
Rural Entrepreneurship : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) येथील नितीन श्यामराव साळुंखे यांची प्रगतशील शेतकरी अशी ओळख आहे. कला शाखेचे पदवीधर असलेल्या नितीन यांची आठ एकर बागायती शेती आहे. मोठे बंधू कल्याणराव लष्करी सेवेतून निवृत्त झाले आहेत.
नितीन यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर सुमारे पाच वर्षे एका आघाडीच्या प्रकाशन संस्थेत विपणन विभागात सातारा जिल्ह्यातच नोकरी केली. मात्र शेतीची आवड, जबाबदारी व त्याकडे अधिक वेळ देता यावा यासाठी त्यांनी नोकरी सोडली. शेतीसह घरचा पूर्वीपासून सुरू असलेला दुग्धव्यवसाय नेटाने पाहण्यास सुरवात केली.
दुग्धव्यवसायाची वाटचाल
दुग्धव्यवसायाचा विकास केला, त्यात योग्य सुधारणा केल्या तर शेतीतील उत्पन्न वाढेल या हेतूने व्यवस्थापनावर भर दिला. सन २००० मध्ये घराजवळ बंदिस्त गोठा बांधला. त्यामध्ये सातारा तालुक्यातील अंगापूर, आरफळ येथून एचएफ या संकरित जातीच्या पाच गाईची खरेदी केली. या काळात ८० ते ९० लिटरपर्यंत प्रति दिन दुधाचे उत्पादन मिळत होते.
दुग्धव्यवसायातील खर्च, दरांमध्ये सातत्याने होणारी घट आदी कारणांमुळे बागायती पट्ट्यातील अनेक गोठे बंद पडले. मात्र नितीन यांनी पहिल्यापासूनच खर्चावर नियंत्रण ठेवले. चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासाठी दोन एकर क्षेत्रावर मका घेतला. टप्प्याटप्प्याने पाचवरून गाईची संख्या १५ पर्यंत नेण्यात यश मिळवले.
गोठा रस्त्यालगत आहे. मध्यंतरीच्या काळात गोठ्यातील गाईंना लाळ्या खुरकत रोगाचा संसर्ग झाला. प्रयत्नांची शिकस्त करूनही दोन दुभत्या गाई दगावल्या. निराशा आली. मात्र न खचता अन्य गाईंचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला. कष्ट व चिकाटीच्या जोरावर संकटांवर मात केली.
गोठ्याचा विस्तार
दुग्ध व्यवसाय नियोजनातून यशस्वी व स्थिर झाल्यानंतर विस्तार करण्याचे ठरवले. सन २०२२ मध्ये घराजवळील गोठा महामार्गालगतच्या जागेकडे स्थलांतरित केला. काटकोनात ८५ बाय १६ फूट जागेत त्याची मुक्तसंचार गोठा पद्धतीने रचना केली.
त्यामध्ये सुमारे अडीच गुंठे क्षेत्रास तार कुंपण केले. गोठ्यात खाद्य ठेवण्यासाठी खोली तसेच कडबा कुट्टी ठेवण्याची व्यवस्था केली. बंदिस्त गोठ्यात गाईंना बसण्यासाठी रबरी मॅटचा वापर केला. दुधाच्या धारा काढण्यासाठी जागोजागी ‘पॅाईट’ काढले. बंदिस्त गोठ्यातून सहजपणे गाईंना मुक्तसंचार जाता-येता येईल या पद्धतीने आखणी केली.
आजमितीला गोठ्यात लहान मोठ्या मिळून १८ गाई आहेत. मुक्तसंचार पद्धतीमुळे कष्ट कमी होण्याबरोबर गायींचे आजारपण कमी झाले आहे. या गोठ्यासाठी सुमारे दहा लाखांपर्यंत खर्च आला आहे. कर्ज न काढता याच व्यवसायात मिळालेल्या उत्पन्नातून हा खर्च केल्याचे नितीन सांगतात.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासाठी गोठ्याशेजारी चक्राकार (रोटेशन) पद्धतीने दोन मका लागवड.
आठ एकरांतील शेतात ऊस आणि मका ही दोनच पिके घेतली जातात.
गोठ्यात आरोग्य व स्वच्छता ठेवण्यावर अधिक भर दिला जातो. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार होतात. लम्पी, लाळ्या खुरकत आदींसाठी वेळेवर लसीकरण, जंताच्या गोळ्या दिल्या जातात.
पावसाळ्याचा काळ वगळता आठ ते नऊ महिने गाई मुक्तसंचार गोठ्यात सोडल्या जातात.
वर्षभर दूध संकलनाची सरासरी कायम राहावी यासाठी गरज भासल्यास गायींची विक्री तसेच खरेदीही.
बहुतांश मुरघास घरी बनविला जात असल्याने खर्चात बचत होते.
चारा कुट्टी करून दिला जात असल्याने तो वाया जात नाही.
दुग्ध उत्पादनाबरोबरच दर्जेदार वंशावळीच्या गायींची पैदास करण्यावर भर दिला जातो.
सध्या गोठ्यात प्रति दिन सरासरी २५ ते ३० लिटर तर सर्वोत्तम ३२ लिटर दूध देणारी गाय आहे.
दुधाची खरेदी जागेवरून होते, दुधाचा पगार महिन्याला होतो.
व्यवसायातील फायदा, अर्थकारण
वर्षभर दुग्ध उत्पादनात सातत्य राहील या प्रमाणे नियोजन आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रति दिन किमान १७५ लिटर तर कमाल २०० ते २२५ लिटर दुधाचे संकलन होते. प्रति लिटर ३० ते ३ रुपये प्रति लिटर दर मिळतो. गावातील डेअरीलाच दुधाचा पुरवठा होतो. खाद्य व अन्य खर्च वजा जाता महिन्याला ३५ ते ४० टक्के नफा होतो.
दर कमी जास्त झाल्यावर त्यातही बदल होतो. खाद्यवरील खर्च कमी केल्यास व स्वतः व्यवसायात राबले तरच व्यवसायातून पैसे शिल्लक राहतात. तसेच गाई खरेदी-विक्री ही देखील महत्त्वाची बाब असल्याचे नितीन सांगतात. वर्षाकाठी २० ट्रेलर शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतात केला जातो. त्यातून जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होते. आडसाली उसाचे एकरी शंभर टन तर खोडवा उसाचे ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे.
व्यवसायातून आली समृद्धी
गोठ्यातील कामांसाठी एक मजूर तैनात असून कुटुंबातील सदस्य देखील राबतात. यामध्ये मोठे बंधू कल्याणराव, भावजय छाया, पत्नी ज्योती, पुतण्या केतन, मुलगा प्रथमेश या सर्वांचे योगदान आहे. पंचवीस वर्षांच्या काळात व्यापारी देखील मित्र झाले असून बंगळूरहून गाईची खरेदी- विक्री करण्यात त्यांची मदत झाली आहे.
बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञंचे मार्गदर्शन व सहकार्य मिळते.शेती व दुग्धव्यवसायाच्या जोरावरच मुलांना उत्तम शिक्षण देता आले. टुमदार बंगला बांधला. चारचाकी गाडी घेतली. कोणतेही कर्ज घेण्याची वेळ आली नाही. मोठ्या बंधूंनी यापूर्वी उपसरपंचपद तर नितीन यांनी सोसायटीचे चेअरमनपद भूषविले आहे.
नितीन साळुंखे ९६५७२६०४१७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.