
पुणेः देशात सलग दोन वर्षे कोरोनामुळे खाद्यतेलाचा वापर (Edible Oil Consumption) कमी झाला होता. मात्र कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि बाजारपेठा पुन्हा सुरु झाल्यानंतर खाद्यतेलाचा (Edible Oil Demand) वापर आणि मागणी वाढली आहे. यंदा देशातील वापर कोरोनापुर्वीच्या पातळीवर पोहचू शकते, असा अंदाज इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशनने (Indian Vegetable Oil Producer Association) व्यक्त केला आहे.
जगात कोरोनाने सर्वच समिकरणे बदलली होती. देशातही जवळपास दोन वर्षे कोरोनामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. बंधने असल्याने इतर वस्तुंसह खाद्यतेलाचाही वापर कमी झाला होता. देशात २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही वर्षांत देशातील प्रतिव्यक्ती खाद्यतेलाचा वापर घटला होता.
२०१९ मध्ये खाद्यतेलाचा वापर ७.८ टक्क्यांनी कमी झाला होता. तर २०२०-२१ मध्ये जवळपास एक टक्क्याने वापर कमी होता. खाद्यतेलाचा वापर कमी होऊनही देशातील खाद्यतेल महागाई विक्रमी पातळीवर पोचली होती. मात्र यंदा देशातील खाद्यतेलाचा वापर कोरोनापूर्व काळातील वापराएवढा होऊ शकतो, असा अंदाज भारतीय खाद्यतेल निर्मिती उद्योगानं व्यक्त केला.
इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशनने म्हटले आहे, की कोरोनाकाळात जागतिक पातळीवर खाद्यतेलाचा पुरवठा कमी झाला होता. त्यातच पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. महागाई वाढल्याने नागरिकांची क्रयशक्ती घटली होती. या काळात देशातील खाद्यतेला उत्पादन काहीसं वाढूनही वापर मात्र कमी झाला होता. २०२१-२२ या वर्षात देशातील खाद्यतेल वापर १ टक्क्याने वाढला होता. तो यंदा अडीच टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. पण देशातील खाद्यतेल उत्पादन वाढीचा वेग अद्यापही धीमाच आहे.
कसा होता वापर?
देशातील खाद्यतेल उत्पादनाचा विचार करता २०१९-२० मध्ये ७२ लाख टन उत्पादन झालं होतं. मात्र २०२०-२१ मध्ये उत्पादन ८४ लाख टनांवर पोचले. ते २०२१-२२ या वर्षात ९० लाख टनांपर्यंत पोचले होते. देशातील खाद्यतेल उत्पादन वाढविणे गजरेचे आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाने आयातीवरील अवलंबित्व किती धोकादायक आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे देशाला खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. देशाला वर्षाला जवळपास २३० ते २४० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी तब्बल ६० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते.
मोहरी उत्पादनवाढ शक्य
देशात मोहरी उत्पादनातून खाद्यतेल उत्पादन वाढविणे शक्य आहे. शेतकरीही मागील काही वर्षांपासून मोहरी उत्पादन वाढवत आहेत. देशात अलिकडेच जणुकीय सुधारीत मोहरी लागवडीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे देशातील मोहरी उत्पादन वाढीसाठी मदत मिळेल, असेही इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशनने म्हटले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.