Agri Tourism : मावळ तालुका झालाय ‘कृषी पर्यटन हब’

Krishi Paryatan Kendra : सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये मनमुराद पर्यटन करण्याचा आनंद घेण्याकडे शहरी लोकांचा असलेला कल लक्षात घेऊन मावळ (जि. पुणे) तालुक्यातील अनेक निसर्गरम्य भागांत कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत.
Agri Tourism
Agri TourismAgrowon
Published on
Updated on

Agriculture Tourism Business : शहरे, महानगरांमधील धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. आठवड्याच्या सुट्टीत शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाचा आनंद घेण्याकडे शहरी लोकांचा कल वाढला आहे. त्यातूनच ग्रामीण वा कृषी पर्यटन व्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका भाताचे आगार म्हणून ओळखला जाते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांगा, पवना धरण, नद्या, धबधबे, तिकोना, लोहगड आदी किल्ले, विविध लेणी अशा वैविध्यपूर्ण समृद्धीमुळे मावळ तालुका पर्यटनाचे मुख्य आकर्षण बनला आहेत.

या संधीचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांनी करून घेऊन आपले अर्थकारण उंचावले आहे. तालुक्यात सन २००७-०८ मध्ये कडधे गावात पहिले मावळ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. आजमितीला कडधे, बेडसे, करूंज, पवनानगर परिसरात सुमारे ३० ते ४० कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिली आहेत.

एक तपाहून अधिक काळाच्या कष्टातून काहींनी नद्यांच्या काठी, काहींनी धरणाच्या तर काहीनी डोंगराच्या कडेला केंद्रे उभारली आहेत. त्यासाठी बॅक आणि कृषी विभागाची मोठी मदत होत आहे. महाराष्ट्र कृषी पर्यटन महामंडळाकडे त्याची नोंदणी झाली आहे. तालुका कृषी अधिकारी दत्ता पडवळ, कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी अनेक केंद्रचालकांना प्रोत्साहन देऊन मदत केली आहे.

Agri Tourism
Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

पर्यटन केंद्रांची वैशिष्ट्ये व सुविधा

  • जास्तीत जास्त नैसर्गिक अनुभव देण्याचा प्रयत्न.

  • ‘इको हाउस’ बांधताना माती, दगडाच्या भिंती, पाइनवूड, गोणपाट आदी नैसर्गिक साधनांचा वापर,

  • विजेसाठी सौरऊर्जा, जेवणासाठी सुपारीच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या ‘इको प्लेट्स’.

  • नैसर्गिकरीत्या तयार झालेले खोल व अनेक वळणांचे रांजणखळगे. त्यातून पाण्याचा वाहता प्रवाह.

  • नैसर्गिक ओढे. तसेच ‘स्वीमिंग टँक’चीही निर्मिती.

  • पावसाळ्यात भात लावणी महोत्सवाच्या माध्यमातून भातशेतीत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव. सेंद्रिय शेती, रोपवाटिका, ‘परमाकल्चर, जिवामृत तसेच पालापाचोळ्यापासून खत निर्मिती प्रात्यक्षिक.

  • टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती

  • ‘इको फ्रेन्डली’ गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा

  • रानभाज्या महोत्सव

  • जंगलातील भटकंती विलक्षण अनुभव देणारी असते. त्याचा आनंद देणारी व्यवस्था.

  • अजिवलीची देवराई हे त्यातील एक प्रातिनिधिक उदाहरण.

  • तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरणात इथल्या खडकावर निवांत पहुडता येते. आकाशाच्या असीम अथांगतेचे दर्शन डोळ्यात साठवता येते असा अनुभव घेता येतो.

  • पश्चिम घाटातील समृद्ध वनवैभव, पक्षी निरीक्षण देखील ट्रेकिंग व व अभ्यासकांसाठी पर्वणी ठरली आहे.

