादन व विक्री

-पहिल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये १५० टन काजू टरफलांवर प्रक्रिया करण्यात आली. त्यामधून ३० टन तेल तयार झाले. दुसऱ्या वर्षी टरफले अधिक खरेदी केली. सन २०१९ मध्ये ३०० टन टरफलांवर प्रक्रिया करून ९० टन तर २०२२ मध्ये ४०० टन टरफलांमधून १२० टन तेलनिर्मिती केली.

हे तेल कच्चे असते. गुजरातमधील पाच ते सहा कंपन्यांना त्याचा पुरवठा होतो. ३५ ते ४५ रुपये प्रति किलो दर मिळतो. मागील वर्षांपर्यंत काही लाख रुपये उलाढाल होती. मागील चार महिन्यांत ती दोन कोटी रुपयांपर्यंत झाली. पुढील काही महिन्यांत त्यात दोन कोटींची वाढ अपेक्षित आहे.

तेलाचा वापर

-इल पेंट, जैवइंधन, लॅमिनेशन, ‘ब्रेक लायनिंग’, रंग, रेक्झिन, रबर उद्योग, इमारती लाकूड, होड्या, जहाजे आदींना लावण्यासाठी. या तेलामुळे लाकडाचे पाणी, किडी आदींपासून संरक्षण होते.

उप-उत्पादित पेंडीचा उपयोग

एक हजार किलो टरफलांवर प्रक्रिया केली की २०० किलो तेल, तर ७४० किलो पेंड (केक) मिळते.

ही पेंड कोल्हापूर, जळगाव, नगर, नाशिक येथील ‘एमआयडीसी’मधील उद्योगांना पाठविण्यात येते.

त्याचा बॉयलरसाठी इंधन (ज्वलनासाठी) म्हणून वापर होतो. चार ते नऊ रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे.

अडचणींवर केली अशी मात

प्रकल्पात अनेक अडचणी होत्या. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अनुभव यातून त्यावर मात केली. पहिल्या बॅचवेळी दर्जा व्यवस्थित राखता आला नाही. त्यामुळे ते खासगी कंपनीकडून रद्द करण्यात आले. मग भट्टींच्या आतील बाजूची रचना बदलण्यात आली. तेलाचा उताराही २० ते २१ टक्के येणे अपेक्षित होते. परंतु तो १८ ते १९ टक्केच आला. त्यासाठी ‘एक्स्पेलर’चे ‘सेटिंग’ बदलण्यात आले. आता उद्योगात सुरळीतपणा आला आहे.

विवेक बारगीर, ९८६०३४९९८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com