Nursery Business : भाजीपाला रोपांचा अग्रगण्य ब्रॅण्ड ‘शिवनेरी रोपवाटिका’

टोमॅटो, वांगी, झेंडू, कोबी, सिमला मिरची, फ्लॉवर यासारख्या सर्व प्रकारच्या फळभाज्यांपासून ते अगदी कलिंगड, खरबूज आणि पपई या फळांच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार रोपांसाठी सोलापूर जिल्ह्यातील खवणी (ता. मोहोळ) येथील तरुण कृषी उद्योजक बालाजी पंडित भोसले यांची ‘शिवनेरी रोपवाटिका’ हा अग्रगण्य ब्रॅण्ड ठरला आहे.
Nursery Business
Nursery BusinessAgrowon

सोलापूर- पंढरपूर या महामार्गावर मोहोळपासून अगदी पाच-सात किलोमीटरवर महामार्गालगतच खवणीमध्ये बालाजी भोसले यांची शिवनेरी रोपवाटिका (Nursery Business) लक्ष वेधते. त्यांची वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. त्यांचे वडील पंडितभाऊ हे स्वतः शेतकरी (Farmer) होते. त्या वेळी त्यांची परिस्थिती तशी जेमतेम आणि साधारण असल्याने शेतीत मोठे धाडस करता येत नव्हते.

Nursery Business
Village Farmer : बैलाची रिकामी दावण पोळ्याला डचत राहते

त्या वेळी अन्य व्यवसाय वा शिक्षण करण्याची परिस्थिती नसल्याने बालाजी यांनीही दहावीतून शिक्षण अर्धवट सोडून शेती आणि रोपवाटिकेत लक्ष घातले. वडिलांना साथ दिली. बालाजी यांच्यासह महेश, बबिता, सुनीता अशी त्यांना चार मुलं. त्यात मुली मोठ्या त्यामुळे मुलांचं शिक्षण आणि लग्नाला आलेल्या मुली,यामुळे मोठी कसरत होत होती. पण आई सुनंदा यांच्या खंबीर पाठबळावर त्या काळी वडिलांनी बालाजी, महेश यांच्यासह दोन्ही बहिणींची लग्न केली. पुढे संपूर्ण कुटुंब सावरलं.

एकीकडे रोपवाटिका,एकीकडे शेतीचे प्रयोग

पंडितभाऊ हे स्वतः पट्टीचे शेतकरी म्हणून या भागात ओळखले जायचे. विशेषतः भाजीपाला उत्पादनात त्यांचा मोठा हातखंडा होता. कमी दर्जाच्या रोप खरेदीच्या एका प्रसंगातून त्यांना रोपवाटिकेच्या व्यवसायाची संकल्पना सुचली.

साधारण २००५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा रोपवाटिका सुरु केली. २० गुंठ्यांवर साध्या पद्धतीने, अगदी गादीवाफ्यावर रोपे तयार करत सुरुवात केली. आपण स्वतः शेतकरी असल्याने कोणाचीही फसवणूक होऊ नये, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा, असा उद्देश ठेवूनच त्यांनी या रोपवाटिकेची सुरुवात केली.

त्यासाठी जणू त्यांनी व्रतच स्वीकारले. पुढे त्यांच्या रोपवाटिकेचा विस्तार होत गेला. आज सुमारे तीन एकरांवर हायटेक पद्धतीने प्रशस्त रोपवाटिका विस्तारली आहे. एका बाजूला पॅालिहाउसमधील हिरवीगार, टवटवीत दर्जेदार रोपे आणि एका बाजूला शेतीतले टोमॅटो, झेंडू यांसारख्या शेतीचे प्रयोग, ही जातिवंत शेतकऱ्यांची रोपवाटिका असल्याची जणू जाणीव करून देतात.

कुटुंबाची साथ ठरली महत्त्वाची

साधारण २०१८ मध्ये बालाजी यांच्या वडिलांचे पंडितभाऊंचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यानंतर बालाजी यांच्यावर कुटुंबासह व्यवसायाचा भार पडला. त्यावेळी भाऊ महेश यांनी त्यांना साथ दिली. आज कुटुंबातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे.

त्यांच्या आई सुनंदा यांच्यासह बालाजी यांच्या पत्नी सौ. राणी आणि महेश यांच्या पत्नी सौ. सीमा या सर्व कुटुंबांच्या कष्टावर शिवनेरी रोपवाटिकेच्या यशाची पताका आज अगदी डौलाने फडकते आहे. शेतीतल्या विविध प्रयोगांसह त्यांच्या रोपवाटिकेने गुणवत्ता, दर्जा टिकवून ठेवला आहेच, पण हायटेक पद्धतीच्या यंत्रणा बसवत रोपवाटिकेचा स्वतःचा नावाजलेला ब्रॅण्ड तयार केला आहे.

Nursery Business
Onion Rate : लाल कांद्याला उमराण्यात २,००० ते ७,१७१ दर

आईचं मार्गदर्शन

आज संपूर्ण कुटुंब या व्यवसायात राबत असले, तरी त्यात आईचं स्थान काहीसं वेगळं आहे. वडील असताना आणि आता त्यांच्या पश्‍चात संपूर्ण कुटुंबासह रोपवाटिकेच्या व्यवस्थापनाची निम्मी अधिक जबाबदारी बालाजी यांच्या आईच सांभाळतात. शिवाय मजुरांबरोबरही अनेक वेळा त्या काम करतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबाचा आधारवड तर ती आहेच, पण मार्गदर्शकही आहे.

महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणातून मागणी

महाराष्ट्रात सोलापूरसह सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, धुळे, नंदूरबार यांसह कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांतून भाजीपाला रोपांना मागणी होते. साधारण त्या त्या हंगामानुसार शेतकरी रोपांसाठी आधीच आगाऊ बुकिंग करतात. त्यामुळे वर्षभर सातत्याने रोपांचा पुरवठा सुरूच असतो. साधारण वर्षाकाठी एक कोटीपेक्षाही अधिक रोपांची निर्मिती रोपवाटिकेतून होते.

Nursery Business
Agri University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला प्रारंभ

नव उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती

बालाजी यांनी आज केवळ आपल्यापुरता आणि आपल्या कुटुंबापुरता हा व्यवसाय ठेवला नाही. तर अन्य नव उद्योजकांनाही प्रोत्साहन दिले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील जवळपास दहा तरुणांच्या रोपवाटिकांना रोपे पुरवून आणि रोपे कशी तयार करायची, याच प्रशिक्षण देऊन त्यांचा उद्योग त्यांना पुन्हा उभा करून दिला.

त्याशिवाय त्यांच्याकडे संपूर्ण रोपवाटिकेत रोज २० महिला मजूर आणि पाच पुरुष मजूर कामासाठी असतात. तसेच शेतीतल्या अन्य कामांसाठी वेगळे १० ते १५ मजूर त्यांच्याकडे असतात, साधारण ३५ ते ४० मजुरांना रोज त्यांच्याकडे काम उपलब्ध आहे, यातून त्यांनी रोजगारनिर्मिती साधली आहे.

सर्वप्रकारची भाजीपाला रोपे : शिवनेरी रोपवाटिकेमध्ये सर्वाधिक टोमॅटो, वांगी, फ्लॅावर, कोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी यांसह सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या रोपांची निर्मिती होते. त्याशिवाय कलिंगड, खरबजू, पपई आणि जी-९ केळी यांसारख्या फळांची रोपे तयार केली जातात.

मुख्यतः मे, जून, जुलै दरम्यान टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, झेंडू, ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मिरची, टोमॅटो तर ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत कलिंगड, खरबूज याप्रमाणे त्या त्या हंगामातील रोपे तयार केली जातात. त्यात सर्वप्रकारच्या भाजीपाला रोपांना मागणी असते. पण त्यातही टोमॅटो, कलिंगड, खरबूज, झेंडू इत्यादीच्या रोपांची सर्वाधिक मागणी असते. थेट रोपे बुकिंग करण्यासह स्वतः शेतकऱ्यांनी बी आणून दिले, तर त्यापासून रोप तयार करून देणे, अशा दोन्ही पद्धती त्यांच्याकडे आहेत.

Nursery Business
Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळेना भरपाई; तुपकरांचे ठिय्या आंदोलन

हायटेक पद्धतीने रोपनिर्मिती

सुमारे तीन एकरांवर सध्या त्यांच्याकडे रोपवाटिका आहे. त्यात एक एकर उच्च तंत्रज्ञानावर आधारित पॅालिहाउस उभारले आहे. त्याशिवाय एक एकरवर प्रशस्त असे हार्डनिंग युनिट आणि अन्य मोकळ्या जागेवरही विविध प्रकारची रोपे ठेवली जातात. त्यांच्याकडे रोपांची निर्मिती पूर्णपणे ट्रेमध्ये केली जाते.

त्यात ट्रेमध्ये बी भरण्यासाठी खास सीडलिंग मशिन आहे. एका दिवसात किमान ४ लाख बियाणे या मशिनद्वारे ट्रेमध्ये भरली जाऊ शकतात, एवढी त्याची क्षमता आहे. रोप व्यवस्थपनामध्ये पॅालिहाउस आणि हार्डनिंग युनिटमध्ये ट्रे खाली खडी आणि त्यावर विशिष्ठ अशी मॅट असल्याने रोपांचे बुरशीजन्य रोगांसह अन्य कीड- रोगांपासूनही संरक्षण होते.

शिवाय खत-पाणी देण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे, ती योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी वापरली जाते. बिया भरतेवेळी प्रत्येक लॅाटला त्या त्या लॉट नंबरनुसार रोपांच्या प्रत्येक ट्रेला स्टीकर लावले जाते, जेणेकरून तो लॉट मिसळू नये, तसेच कोणत्या लॉटचे रोप, कोणत्या शेतकऱ्याला दिले, याची अचूक नोंद ठेवली जाते. संपूर्ण रोपवाटिका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणली आहे. त्याद्वारे संपूर्ण नियंत्रण ते ठेवतात, मजुरांनाही पंचिग मशिनद्वारे हजेरी ठेवली आहे.

Nursery Business
Crop Damage Compensation : तुटपुंजी पीक नुकसानभरपाई परत केली विमा कंपनीला

आपण शेतकरी आहोत, व्यावसायिक नाही, ही भावना मी कायम मनात ठेवतो, शिवाय मी ज्या परिस्थितीतून आलो, त्याची पूर्णपणे जाणीव मला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास मला महत्त्वाचा आहे. रोपांच्या निर्मितीत कोणतीही तडजोड करत नाही. शेतकऱ्यांचा हाच विश्‍वास मला मह्त्वाचा वाटतो.

बालाजी भोसले,

शिवनेरी रोपवाटिका, खवणी, जि. सोलापूर

९९२२१८००७०, ९७६३८४०९४०, ९८२२१९२७३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com