Nanded APMC : हळदीसाठी प्रसिद्ध नांदेडची बाजार समिती

Article by Krushna Jomegaonkar : नांदेड येथील नवा मोंढा बाजार समिती हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतील शेतकरीही येथे हळद विक्रीस आणतात. वर्षाला सुमारे सव्वा तीन लाख क्विंटल हळदीची येथे आवक होते. येथील हळद विविध राज्यांना पुरविली जाते.
Nanded Bajar Samiti
Nanded Bajar SamitiAgrowon

Nanded APMC famous for Turmeric : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवीस वर्षांपासून हळदीची मुख्य बाजारपेठ म्हणून नावारूपास आली आहे. नवा मोंढा नावाने ओळख असलेल्या या बाजारात नांदेड जिल्ह्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात.

येथील हळद खरेदी करण्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी राज्यांमधून व्यापारी येतात. खरेदी केलेल्या हळदीचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत मिळावेत यासाठी बाजार समिती आग्रही असते.

बाजार समितीविषयी

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना निजाम राज्यात १४ नोव्हेंबर १९३० रोजी झाली. सुरुवातीच्या काळात गूळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजारात काळानुरूप बदल होत गेले. हळद, संकरित ज्वारी, भुईमूग, करडई, तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा आदी मालांची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

मागील काही वर्षांपासून सोयाबीनची आवकही वाढली आहे. सध्या अन्य शेतीमालाची खरेदी गावस्तरावर होत असली, तरी हळद विक्रीसाठी मात्र शेतकऱ्यांना नांदेडच्याच नवा मोंढा बाजारात यावे लागते.

Nanded Bajar Samiti
Wasmat Turmeric : पिवळ्या सोन्याला ‘जीआय’चे कोंदण

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नांदेड, अर्धापूर हे तालुके तसेच मुदखेड तालुक्यातील मिळून सुमारे १८८ गावे येतात. या गावांमधून बाजार समितीचे संचालक निवडून दिले जातात. बाजारात लोहा, भोकर, नायगाव या तालुक्यांसह शेजारील कळमनुरी व वसमत (जि. हिंगोली), पूर्णा (जि. परभणी) या भागातील शेतकरीदेखील माल विक्रीस आणतात.

नांदेड शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या या बाजार समितीचा परिसर सुमारे ४७.१५ एकरमध्ये विस्तारला आहे. प्रवेश करण्यासाठी पाच ठिकाणी भव्य कमानी आहेत. शेतीमाल साठवणुकीसाठी पत्र्याची सात शेड्‍स आहेत.

लिलाव पद्धतीने विक्री

आवारात १४ हजार चारशे चौरस फूट व नऊ हजार सहाशे चौरस फूट आकाराची दोन शेड्‍स आहेत. सर्व बाजूनी संरक्षित कडे लावले आहेत. दररोज सकाळी साडेदहा वाजता शेतकरी, खरेदीदार, अडते, बाजार समितीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत खुले लिलाव होतात.

उच्च बोली लावलेल्या खरेदीदाराला शेतकऱ्याच्या सहमतीने हळद विक्री होते. शेतकऱ्यांना एका दिवसात ‘पेमेंट’ दिले जाईल अशी सुविधा केली आहे.

मिळणाऱ्या सुविधा

शेतकऱ्यांचा माल सुरक्षित राहावा यासाठी २४ तास सुरक्षारक्षकांचा पाहारा असतो. माल मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे. शेतकऱ्यांसाठी विश्रांतीची सोय व शुद्ध पाण्याची उपलब्धता केली आहे.

माल विक्रीबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास बाजार समिती प्रशासन, व्यापारी व खरेदीदार यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढला जातो. स्वच्छतागृहे व शौचालय सुविधा आहे.

Nanded Bajar Samiti
Turmeric Production : हळदीच्या उत्पादकतेत घट, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

नांदेड जिल्ह्यातील हळद : नांदेड जिल्ह्यात सुमारे तीस हजार हेक्टरवर हळद पीक घेण्यात येते. यात नांदेड, अर्धापूर, मुदखेड, उमरी, भोकर, हदगांव, लोहा या तालुक्यांचा समावेश होतो. सिंचनाची सोय तसेच सुपीक जमीन असलेल्या भागात हळदीची लागवड अधिक होते. या भागांना ईसापुर येलदरी सिद्धेश्वर या प्रकल्पाचे पाणी मिळते.

सोबतच काही शेतकरी विहीर तसेच कूपनलिकेच्या पाण्यावर हळदीचे पीक घेतात. बहुतांशी सर्वच शेतकरी गादीवाफा, ठिबक सिंचन यांचा वापर करतात. जिल्ह्यात हळदीची उत्पादकता एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत (वाळवलेली)आहे. काही शेतकरी एकरी चाळीस क्विंटलपर्यंत ही उत्पादन घेतात. सुधारित व्यवस्थापनाची जोड दिल्याने उत्पादनवृध्दीसह हळदीची गुणवत्ता वाढवणेही त्यांना शक्य झाले आहे.

आवक व दर : बाजार समितीत दरवर्षी होणाऱ्या एकूण शेतमालाच्या आवकेत हळद प्रमुख असते. प्रातिनिधिक मागील आर्थिक वर्षाबाबत (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) बोलायचे तर हळदीची दोन लाख, ७० हजार ५६२ क्विंटल आवक झाली. यास कमाल दर प्रति क्विंटल २७ हजार पाचशे, किमान दर चार हजार सातशे, तर सरासरी दर १० हजार पाचशे रुपये मिळाल्याचे बाजार समितीचे कर्मचारी रवी कल्याणकर यांनी सांगितले.

अलीकडील वर्षांतील हळदीची आवक (क्विंटल) दर (रुपये)

वर्ष आवक कमाल किमान सरासरी

२०२०-२१ ३,१६,८७७ १५,००० ३,६०० ५,६१७

२०२१-२२ ३,२५,९६२ १२,५०० ४,१०० ७,११५

२०२२-२३ ३,२०,१६६ १०,०११ ५,००० ६,३२२.

शेतकऱ्यांकडून हळदीची खरेदी झाल्यानंतर त्याची विविध स्वरूपात प्रतवारी होते. मागणीनुसार दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, तमिळनाडू, गुजरात आदी राज्यांमध्ये ती पाठविली दाते.
बद्रीनारायण मंत्री, हळद खरेदीदार, नांदेड
नवा मोंढा बाजार हळदीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती कार्यशील आहे. त्याच पद्धतीने सर्व सुविधा पुरवल्या जातात.
साहेबराव बाऱ्हाटे ९८८१३८४०६९, सचिव, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com