Chili Farming: मिरची उत्‍पादनात निकम कुटुंबाचा हातखंडा

Rural Entrepreneurship: अहिल्यानगर जिल्ह्यातील दिघी येथील शिवाजी निकम कुटुंबाने आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेतीचा संगम साधत मिरची उत्पादनात यश मिळवले आहे. त्यांनी संरक्षित शेती, ठिबक सिंचन आणि थेट विक्रीच्या माध्यमातून अधिक नफा मिळवत शेतीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
Shivaji Nikam and his Farm
Shivaji Nikam and his FarmAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

Agriculture Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील दिघी (ता. नेवासा) येथील शिवाजी निकम कुटुंबाने मिरची पिकातील तंत्र अवगत केले आहे. यात ग्राहकांच्या गरजेनुसार शेडनेटमध्ये ढोबळी, तर खुल्या शेतात दोन प्रकारच्या लांबीची मिरची घेऊन त्याचे चांगले उत्पादन साध्य केले आहे. सातही दिवस विविध आठवडी बाजारांत विक्री करून त्यास बाजारपेठही मिळवून दिली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्याच्या पूर्व भागातील भेंडा, कुकाणा, चिंचोली, दिघी आदी गावांतील शेतकऱ्यांना मुळा धरणामुळे सिंचनाचा चांगला आधार मिळतो. त्यामुळे भागात बहुतांश शेतकरी ऊस उत्पादन घेतात. अलीकडे कांदा उत्पादनाकडेही शेतकरी वळले आहेत. दिघी येथील शिवाजी निकम यांनी मात्र उसाला भाजीपाला पिकांची जोड देत, त्याची अभ्यासपूर्ण शेती केली आहे. मिरची पिकातील तंत्र अवगत केले आहे.

Shivaji Nikam and his Farm
Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

मिरची पिकात हातखंडा

शिवाजी यांचे वय वर्ष सुमारे ४१ वर्षे आहे. वडील रामनाथ, आई मंदाबाई, पत्नी सोनाली, मोठे बंधू सोमनाथ तर सर्वांत धाकटे बंधू संभाजी असे सर्व जण शेती करतात. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे शेतीचा भार हलका झाला आहे. या भागात मुख्य असलेले ऊस पीक घेतानाच दहा वर्षांपूर्वी २० गुंठे क्षेत्रावर स्वखर्चाने तर पाच वर्षापूर्वी कृषी विभागाच्या मदतीने २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारले.

त्यासाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च आला. आज सुमारे एक एकर १० गुंठे क्षेत्र संरक्षित शेतीखाली असून त्यात ढोबळी मिरची व काकडी अशी दोन पिके घेतली जातात. दीड एकरांत खुल्या क्षेत्रावर साधी व २० गुंठ्यांत थोडी लांब असलेली मिरची असे एकूण मिरचीचे तीन प्रकार शिवाजी घेतात. त्यांना या पिकातील चार ते पाच वर्षांचा अनुभव व या शेतीत हातखंडाही तयार झाला आहे.

सिंचनासाठी दोन विहिरी व बोअर असून, मुळा कालव्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र ठिबक, गादीवाफा व मल्चिंग पेपरचा वापर मिरचीसाठी केला जातो. त्यातून पाण्याची चाळीस टक्के तरी बचत होते. शेणखतामुळे मिरचीची गुणवत्ता वाढत असल्याने दरवर्षी एकरी पाच ट्रॉली त्याचा वापर हमखास केला जातो.

ढोबळी मिरचीची झिगझॅग पद्धतीने एकरी १५ हजार ते १६ हजार रोपे बसतात. लागवडीनंतर पुढील ४५ दिवसांनी तोडणीला सुरुवात होते. त्याआधीच फळाच्या वजनाने झाडांच्या फांद्या मोडू नयेत म्हणून बांधणी केली जाते. सुमारे ७० टक्के सेंद्रिय. तर ३० टक्के रासायनिक असा खतांचा वापर होतो. ब्लॅक थ्रिप्सची समस्या आहे. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली जाते.

