Environment Conservation : पर्यावरणासाठी झुंजतोय सह्याद्रीचा ‘सुंदरलाल बहुगुणा’

Save Natural Forest Resources : हवामान बदलाच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी नैसर्गिक वनसंपदा वाचवा, अशी हाक जगभरातील पर्यावरणवाद्यांनी दिली आहे.
'Sunderlal Bahuguna'
'Sunderlal Bahuguna'Agrowon

Pune News : हवामान बदलाच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी नैसर्गिक वनसंपदा वाचवा, अशी हाक जगभरातील पर्यावरणवाद्यांनी दिली आहे. ही हाक राज्याला अजूनही ऐकू येत नसल्याने सह्याद्रीतील वनसंपदा झपाट्याने नष्ट होत आहे. अशावेळी सूर्यकांत ऊर्फ बाळासाहेब मारुती पांचाळ नावाचा निसर्गप्रेमी जीव धोक्यात घालून महाबळेश्‍वर पर्वतरागांत गेल्या दोन दशकांपासून देत असलेला एकाकी लढा चर्चेचा विषय ठरतो आहे. हा लढा पाहून त्यांचे काही मित्र त्यांना सह्याद्रीचा सुंदरलाल बहुगुणा असे म्हणतात.

पर्यावरणवाद्यांनाही प्रेरणादायी ठरणारी जीवनकहाणी बाळासाहेबांची आहे. सुतार काम करणाऱ्या बाळासाहेबांचे शिक्षण अवघे नववीपर्यंत झालेले आहे. “घरची गरिबी असल्यामुळे सुतार काम करीत शाळा शिकत होतो. १९९० ते १९९५ च्या काळात महाबळेश्‍वर भागात मोठी वृक्षतोड चालू होती. त्याच्या बातम्या सतत येत होत्या.

'Sunderlal Bahuguna'
Forest Conservation : अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

त्यामुळे आम्ही शालेय मित्र अस्वस्थ होतो. आम्ही स्वतः एकदा वृक्षतोड पाहिली. त्यामुळे आमचा संताप अनावर झाला व छाटलेल्या एका फांदीची आम्ही मित्रांनी प्रतिकारात्मक प्रेतयात्राच काढली. यापुढे वृक्षतोड झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा मी दिला. झाडाविषयी मी इतका हळवा झालो होतो, की पोलिसांसमोर मी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पर्यावरणासाठी दिलेला माझ्या आयुष्यातील हा पहिला लढा होता,” असे बाळासाहेब अभिमानाने सांगतात.

पोलिसांनी बाळासाहेबांवर गुन्हा दाखल केला व न्यायालयासमोर उभे केले. “मला जगायचे आहे. मी हे सारे सरकारला जागे करण्यासाठी केले आहे,” असे बाणेदार उत्तर बाळासाहेबांनी न्यायालयात दिले. त्यानंतर त्यांची मुक्तताही झाली. पर्यावरणप्रेमासाठी एका शाळकरी मुलाने मोर्चा काढला आणि अंगावर रॉकेल ओतून घेतले, अशी बातमी १९९० च्या दशकात पर्यावरणप्रेमींमध्ये पसरली.

त्यामुळे महाबळेश्‍वरमधील वृक्षतोडीचा विषय राज्यभर चर्चेला आला. त्यामुळेच महाबळेश्‍वरचे पर्यावरण वाचविण्यासाठी पुढे बॉम्बे एन्व्हायर्न्मेंट ग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात पहिली याचिका दाखल केली. याचिकाकर्ते बाबासाहेबांच्या संपर्कात होते. पर्यावरणप्रेमी श्‍याम नैनानी यांनी या समस्येचा पाठपुरावा केला. महाबळेश्‍वरला पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी बाळासाहेब व नैनानी यांनी चळवळ उभारली.

'Sunderlal Bahuguna'
Forest Conservation : जंगल, जमीन, जल यांचे संवर्धन हे राष्ट्रीय कार्य

पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र गोळा करण्याची किमया बाळासाहेबांनी केली. त्याची फलश्रुती म्हणजे २००१ मध्ये महाबळेश्‍वर भागाला राज्यातील पहिले पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले गेले. त्यामुळे वृक्षतोडीसह बांधकामे, उत्खनन, मानवनिर्मित जुनी किंवा निसर्गनिर्मित स्थळांची हानी करण्यावर बंदी आणली गेली. पर्यावरणाला अजिबात धक्का न लावता महाबळेश्‍वरचा विकास करावा, अशी अधिसूचना केंद्राने जारी केली. ही सारी किमया बाळासाहेबांच्या चळवळीची होती.

“पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून महाबळेश्‍वरची घोषणा होऊन देखील बिल्डर व जंगल माफिया थांबत नव्हते. गुपचूप वृक्षतोड, उत्खनन केले जात होते. वणवे पेटवले जात असत. शेतकरी, ग्रामस्थ माझ्या संपर्कात असायचे. मी धावून जायचो. बांधकामांविरोधात तक्रारी करायचो. त्यामुळे प्रशासनाला बांधकामे बंद पाडावी लागत होती. त्यामुळे दुखावलेल्या लॉबीने माझ्याविरोधात कारस्थान रचले. २००४ मध्ये जागतिक पर्यावरणदिनी माझ्या घरावर हल्ला झाला. तक्रारींचा पाठपुरावा करणाऱ्या साऱ्या फायली घरातून पळवून जाळून टाकल्या. मी घरात नसल्यामुळे बचावलो. माझ्यावर खंडणीचेही आरोप झाले. तडीपारीची कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी स्वतः प्रत्येकाला पुरून उरलो,” असे बाळासाहेब निर्धारपूर्वक सांगतात.

‘निसर्ग हाच माझा संसार’

‘‘निसर्गाला मी माझा संसार मानले आहे. त्यासाठी मी विवाहदेखील केला नाही. मला गुंडांनी धमक्या दिल्या, अनेकदा लाच देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी लढा सुरू ठेवला आहे. पर्वतरांगांमधील गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांत येणाऱ्या अडचणींमध्ये मी मदत करतो. या लढ्यात अनेकांनी साथ दिली व नंतर ते सोडूनही गेले. मात्र कुणाची साथ मिळो न मिळो; जीव गेला तरी मी लढत राहीन,’’ असे पांचाळ म्हणाले.

(संपर्क ९४०५५४९२६६)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com