Success Story : दर्जेदार फळबाग शेतीचा झाला सन्मान

Article by Vinod Ingole : शेतीला उद्योग समजून पार्डी देशमुख (जि. नागपूर) येथील भीमराव कडू यांनी संयुक्त कुटुंबाच्या ३७ एकर शेतीचा विकास साधला आहे. फळबागांच्या समृध्दीसह विक्री व्यवस्था मजबूत केली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती प्रगतिशील करण्यासह शेतकऱ्यांचे देखील ते मार्गदर्शक झाले आहेत. यंदाचा कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
Bhimrao Kadu
Bhimrao KaduAgrowon

Orchard Developed Agriculture : नागपूर जिल्ह्यात कळमेश्‍वर तालुक्‍यात नागपूरपासून ४० किलोमीटरवर पार्डी देशमुख गाव आहे. लोकसंख्या जेमतेम २२०० आहे. सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गावातील भीमराव कडू यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे ३७ एकर शेती आहे.

सध्या फळबाग केंद्रित शेती विकसित झाली असली, तरी पूर्वी कापूस हेच मुख्य पीक होते. त्याचे बीजोत्पादनही केले. सुरुवातीपासूनच प्रयोगशीलतेची आवड असलेल्या भीमरावांनी १९७१-७२ च्या सुमारास संत्रा लागवड केली.

त्या वेळी चांगले उत्पादन घेत बैलगाड्यांमधून विक्री केली. ५१ हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाले. त्या काळात ही मोठी रक्‍कम होती. या प्रयोगामुळे गावशिवारातील अनेकांना संत्रा लागवडीची प्रेरणा मिळाली. मग भीमरावांनी रोपवाटिका उभारून दर्जेदार रोपनिर्मिती सुरू केली.

फळबाग केंद्रित शेती

सध्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे २५ एकरांवर संत्रा बाग आहे. बागेतील ४५ वर्षे वयाची झाडे काढून चार एकर नव्याने लागवड केली आहे. सद्यःस्थितीत एकरी १० टन उत्पादकता साध्य केली आहे. हुंडी पद्धत तसेच व्यापाऱ्यांना विक्री होतेच. पण भीमराव यांचे भाऊ पराग पुणे येथे चार वर्षांपूर्वी स्थायिक झाले.

त्यांच्या माध्यमातून शहरातील शेतकरी बाजारांमध्येही संत्र्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा मार्ग भीमराव यांना मिळाला आहे. शेतकरी कंपनीचेही मोठे सहकार्य लाभते. स्थानिक स्तरावर संत्र्याची खरेदी किलोला २५ रुपये दराप्रमाणे होते. त्याच संत्र्याच्या थेट विक्रीतून किलोला ५० रुपये दर मिळतो असे भीमराव सांगतात. संत्र्याच्या जोडीला मोसंबी बागही विकसित केली आहे.

नागपूरचा काटोल, कळमेश्‍वर, नरखेड हा भाग संत्रा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच भागात दोन एकरांत कालीपत्ती चिकूची लागवड १५ वर्षांपूर्वी केली आहे. व्यापारी प्रति किलो १५ ते २० रुपये, तर किरकोळ फळविक्रेते वा ग्राहक ३५ रुपये ते कमाल ५० ते ६० रुपये दरानेही खरेदी करतात.

Bhimrao Kadu
Water Conservation : कोठलीत जलसंधारणातून टंचाईशी लढा

गव्हालाही थेट ग्राहक

चंद्रभागा जलाशयाजवळ पाच एकर शेती असून तेथे गहू, हरभरा यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. यंदा तीन एकर क्षेत्रातून सुमारे ४५ क्विंटल उत्पादन मिळाले. तीस किलो बॅग पॅकिंगद्वारे नागपूर येथील ग्राहकांना क्‍लिनिंग, ग्रेडिंग करून गहू पुरवण्यात आला आहे.

भीमरावांच्या शेतीची वैशिष्ट्ये

शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे असे भीमराव सांगतात. त्याच दृष्टीने शेतीची जडणघडण केली आहे. केवळ उत्पादन घेऊन व्यापाऱ्यांना माल न देता थेट ग्राहक विक्री व्यवस्था तयार केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी याच पद्धतीने काम करावे. तरच शेती नफ्याची होईल असे भीमराव सांगतात. संत्र्याची उत्तम कलमे तयार करून त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण केला.

सध्या मजुरांची समस्या मोठी आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून ट्रॅक्टर व अन्य यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. भाडेतत्त्वावरही यांत्रिक काम करवून घेतले जाते. दोन ते तीन बोअरवेल्स, तीन विहिरी आहेत. नदी आणि चंद्रभागा जलाशयातून पाइपलाइन करून सिंचनाची शाश्‍वत सोय केली आहे. सुमारे २० एकरांवर ठिबक सिंचन केले आहे.

Bhimrao Kadu
Farmer First Project : ‘शेतकरी प्रथम’ मधून गाव शिवारांत समृद्धी

भीमराव सांगतात की उत्पन्नाचा स्रोत कायम सुरू राहिला पाहिजे या हेतूने बागांचा विकास केला आहे. पहिली बाग अनुत्पादक होण्याआधीच दुसऱ्या फळबागेची लागवड झालेली असते. उदाहरण सांगायचे तर सन १९७२ च्या दरम्यान संत्रा लागवड केली होती. ही बाग अनुत्पादक होण्याच्या आधी पाच वर्षे दुसरीकडे चिकू लागवड केली होती. याच पद्धतीने संत्रा, मोसंबीच्या नव्या बागांचे नियोजन केले.

राष्ट्रीय संशोधन संस्था, अन्य शास्त्रज्ञ तसेच कृषी विभाग यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यानेच शेतीची विकास करणे शक्य झाले. आता अन्य शेतकऱ्यांनाही प्रत्यक्ष व फोनद्वारे मार्गदर्शन करीत असतो असे भीमराव म्हणाले. दरवर्षी १०० ते २०० च्या संख्येने शेतकरी त्यांच्या बागेला भेट देण्यासाठी येत असतात. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेमार्फत राजस्थानातील काही शेतकऱ्यांनी बागेला भेट दिली आहे.

शेती अधिकाधिक शास्त्रोक्‍त व्हावी यासाठी २००९ मध्ये शासनाच्या मदतीने इस्राईलचा अभ्यासदौरा केला. तेथील ज्ञानाचा उपयोग करून शेती व्यवस्थापनात अनुरूप आणि आवश्‍यकतेनुसार बदल केला. राजस्थान, हरियाना भागातून गायींची खरेदी करून त्याची या भागात विक्री करण्याचा व्यवसाय भीमरावांचा मुलगा चेतन हे करतात. त्यांचे शिक्षण बीएस्सी (कृषी) पर्यंत झाले आहे. सध्या मदर डेअरी प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुरवठ्यासाठी गीर गायी गुजरातहून आणल्या आहेत.

पुरस्कारांनी सन्मान

फळबागांमध्ये हातखंडा तयार केल्यानेच २००५ मध्ये उद्यानपंडित पुरस्काराने भीमरावांना सन्मानित करण्यात आले. तर हीच प्रयोगशीलता कायम टिकवित २०२१ या वर्षातील कृषिभूषण पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.

भीमराव कडू, ९८२२७०२५३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com