Sustainable Agriculture: एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ

Sustainable Agricultural Systems: ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुक्यांतील सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री व्हीआरएस कृषी सेवा संघाची स्थापना केली. या सामूहिक शक्तीतून लागवड ते काढणी, विक्रीपर्यंतची व्यवस्था त्यांनी तयार केली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Sustainable Farming Practices: सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हे दुष्काळी तालुका आहेत. या भागातील द्राक्ष उत्पादकांनी शेततळी बांधून पाण्याची शाश्‍वती तयार करून द्राक्षांची सातासमुद्रापार निर्यात करण्यात यश मिळवले आहे. विटा या प्रसिद्ध शहरापासून पंधरा- वीस किलोमीटरवर भूड हे खानापूर तालुक्यातील शेवटचे गाव आहे. या गावानेही दुष्काळाचे चटके सोसले. गावातील बरेच लोक परराज्यांत गलाई व्यवसायात गुंतले आहेत. पाच वर्षांपूर्वी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्याने गाव पाणीदार झाले आहे. बागायती क्षेत्र वाढून शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.

संघाची स्थापना

गाव परिसरातील राहुल कदम, विक्रांत फाळके, विष्णू कांबळे, अक्षय कदम, रोहन देशमुख, रवींद्र पवार, शिवाजी गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी विविध भाजीपाला पिके घ्यायचे. स्थानिक पातळीवर विक्री व्हायची. त्या वेळी अपेक्षित दर व उत्पन्न न मिळणे, मागणी कमी असणे या मुख्य समस्या असत. एकत्र आल्यास सामूहिक शक्तीतून अडचणी दूर होतील असे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यातूनच २०१५ मध्ये सदस्यांच्या आद्याक्षरांचा वापर करून त्यांनी श्री व्हीआरएस कृषी सेवा संघाची स्थापना केली.

Agriculture
Agriculture Success Story: फळपिकांसह माती, पर्यावरणाचेही जपले आरोग्य

खानापूर व आटपाडी तालुक्यांतील २० ते २५ किलोमीटर परिघात असलेल्या गावांमधील शेतकरी संघाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. आजमितीला त्यांची संख्या ५० हून अधिक आहे. टोमॅटो, कारले, झेंडू, मिरची, दोडका, वांगी आदी विविध भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी करतात. त्यांना प्रत्येक पिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन होण्यासाठीही संघातर्फे मदत केली जाते. गरजू शेतकऱ्यांना रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक यंत्रणा, खते- कीडनाशके यांसाठी ५० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत प्रति पिकासाठी अर्थसाह्य केले जाते.

विक्री सुरू झाली की टप्प्याटप्प्याने शेतकरी रकमेची परतफेड करतात. उन्हाळ्यात बाजारात आवक कमी असल्याने दर चांगले मिळतात. त्यामुळे मार्च- एप्रिलमध्ये लागवडीस प्राधान्य असते. परतीच्या पावसाच्या काळात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर असाही लागवड हंगाम घेण्यात येतो. पॉली मल्चिंग, ठिबक सिंचन, आच्छादन आदींचा वापर होतो. संघातील प्रत्येक शेतकरी अर्धा, एक एकर ते पाच एकरांपर्यंत भाजीपाला लागवड करतो.

Agriculture
Agriculture Success Story : कुटुंबाची एकी, फुलवली बहुविध पीक पद्धती

‘मार्केटिंग’ झाले सोपे

एकाचवेळी शेतकऱ्यांचा विविध माल मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना उपलब्ध होऊ लागला. त्यातून चांगला दर हक्काने मिळवणे संघाला शक्य झाले. एकाच व्यापाऱ्याला माल न देता त्यांचे पर्याय तयार केल्याने त्यांच्यामध्ये दरांमध्ये स्पर्धा तयार झाली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला. आजमितीला प्रामुख्याने मुंबई बाजार समितीत विक्री होते. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गुलबर्गा, सोलापूर, पुणे आदी बाजारपेठांचे पर्यायही वापरले जातात. संघ म्हटले की खात्रीशीर माल अशी प्रतिमा व्यापाऱ्यांमध्ये तयार झाली आहे.

संघातील शेतकरी गुणवत्तापूर्ण उत्पादनात कुशल झाले आहेत. त्यामुळे तेजी-मंदीतही इतरांपेक्षा दोन रुपये अधिक दर त्यांना मिळतो. व्यापाऱ्यांकडूनही प्रतवारी, पॅकिंगबाबत वेळोवेळी सूचना येतात. सुरुवातीच्या वाटचालीत ५० लाखांपर्यंत उलाढाल होती. आता संघाने दहा वर्षांच्या काळात १० कोटींपर्यंतचा टप्पा साध्य केला आहे. अर्थात, हवामान बदल, दरांतील तेजी-मंदीनुसार त्यात चढउतार होतात. वर्षभरात सर्व शेतीमालाचे मिळून सव्वा लाखांपर्यंत डागांची (क्रेट्स किंवा बॉक्स) विक्री होते.

जीवनशैली बदलली

भूडचे प्रगतिशील शेतकरी व संघाचे सक्रिय सदस्य राहुल कदम म्हणाले, की एकेक शेतकऱ्याला प्रवाहात सामील करून घेणे सोपे काम नव्हते. त्यासाठी भाजीपाला पीक पद्धतीची निवड करून लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची शाश्‍वत व्यवस्था तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. संघातील प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी आहे. पीकनिहाय रोपांची मागणी, नोंदणी एकत्र केली जाते. त्यानुसार रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यासाठी दिली जातात. रोपांचा दर्जा पाहण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी जातात.

एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात रोपांची गरज भासत असल्याने त्यावर डिस्काऊंट देण्यात येतो. एकाच वाहनातून बाजारपेठेत माल पाठवला जातो. वाहतुकीच्या खर्चातही बचत होते. कृषी विभागाचेही सहकार्य मिळते. सदस्य शेतकऱ्यांची जीवनशैली बदलली आहे. पूर्वीच्या कौलारू, पत्र्याच्या घरांच्या जागी टुमदार बंगले झाले आहेत. चारचाकी, ट्रॅक्टर्स आले. घरचे विवाहसोहळे, शिक्षण आदींसाठी भांडवल तयार झाले. कौटुंबिक आर्थिक प्रगती झाली आहे.

राहुल कदम ८२७५०५७६१८

पाण्याची कमतरता असल्याने परराज्यात गलाई कामासाठी गेलो होतो. पण तिथं मन रमले नाही. मग गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. संघात सहभागी झालो. संघाच्या माध्यमातून होणाऱ्या शिवारफेरीत भाजीपाल्याचे विविध नवे वाण, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास होतो. त्यातून सुधारित शेतीची दिशा समजते.
अक्षय कदम, भूड ९५२७५९७२६२
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या अडचणी सोडवतो. ग्रुपमध्ये द्राक्ष उत्पादकही आहेत. द्राक्ष बागेत उभारलेल्या हवामान केंद्रांतील घटकांचा उपयोग भाजीपाला पिकांसाठी होतो. त्यातून शेतीचे काटेकोर नियोजन करणे सोपे होते.
विक्रांत फाळके ७८७५७१६६९१ खरसुंडी, ता. आटपाडी
संघाकडून आर्थिक मदत झाली. त्यामुळे भाजीपाला लागवडीसाठी पुढे आलो. टोमॅटो, झेंडू, कांदा, कारले अशी पिके घेत आहे. कोणतीही अडचण आल्यास संघ मदत करतो.
रोहन देशमुख, भूड ९३५९५०३५४३, ९३५९५०३५४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com