Mango Farming Management : केसर बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

Mango Farming : जालना जिल्ह्यातील वांजोळा (ता. मंठा) येथील दादासाहेब आश्रुबा चव्हाण यांची साडेसात एकर शेती. २००६ मध्ये त्यांनी १ हेक्टर क्षेत्रावर १० बाय १० मीटर अंतरावर केसर आंब्याची लागवड केली.
Mango Management
Mango ManagementAgrowon

Mango Farming Technique :

पीक : केसर आंबा

शेतकरी : दादासाहेब आश्रुबा चव्हाण

गाव : वांजोळा, ता. मंठा, जि. जालना

एकूण शेती : साडेसात एकर

केसर आंबा : ८० आर

जालना जिल्ह्यातील वांजोळा (ता. मंठा) येथील दादासाहेब आश्रुबा चव्हाण यांची साडेसात एकर शेती. २००६ मध्ये त्यांनी १ हेक्टर क्षेत्रावर १० बाय १० मीटर अंतरावर केसर आंब्याची लागवड केली. परंतु मागील काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमध्ये काही क्षेत्रावरील झाडांचे नुकसान झाले. सध्या त्यांच्या कडे ८० आर क्षेत्रावर केसर आंबा झाडांची लागवड आहे.

जिरडगावात डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशेतीतून आंबा लागवडीचे काम झाले. त्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमात श्री. चव्हाण सहभागी झाले होते. तेथूनच त्यांना केसर आंबा लागवडीची प्रेरणा मिळाली. बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन करून व्यवस्थापनात वेळोवेळी बदल करून दर्जेदार केसर आंबा उत्पादन ते घेत आहेत. आंबा उत्पादनात सातत्य राखत त्यांनी शेकडो ग्राहक जोडले आहेत.

पारंपरिक पिकांना दिला फाटा

आधी कोरडवाहू असलेल्या शेतीत मूग, कपाशी, ज्वारी या पिकाची लागवड केली जात असे. मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्याच काळात जालना जिल्ह्यातील जिरडगावात गटशेतीतून केसर आंबा लागवड केल्याची माहिती त्यांना मिळाली. गटशेतीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असताना आपणही केसर आंबा लागवड करावी, असे त्यांच्या मनात आले. आणि २००६ मध्ये जवळपास १ हेक्‍टर क्षेत्रावर त्यांनी केसर लागवड केली.

Mango Management
Mango Farming : आंबा विक्रीसाठी प्रतवारी ठरते महत्त्वाची

व्यवस्थापनातील बाबी

दरवर्षी साधारणत: मे महिन्यात संपूर्ण बागेतील केसर आंबा काढून विक्रीची कामे पूर्ण होतात. त्यानंतर बागेला विश्रांती दिली जाते.

विश्रांती काळात झाडांना पुन्हा सक्षम करण्यासाठी पुढील कामास सुरुवात होते. झाडाखाली पडलेली फळे गोळा करणे, हलकी छाटणी, वाळलेल्या कीड-रोगग्रस्त फांद्या काढणे अशी कामे केली जातात. त्यानंतर बुरशीनानाशकांची फवारणी घेतली जाते.

त्यानंतर बागेतील झाडांस ८० किलो चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड या प्रमाणे दिले जाते. शेणखत चांगले कुजलेले असल्याची खात्री केल्यानंतरच त्याचा वापर केला जातो. झाडाच्या खोडापासून साधारणतः ४ ते ५ फूट अंतरावर रिंगण करून मातीखाली खतमात्रा दिली जाते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

साधारणत: मे महिन्यात शेणखत दिल्यानंतर १५ जुनच्या आसपास प्रति झाड ५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट रिंग पद्धतीने दिले जाते. त्या सोबतच झिंक, फेरस सल्फेच, कॅल्शिअम, बोरॉन प्रति झाड १०० ग्रॅम प्रमाणे दिले जाते.

जून महिन्याच्या शेवटी युरीया २ किलो व पोटॅश २ किलो प्रतिझाड दिले जाते. साधारण एक आठवड्याच्या अंतराने ही मात्रा पुन्हा दिली जाते.

साधारण १५ ऑक्‍टोबरच्या दरम्यान १३:०:४५ ची फवारणी घेतली जाते. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा १३:४०:१३ व पुन्हा एका आठवड्याने ०:५२:३४ ची फवारणी घेतली जाते. ही फवारणी मोहरासाठी घेतली जाते.

Mango Management
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

सिंचन व्यवस्थापन

पावसाळी हंगामात पाऊस अपेक्षित झाला नाही तर सप्टेंबर अखेरीस वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन केले जाते. सिंचनासाठी एक विहीर आणि बोअरवेल मधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. दरवर्षी साधारण १ ऑक्‍टोबरपासून बागेला पाणी देणे पूर्णपणे बंद केले जाते.

बागेतील कामांचे योग्य नियोजन केल्यामुळे साधारण १५ नोव्हेंबरच्या आसपास मोहोर येण्यास सुरुवात होते, असा त्यांचा अनुभव आहे. मोहर आल्यानंतर मोकळे पाणी दिले जाते. त्यानंतर वाटाण्याच्या किंवा बोराच्या आकाराचे फळ झाल्यानंतर बागेत वाफसा स्थिती राखण्यासाठी मोकळे पाणी दिले जाते.

पीक व्यवस्थापन

केसर आंबा बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरिक्षण केले जाते. मोहोर लागल्यानंतर १५ दिवसांनी प्रतिबंधात्मक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते. त्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते.

फळगळ होऊ नये म्हणून फळे वाटाण्याच्या ते बोराच्या आकाराची झाल्यावर एनए आणि युरीया याची एकत्रित फवारणी घेतली जाते.

फळे बोराच्या आकाराचे फळ झाल्यानंतर त्यांचे पोषण होण्यासाठी दर १० दिवसांनी १३:०:४५ ची फवारणी घेतली जाते.

फळांमध्ये कोय तयार होण्याची अवस्था आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. कोय धरल्यानंतर ०:५२:३४ ची फवारणी घेतली जाते.

बागेत फळमाशाची प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी सापळे लावले जाते.

विक्री व्यवस्थापन

उत्पादित केसर आंब्याची हातावर विक्री करण्याचे तंत्र दादासाहेब चव्हाण यांनी अवलंबिले आहे. जास्तीत जास्त कच्च्या आंब्याची विक्री करण्यावर भर दिला जातो. दरवर्षी साधारण १०० ते १५० रूपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. सेलू, मंठा, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे इत्यादी ठिकाणचे सुमारे ५०० हून अधिक ग्राहक त्यांनी जोडले आहेत. कायमस्वरुपी जोडलेल्या ग्राहकांसह बागेत येणाऱ्या ग्राहकांना थेट विक्री केली जाते, असे श्री. चव्हाण सांगतात.

आगामी नियोजन

बागेतील सर्व झाडांवरील फळे काढले जातील. त्यानंतर बागेच्या स्वच्छतेवर भर दिला जाईल. बागेत हलकी छाटणी केली जाईल. शेणखत तसेच रासायनिक खतांचे डोस दिले जातील. याशिवाय यंदाच्या हंगामात संपूर्ण बागेत ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित करण्याचे नियोजित असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

दादासाहेब चव्हाण, ९४२३८८८०००,

(शब्दांकन : संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com