
Agriculture Success Story: पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील महाबरेवाडी येथील महाबरे कुटुंबाची तीन एकर शेती आहे. सध्या शेतीची जबाबदारी सत्तावीस वर्षे वयाचा आकाश वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व मोठे बंधू वैभव यांच्या साथीने सांभाळतो आहे. कुटुंबाला सुमारे वीस वर्षांपासूनचा फुलशेतीचा अनुभव आहे. आकाश संपूर्ण तीन एकरांत फुलशेती करतात. त्यांनी वर्षभरात विविध फुलांच्या लागवडीचे नियोजन निश्चित करून घेतले आहे. यात वर्षभर वीस ते तीस गुंठ्यांत टप्प्याटप्प्याने झेंडू असतो.
दोन लागवडींत सुमारे १५ ते २० दिवसांचे अंतर असते. म्हणजे एक प्लॉट संपत आल्यानंतर दुसऱ्याचे उत्पादन सुरू राहते. कोलकाता झेंडू या वाणाची प्रामुख्याने लागवड असते. या वाणाचे फूल आकाराने मध्यम, जाड असून पाकळ्या घट्ट असतात. त्यामुळे टिकवण क्षमता जास्त असते. त्यातून वाहतुकीमध्ये दर्जा खालावत नाही. केशरी रंगामुळे बाजारात चांगला उठाव असतो. हार आणि सजावटीसाठी या फुलाला वर्षभर चांगली मागणी असते.
व्यवस्थापन व उत्पादन
लागवडीनंतर साधारण ४५ दिवसांनी काढणी सुरू होते. पुढे ६० दिवस हंगाम चालतो. एक एकर क्षेत्रात लागवड केल्यास सहा ते नऊ टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. अर्थात, वाणाची निवड, हवामान आदी गोष्टींवर ते अवलंबून असते. आकाश म्हणाले, की मागील तीन वर्षांपासून एप्रिल-मे या काळात किलोला १०० ते १२० रुपये दर झेंडूला मिळत आहे. लग्नसराई, वेगवेगळे इव्हेंट्समध्ये या फुलाला मागणी असते. उन्हाळ्यात गावांच्या यात्राही असतात. त्यातही चांगली मागणी असते.
आकाश म्हणाले, की यंदा कोलकाता फुलांचा उन्हाळी प्लॉट संपत आला आहे. तो संपण्याच्या आधी दुसरा प्लॉट सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३० गुंठ्यांत जंबो आकाराच्या झेंडूच्या वाणाचा प्रथमच प्रयोग केला आहे. या फुलांची उत्पादनक्षमता चांगली आहे. ही फुले ऐन उन्हाळ्यात लग्न हंगामात साधारण मे महिन्यात सुरू होतील. पुढे जून- जुलैपर्यंत ती सुरू राहतील.
गुढीपाडवा, अक्षय तृतीया या सणांना चांगले दर मिळतील असे नियोजन आहे. अलीकडील काळात फुलांच्या विविध जाती बाजारात उपलब्ध झाल्या असून, शेतकऱ्यांना निवडीसाठी वाव तयार झाला आहे. आकाश सांगतात, की झेंडू लागवडीनंतर सुमारे २० दिवसांनी मातीची भर लावताना गांडूळ खताच्या एकरी पाच ते सहा बॅग्ज (प्रति ५० किलोची) एवढा वापर करतो. त्या वेळी जिवाणूखताच्या स्लरीचाही ठिबकमधून वापर करतो. त्यामुळे जमिनीतील बुरशीलाही अटकाव होतो. रोपे लागवडीपूर्वी रोपवाटिकेकडे रोपे तयार करण्यास दिली जातात. झिगझॅग पद्धतीने लागवड करतो. व्यवस्थापन चोख ठेवल्याने उत्पादन व दर्जा चांगला मिळतो.
बिजली, शेवंतीची शेती
बिजलीच्या पांढऱ्या फुलांना मार्गशीर्ष काळात चांगली मागणी असते. हे ओळखून दसरा झाल्यानंतर त्याची लागवड केली जाते. त्यानंतर अडीच महिन्यांनी प्लॉट सुरू होतो. पुढे अडीच महिना तो सुरू राहतो. सुमारे अर्धा एकर क्षेत्रात दोन ते अडीच टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. या फुलांना किलोला ५० रुपये दर मिळतो. मार्गशीर्षातील हळद-कुंकू तसेच पुढील शिवरात्रीच्या काळापर्यंत या फुलांचा बाजारपेठेत उठाव असतो असे आकाश म्हणाले. मे अखेरीस या फुलाची लागवड होते.
गणपती उत्सव, दसरा, दिवाळी व पुढे मार्गशीर्षपर्यंत या फुलांना उठाव राहतो. या फुलाला आतून भगवा व बाहेरून पिवळसर असा दुहेरी रंग असतो. त्यामुळे त्याला मागणीही चांगली असते. शिवाय त्याची टिकवणक्षमताही चांगली असल्याने व्यापाऱ्यांकडून त्यास दूरच्या बाजारपेठेसाठी पसंती असते. गणपती, दसरा आदी काळात किलोला १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. तसा वर्षभराचा विचार केल्यास किमान ५० रुपये व कमाल १५० रुपयांपर्यंत त्याला दर राहतो.
विक्री व्यवस्था
सर्व फुलांची विक्री दादर येथील फुलबाजारपेठेत केली जाते. आकाश परिसरातील १५ ते २० गावांतील सुमारे ३५ ते ४० फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून ते फुलांचे संकलन करून त्यांचीही विक्री करतात. फुले बाजारात पाठविण्यापूर्वी स्वच्छ प्लॅस्टिक क्रेंटमध्ये स्वच्छ कागदांचे आवरण लावून फुले व्यवस्थित भरली जातात. क्रेटमुळे हवा खेळती राहते. या पॅकिंग व्यवस्थेमुळे वाहतुकीदरम्यान गरम न होता फुलांचा दर्जा टिकून राहतो.
त्यामुळे बाजारात त्यांना चांगला दर मिळतो. सुमारे २० किलोच्या क्रेटमध्ये १२ ते १३ किलो फुले असतात. उन्हाळ्यात बहुतांश ठिकाणी पाण्याची टंचाई असते. मराठवाडा विभागासह, सोलापूर, धाराशिव परिसरात झेंडूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. दसरा दिवाळीला या भागातून झेंडूची मोठी आवक होत असते.
मात्र उन्हाळ्यामध्ये या भागांमध्ये पाणी नसल्याने येथून आवक रोडावते. मार्च ते मे- जून दरम्यान लग्नसराई दरम्यान बाजारही चांगले असतात. अशावेळी आपल्या झेंडूला फायदा मिळावा असा आकाश यांचा प्रयत्न असतो. त्यांना कुकडी नदीचा फायदा मिळतो. या नदीशेजारी असलेल्या विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी सोडण्यात येते. शिवाय ठिबक सिंचन आहे. फुलांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. जून महिन्यात शेवंतीसह विविध रंगी गुलाब लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.
आकाश महाबरे ७४१४९३८९११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.