पर्यटकांची मिळतेय पसंती

येथील केंद्रांमधून अस्सल ग्रामीण पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी व मांसाहारी भोजन देण्यात येते. नाश्‍त्यासाठी घावन, थालीपीठ, मिसळ तर जेवणात पोळी, भाकरी, भरले वांगे, पिठले, ठेचा, मटकी उसळ, रानभाज्या, अळू, कोंथिबीर वडी, कढी खिचडी, वरणभात असा बेत असतो. राहण्यासाठी पक्क्या स्वरूपातील खोल्या तसेच तंबूंही उभारले आहेत. एकदिवसीय सहलीसाठी अनेक केंद्रांवर ५ ते १०० व्यक्तीची सोय उपलब्ध आहे. या भागात प्रति शिर्डी साई मंदिर, प्रति पंढरपूर आदी धार्मिक स्थळेही आहेत.

Agri Tourism
Agri Tourism Center : ‘आठवण मातीची, साठवण गोड क्षणांची

साहजिकच कौटुंबिक सहली, स्नेहसंमेलन, शाळा, काँलेजच्या सहली, अभ्यासदौरे, योगा कार्यशाळा, संस्था, कंपन्यांचे प्रशिक्षण, उन्हाळी, हिवाळी शिबिरे, वाढदिवस, साखरपुडा, मुंज, संगीत, वाचन, साहित्य आदी विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी लोक या केंद्रांना पसंती देऊ लागले आहेत.

शेती हा कृषी पर्यटनाचा पाया आहे. भातपिकासोबत भाजीपाला, फळझाडांची लागवड, काढणी या प्रक्रियांमध्ये पर्यटकांना आवर्जून सहभागी करून घेण्यात येते. भात लावणीसाठी मावळ अॅग्रो, कृष्णाई, तिकोना, पवना हट, अंजनवेल कृषी पर्यटन आदी स्थळे पर्यटकांच्या विशेष आवडीची झाली आहेत. यंदाच्या जुलैमध्येही अनेक शहरी लोकांनी भातलावणीचा आनंद लुटला.

आम्ही बेडसे लेणीच्या पायथ्याशी सुरुवातीला चहाची टपरी उभारली होती. माझी पंचवीस एकर शेती आहे. पैकी आज दीड एकरांत कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. वीस लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. ते फेडून पुन्हा वीस लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. आता निवासाच्या दृष्टीने खोल्या बांधल्या आहेत. दर महिन्याला ४०० पर्यंत पर्यटक भेटी देतात. त्यातून महिन्याला लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यातून कुटुंबाचे अर्थकारण सक्षम केले आहे. सहा मजुरांना रोजगार दिला आहे. पर्यटकांची संख्या चांगली असल्याने रस्त्यांच्या सुधारणा झाल्या आहेत.

स्वप्नील दहिभाते ७२६३९३३७५०

(कृष्णाई कृषी पर्यटन केंद्रचालक)

मी पदवीधर आहे. आमचा भाग डोंगराळ व निसर्गरम्य असून स्वच्छ हवा, पाणी आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र हळूहळू त्यावर मात करत दोन एकरांत केंद्र उभारले आहे. दहा एकर शेती कराराने घेतली आहे. येथे बोटिंगची व्यवस्था आहे.

फळबाग, बांबू लागवड केली आहे. त्यासाठी सुमारे तीस लाख रुपयांचा खर्च टप्याटप्याने केला आहे. दर महिन्याला १०० ते त्याहून अधिक पर्यटक येतात. सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना देण्यात येतात. महिन्याला काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तालुक्यात केंद्रांची संख्या वाढल्याने दळणवळण वाढले आहे. पर्यटक शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे, तांदूळ यांची थेट खरेदी करतात. किराणा दुकाने, हॉटेल्स यांचीही संख्या वाढली आहे.

ओमकार कालेकर ८३९०९७४६१५

(मावळ कृषी पर्यटन केंद्र)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com