

Mahabaleshwar Strawberry Farming : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पर्यटन स्थळ सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथील स्ट्रॉबेरीची शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उत्पाद नांचीही बाजारपेठ तयार होऊन देशभर ग्राहक निर्माण झाला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी म्हणजे कोरोनाच्या काळात येथील स्ट्रॉबेरी उद्योग अडचणीत आला होता.
आता तो चांगल्या प्रकारे स्थिरावला आहे. या उद्योगाची क्षमता विचारात घेतली, तर बहुतांश शेतकऱ्यांचे मुख्य पीक स्ट्रॉबेरीच असल्याने कमी अधिक स्वरूपात प्रत्येकाकडे हे पीक दिसून येते. एकट्या महाबळेश्वर तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार एकरांत लागवड होते.
यंदाचा स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामातील पावसाचा मुक्काम वाढल्याने दरवर्षीच्या सप्टेंबर महिन्याऐवजी एक महिना उशिरा म्हणजे ऑक्टोबरमध्ये तो सुरू झाला. पावसामुळे रोपांचे नुकसानही झाले. तरीही सरासरीइतकी लागवड या हंगामात झाली. विविध लोकप्रिय वाणांचे मदर प्लॅंट आणून हरितगृह तसेच वाई, जावळी तालुक्यांत रोपे तयार करण्यात आली.
उशिरा लागवड झाल्याने महाबळेश्वर, पाचगणीमध्ये दिवाळीत येणाऱ्या पर्यटकांना स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. डिसेंबरच्या अखेरीस उत्पादन मिळू लागले. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत ते चांगले मिळत राहिले.
मार्च महिन्यापासून तापमानवाढ झाल्याने वाढीवर परिणाम झाला. उन्हामुळे लहान फळे पक्व झाली. यामुळे बाजारात आवक जास्त झाली होती. पावसाचा मुक्काम व तापमान वाढ यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले. तरीही शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादनाचे प्रयत्न सुरूच ठेवले.
शेतकऱ्यांकडून होणारे ‘मार्केटिंग’
महाबळेश्वर तालुक्यात शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी न्याहरी निवासांतर्गत कृषी पर्यटन केंद्रे सुरू केली आहेत. हंगामात काही हजार पर्यटक हजेरी लावत असतात. त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी उपलब्ध केली जातेच. शिवाय काही शेतकरी पर्यटकांना शेतात थेट स्ट्रॉबेरी तोडण्याचा व खाण्याचा आनंद उपलब्ध करून देतात.
हा पर्यटकांसाठी वेगळा अनुभव असल्याने ताज्या ताज्या स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळण्यात मदत होते. वाई- महाबळेश्वर रस्त्याकडेलाही शेतकऱ्यांनी उभारलेले स्टॉल दिसून येतात.दररोज ‘फ्रेश स्ट्रॉबेरी’ तोडून स्टॉलवर मांडली जाते. रासबेरी, ब्लूबेरी आदी फळांसह मधाची विक्रीही येथे केली जाते. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळता राहतो.
प्रीकूलिंगची सोय
स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी सध्या प्रीकूलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संस्था, ग्रामपंचायत तसेच खासगी कंपन्यांची मिळून सुमारे २० प्रीकूलिंग युनिट्स महाबळेश्वर भागात आहेत. दररोज या युनिट्समधून सरासरी १४ ते १५ टन स्ट्रॉबेरी ‘रेफर व्हॅन’च्या माध्यमातून अन्य राज्यांत पाठवली जाते. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा चाखण्यास मिळतो.
दरांचा गोडवा
यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी दर मात्र समाधानकारक राहिले आहेत. ताज्या फळास हंगामाच्या सुरुवातीस किलोला २५० ते ३०० रुपये व त्यानंतर सरासरी १०० ते २०० रुपये दर मिळाल्याचे शेतकरी सांगतात. महाबळेश्वर- भिलार परिसरात स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करणारी मोठी युनिट्स आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यातील उत्पादन हे प्रक्रियांसाठी वापरले जाते.
त्यास किलोला ३० ते ६० रुपये दर मिळतो. नैसर्गिक कारणांमुळे यंदा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दरांचा मात्र गोडवा मिळाला आहे. या भागात स्ट्रॉबेरीपासून अनेक उत्पादने शेतकरी तयार करू लागले आहेत. यामध्ये पल्प, क्रश, जॅम, जेली, ज्यूस तसेच सुकी स्ट्रॉबेरी आदींचा समावेश आहे. राज्यासह परराज्यातही त्यास बाजारपेठ मिळाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील उत्पादनाची बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
‘क्यूआर कोड’चा वापर
राज्यात अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी घेतली जाते. मात्र महाबळेश्वरचे थंड व भौगोलिक हवामान पाहता येथील स्ट्रॉबेरीचा स्वाद व चव काही वेगळीच असते. काही ठिकाणी काही व्यावसायिक महाबळेश्वरच्या नावाने स्ट्रॉबेरीची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करतात. हा धोका कमी करण्यासाठी येथील काही शेतकऱ्यांकडून पॅकिंगवर ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे.
त्या माध्यमातून स्ट्रॉबेरी उत्पादकाचे नाव, गाव, ठिकाण, फळातील पोषण मूल्ये (न्यूट्रिशन व्हॅल्यू), तोडणी, सेंद्रिय फळ असल्यास त्याचे प्रमाणपत्र व छोटासा व्हिडिओ या बाबी ग्राहकांसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना केवळ महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.