Environment Day : पर्यावरण समृद्ध करणारी मोहाडीची देवराई

Green Revolution : सुमारे १६० प्रकारच्या विविध वृक्षांची लागवड येथे झाली असून ट्री म्युझियम ही संकल्पनाही आकारास आली आहे. वसुंधरेला समृद्ध करण्याची युवकांनी हाती घेतलेली ही चळवळ निश्‍चितच प्रेरणादायी आहे.
Mohadi Devrai
Mohadi DevraiAgrowon
Published on
Updated on

Mohadi Devrai : नाशिक जिल्ह्यातील मोहाडी हा परिसर प्रयोगशील द्राक्ष व अन्य शेतीप्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वत्र मोठे नाव कमावलेली सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी देखील याच मोहाडीमध्ये स्थित आहे. हरित गाव व निसर्ग संवर्धन ही संकल्पना घेऊन मोहाडीतील तरुणाई २०१९ मध्ये एकत्र आली. मित्राच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटरपर्यंत शंभर वटवृक्षांची लागवड केली.

याच कामातून या तरुणांना वृक्षांविषयी ओढ निर्माण झाली. दरम्यान, प्रसिद्ध सिने अभिनेते यांनी स्थापना केलेल्या ‘सह्याद्री देवराई महाराष्ट्र’ या संस्थेचे सचिव सचिन चंदने यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने मोहाडी येथे वृक्षलागवड करण्याचा संकल्प झाला. गावाच्या पश्‍चिमेला ग्रामपंचायतीचे १५ एकर ओसाड, खडकाळ माळरान होते. पूर्वी ते चराईचे क्षेत्र होते.

चर्चेतून याच ठिकाणी ग्रामपंचायत, ग्रामस्थ या सर्वांना सोबत घेऊन देवराई उभारण्यावर एकमत झाले. ग्रामसभेत सर्वानुमते तसा ठराव मंजूर करण्यात आला. चौदा सप्टेंबर, २०२० रोजी सयाजी शिंदे यांच्या हस्ते वड, पिंपळ, कडुनिंब, बेल आणि बकुळ या झाडांची लागवड करून कार्याचा शुभारंभ झाला.

देवराईतील सहभाग

विविध वृक्षांची लागवड करण्यापूर्वी पद्धतशीरपणे लागवडीच्या जागा, अंतर यांची आखणी करण्यात आली. ‘सह्याद्री देवराई गोपाळकृष्ण-मोहाडी’ असे देवराईचे नामकरण करण्यात आले. लागवड, संवर्धनाच्या दृष्टीने साधनांची उपलब्धता, निधी, श्रमदान आदींसाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान लाभले.

यात ग्रामस्थ, ग्रामपालिका, वनविभाग, केआरटी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आदींचा समावेश राहिला. केटीएचएम कॉलेज (नाशिक) यांच्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत श्रमसंस्कार शिबिरे होऊ लागली. यात देवराईतील रस्तेनिर्मितीही होण्यास मदत झाली.

वृक्षनिवड, लागवड अंतरासंबंधी ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले. हळूहळू झाडे वाढू लागली. तरुणांच्या मनात हिरवाईचे स्वप्न खोलवर रुजण्यास मदत झाली. सिंचन, संगोपन, परिसर स्वच्छता या कामांचा पसारा वाढू लागला. यात समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनीही सहकार्य केले.

विद्यार्थांचा सहभाग

आज तरुणांना वृक्ष लागवड व संगोपनाचे वेडच लागले असून त्यामाध्यमातून जैवविविधता जपण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून ‘चला सावली पेरूया’ या उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून ‘सीडबॉल निर्मिती’ प्रशिक्षण संपन्न झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर’ कार्यक्रमांतर्गत ५८ विद्यार्थ्यांनी एक दिवस विशेष श्रमदान केले.

Mohadi Devrai
Environment Conservation : पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

हरित उपक्रमाने झाडांविषयी प्रेम

वृक्ष लागवड संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या देवराईचे सदस्य असलेल्या तरुणांनी समाजाभिमुख उपक्रम सुरू केले आहेत. जन्म दिवशी व्यक्तींना संपर्क करून ‘वाढदिवसाचे झाड’ ही संकल्पना राबवण्यात येते.

विवाह झाल्याच्या दिवशी वधू-वर जेव्हा गावात प्रवेश करतात त्या वेळी त्यांनी आधी देवराईत यायचे व आपल्या नावाने झाड लावायचे अशी नववधू-वराचे झाड संकल्पना राबवली जाते.

महापुरुष जयंती, पुण्यतिथी, आरोग्य दिन, मैत्री दिवस, प्रेमदिवस, पर्यावरण दिन आदींच्या अनुषंगानेही विविध लोक वृक्ष लागवडीसाठी येथे येतात. यासह प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदा. दशक्रिया, जलदान, वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण आदी रूपातही हरित उपक्रम राबवले जात आहेत.

आर्थिक मदतीचा हात

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्स, होम फायनान्स, लिग्रॅंड, लॉर्ड इंडिया आदी कंपन्यांच्या वतीने दुर्मीळ झाडे,ठिबक सिंचन प्रणाली यासाठी मदत करण्यात आली. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने पाणी व विजेची समस्या ओळखून सौर पॅनेल पंप सेट कार्यान्वित करून दिला आहे. स्थानिकांच्या सहकार्यातून पत्र्याचे शेड, गावातील केआरटी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून संरक्षित पाणीसाठ्यासाठी २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून देण्यात आली. यासह बँकेत स्वतंत्र खाती उघडून संस्थेच्या नावे आर्थिक मदत जमा केली जाते.

देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड

सुमारे १६० प्रकारच्या विविध व दुर्मीळ वृक्षांची लागवड येथे करण्यात आली आहे. ही संख्या तीनशेपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काही निवडक वृक्षांची नावे पुढीलप्रमाणे. सप्तपर्णी, कांतेश्‍वर, चारोळी, कोकम, वावळ, लोखंडी, त्रिफळा, फणस, निरफणस, गावठी आंबा, आवळा, चारोळी, बेल, कवठ, रिठा, करमळ, सातवी, पिंपरी, नांदृक, सातवीण, पुत्रजीवी, बेहडा, कदंब, शिरीष, बकुळ, अर्जुन, काटेसावर, मुचकुंद, सोनचाफा, गोरख व बंगाली चिंच, सुरंगी, काळे व सफेद जांभूळ, जंगली बदाम, महारुख, भेरलीमाड, वाळुंज, कुसुम, शिवण,आपटा, कांचन, भोकर, बहावा, रूद्राक्ष, अजानवृक्ष, कृष्णवड.

Mohadi Devrai
Environment Conservation : पर्यावरणासाठी झुंजतोय सह्याद्रीचा ‘सुंदरलाल बहुगुणा’

नैसर्गिक सौंदर्यवाढीसाठी पुढाकार

झाडांसमेवत आता विविध गवतवर्गीय वनस्पतींचे संवर्धन केले जात आहे. जैवविविधतेला चालना मिळाल्याने फुलपाखरे, मधमाशी, अन्य कीटक, पक्षी यांचा अधिवास वाढला आहे. परागीभवनाला चालना मिळाली आहे. देवराईच्या परिसरातील बंधाऱ्याचे सुशोभीकरणाचे कामही आता प्रगतिपथावर आहे. त्यामध्ये सभोवताली सी आकाराचा ट्रॅक, नारळ, सुपारी, शिंदी आदी झाडे वाढीस लागली आहेत.

अलीकडेच सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले दोनदिवसीय बीज संमेलन पुणे येथे झाले. या वेळी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सयाजी शिंदे व अरविंद जगताप उपस्थित होते. सह्याद्री देवराई व मोहाडीच्या या देवराईचे समन्वयक म्हणून दत्ता जाधव यांच्याकडे जबाबदारी आहे. तर त्यांना सदस्य सुदर्शन पाटील व अन्य सहकाऱ्यांची मोठी मदत मिळते.

...असे केले सिंचन व्यवस्थापन

पंधरा एकरांवर असलेल्या झाडांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीन एकर क्षेत्रावरील जुना तलाव हस्तांतरित करण्यात आला आहे. येथे विहीरही आहे. पूर्वी या तलावातून गावाला पाणीपुरवठा केला जायचा. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी देवराईच्या सदस्यांनी आदर्श पद्धतीने सिंचन व्यवस्थापन केलेले आहे. तलावात दरवर्षी वाघाड धरणातून पाणीपुरवठा होऊन पाणी संचयन केले जाते.

हेपाणी उपसण्यासाठी सौरपंपाचा वापर केला जातो. झाडांच्या बुंध्याजवळ ठिबक सिंचन केले आहे. त्यासाठी केंद्रीय पद्धतीची यंत्रणा उभारली आहे. सिंचनासाठी उभारलेल्या पाइपलाइनसाठी चर खोदण्यात आले. ते अर्धे बुजवून घेण्यात आले होते. त्यावरील चरात पावसाचे पाणी साठवले जाते. हेच पाणी झाडांना उपलब्ध होते. त्यामुळे मृदा व जलसंधारण उपचारांचा फायदा वृक्ष लागवडीला झाला आहे. त्यामुळे झाडांची मरतुक न होता वनसंपदा बहरली आहे.

भविष्यातील संकल्पना

दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होऊन माणूस निसर्गाच्या सान्निध्यात रमला पाहिजे यासाठी काही सोयी करण्यात येणार आहेत. यात ‘मेडिटेशन हॉल’, वनस्पती उद्यान (बोटॅनिकल गार्डन), फ्लॉवर तसेच रॉक गार्डन, हरित व्यायामशाळा, वाचनालय, सायकल ट्रॅक अशा या. संकल्पना आहेत. गावातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी जनजागृती, लाकडाला पर्याय देत शुद्ध पर्यावरणपूरक पद्धतीने गोवरी, गाईचे तूप, कापूर वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार आदी कार्यांना चालना देण्यात आली आहे.

ट्री म्युझियम

ट्री म्युझियम हा देवराईचाच भाग आहे. मात्र अभ्यासकांसाठी त्याचा विशेष उपयोग होणार आहे. त्याची वैशिष्ट्ये अशी.

म्युझियमच्या परिसरात फिरण्यासाठी श्रमदानातून दगड व मुरमांच्या साह्याने वनरस्ते तयार करण्यात आले आहेत.

दहा बाय १० फूट अंतरावर वृक्ष लागवडीचे नियोजन

प्रत्येक झाडाची माहिती देण्यासाठी त्यास ‘क्यूआर कोड’सह टॅगिंग.

संरक्षणासाठी वनभिंत म्हणून १५०० बांबू झाडांची लागवड.

देशी प्रजातींच्या फळझाडांचा स्वतंत्र विभाग.

देखभाल व संरक्षण करण्यासाठी रक्षकांची नेमणूक

निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा.

श्रमदानातून दगड, मुरूम अस्तरीकरण करून पाच फूट रुंदीचे रस्ते.

दत्ता जाधव ९७६७३८०७२६ (समन्वयक, देवराई) ,

सुदर्शन पाटील ९९२३७०१०४६ (सदस्य)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com