Shivaji Nikam and his Farm
Chilli Farming : व्यावसायिक ढोबळी मिरची उत्पादनातून साधली प्रगती

उत्पादन व विक्री

डिसेंबरच्या दरम्यान ढोबळी मिरचीची लागवड होते. जूनपर्यंत प्लॉट चालतो. मागील वर्षी एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. यंदा त्यापुढे अपेक्षा असून २२ टनांपर्यंत विक्री झाली आहे. त्यास किलोला २५ रुपयांच्या पुढे व ४० रुपयांच्या आसपास दर मिळतो. खुल्या शेतीतील लांब मिरचीचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यास किलोला ३५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. जूनच्या दरम्यान २० ते ३० गुंठ्यात दरवर्षी काकडीचे खुल्या शेतात पीक असते. त्याचे १५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. त्यास किलोला २५ रुपयांच्या पुढे दर मिळतो. काकडी उत्पादनातही सुमारे १० वर्षापासून सातत्य आहे.

जागेवर अन् बाजारातही विक्री

मिळत असलेल्या उत्पादनापैकी काही शेतीमालाची विक्री थेट ग्राहकांना व उर्वरित बाजार समितीत असे तंत्र निकम कुटुंबाने अवलंबिले आहे. नेवासा परिसरातील गावांमध्ये आठवड्याचे सातही दिवस विविध आठवडी बाजार भरतात. या ठिकाणी शिवाजी यांची आई व लहान बंधू थेट ग्राहकांना भाजी विकतात. त्यातून दीडपट ते दुप्पट फायदा होतो. मागील वर्षी ढोबळी मिरचीला जागेवर ५५ ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला होता. यंदा तो ३० ते ४० रुपये आहे.

पूरक व्यवसायांची जोड

कुटुंबाकडे अल्प क्षेत्र असल्याने पंचवीस वर्षापासून शेतीला आधार म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. सुरवातीला दोन गाई होत्या. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. आजमितीला १९ पर्यंत संकरित गाई आहेत. सुमारे १५५ ते १६० लिटरपर्यंत दूधसंकलन होते. गावांतील अन्य शेतकऱ्यांकडूनही ४०० लिटरच्या आसपास दूध संकलन करून एका संघाला दुधाचा पुरवठा होतो. भागीदारीत हा व्यवसाय केला जात आहे. दरवर्षी पन्नास टनांच्या जवळपास शेणखत मिळते. त्याचा वापर शेतीत होतो. त्यातून जमिनीचा पोत सुधारण्यासह मिरचीची टिकवण क्षमता वाढली आहे. त्यामुळे बाजारात दरही चांगले मिळत असल्याचा अनुभव आहे.

शेतीतील प्रगती

आज शेतीतील उत्पन्नातूनच वडिलोपार्जित दोन एकर शेतीत टप्प्याटप्प्याने भर घालून ती साडेसात एकरांपर्यंत पोहोचविण्यास निकम कुटुंब यशस्वी झाले आहे. याशिवाय घर बांधणी, पाइपलाइन, ट्रॅक्टर तसेच शेतीत अन्य सुविधा उभारणे शक्य झाले आहे. संपूर्ण कुटुंब माळकरी असल्याने अध्यात्म वृत्तीचे आहे. अन्य कोणत्याही ठिकाणी विनाकारण वेळ व्यर्थ न दवडता कुटुंबातील सर्व सदस्यांनी केवळ शेतीला वाहून घेतले आहे. पंधरा वर्षांपासून दहा एकरांवर कराराने शेती कसण्यात येते. शिवाजी यांचा मुलगा ज्ञानसागर याने पशुवैद्यक क्षेत्रातील तर मुलगी गीतांजलीने कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांचीही शेतीला मदत होत आहे.

शिवाजी निकम ९०९६९०५५५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com