Floriculture Technology : पावसाच्या प्रदेशात यशस्वी पॉलिहाउसमधील जरबेरा

Flower Farming : पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या भोर तालुक्यातील डोंगराळ नाटंबी - चिखलावडे भागात उच्चशिक्षित स्वाती अमित किंद्रे यांनी ३० गुंठ्यांत पॉलिहाउस उभारले. जिद्दीने, चिकाटीने, संकटांशी सामना करून पॉलिहाउसमधील जरबेरा फुलशेतीचे तंत्रज्ञान शिकून त्यांनी ते आत्मसात केले.
Swati Kindre and Flower Farming
Swati Kindre and Flower Farming Agrowon

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील भोर हा अतिपावसाचा तसेच डोंगराळ भाग समजला जातो. भात, भुईमूग अशी मुख्य पिके येथे होतात. भोर येथील स्वाती किंद्रे यांनी अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत पॉलिहाउस उभारण्याचे धाडस करून ते यशस्वी केले आहे. त्यांचे पती अमित मध्यवर्ती बॅंकेत नोकरीस आहेत. त्यांनी नाटंबी - चिखलावडे भागात दोन एकर शेती घेतली. पैकी तीस गुंठ्यांत पॉलिहाउस आहे.

वेगळे काही करण्याची जिद्द

लग्न होऊन सासरी आल्यानंतर स्वाती बीकॉमचे शिक्षण घेत होत्या. त्यातील आवडीतून त्यांनी एमकॉमचे शिक्षण ७२ टक्के गुण घेऊन पूर्ण केले. शिक्षणानंतर व्यवसाय करून स्वतःचे करिअर घडवायची त्यांची इच्छा होती.

शेती हा पर्याय होता. पण त्यात वेगळे करायचे असा इरादा होता. त्यातून भात पट्ट्यात पॉलिहाउस व त्यात फुलशेती करायचे ठरवले. मग तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कला भेट देत विविध शेतकऱ्यांकडून अर्थकारण समजून घेतले. पुणे, मुंबई येथील फुलबाजारांना भेटी दिल्या. तळेगाव- दाभाडे येथील राष्ट्रीय संस्थेत आठ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

सुरू झाली पॉलिहाउसची शेती

सन २०१९ च्या काळात राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल सादर केला.
बॅक ऑफ इंडियाकडून २८ लाखांचे कर्ज मंजूर झाले. पॉलिहाउसचे काम सुरू केले आणि लागवडीच्या वेळी कोरोनाचे संकट सुरू झाले. शेती खडकाळ असल्याने मोठ्या प्रमाणावर मातीची गरज होती. मात्र टाळेबंदीमुळे वाहतुकीचे परवाने, वाहने व चालकही मिळत नव्हते.

मग स्थानिक पातळीवर शासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घेत परिसरातील शेतकऱ्यांकडून लाल माती आणून लागवड प्रक्रिया सुरू झाली. सुमारे ९० ट्रक डंपर लाल माती, दीड टन भाताचे तूस, २० ट्रॉली शेणखत आणले.

गादीवाफे तयार करून दोन रोपांत ३० सेंमी, तर दोन ओळींत १० सेंमी अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने सुमारे १६ हजार रोपांची लागवड केली. जेथून रोपे आणली त्यांच्याकडूनच व्यवस्थापन व निविष्ठा वापराचे मार्गदर्शन झाले.

Swati Kindre and Flower Farming
Floriculture Farming : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दृष्टीने गुलाबाचे नियोजन सुरू

यशस्वी झाली शेती

आठवड्यातील शक्यतो एकही दिवस खंड न पडता स्वाती यांनी मशागत, लागवड, काढणी ते बाजारपेठ या संपूर्ण साखळीत अखंड मेहनत घेतली. अनेक वेळा प्रकृती ठीक नसायची. तरीही जिवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला पॉलिहाउस शेतीत झोकून दिले. पती अमित यांनीही पूर्णपणे साथ दिली. चार-पाच वर्षांचे अथक प्रयत्न व अभ्यासातून जरबेरा शेतीतून समाधानकारक उत्पादन मिळू लागले आहे.

लागवड केल्यानंतर जरबेराचे पीक साधारण ५ ते ६ वर्षांपर्यंत ठेवले जाते. हे पीक एक दिवसाआड ३०० गड्डी (प्रति गड्डी १० फुले) म्हणजे तीन हजारांपर्यंत फुलांचे उत्पादन देते. वर्षभर ही साखळी अशी सुरू राहते. फुले गुलटेकडी बाजार समितीमध्ये पाठविली जातात.

वर्षभराचा विचार केल्यास प्रति गड्डीला किमान २० रुपयांपासून कमाल ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षभराचा सरासरी दर ४० ते ५० रुपये राहतो. या फुलशेतीतून ४० टक्के फायदा होत असून, महिन्याला नोकरीपेक्षाही चांगले उत्पन्न हाती पडत आहे. त्यामुळे मी व माझे कुटुंब समाधानी असल्याचे स्वाती सांगतात.

Swati Kindre and Flower Farming
Floriculture : शाश्‍वत उत्पन्नासाठी निशिगंध ठरले फायदेशीर

जरबेरा शेती व्यवस्थापनातील बाबी

जरबेराचे पांढरा, लाल (त्यात दोन उपप्रकार), पिवळा, गुलाबी असे पाच प्रकार. पांढऱ्या व पिवळ्या जरबेऱ्यास अधिक मागणी असल्याने तीस गुंठ्यांपैकी १५ गुंठ्यांत हे दोन रंग व उर्वरित
१५ गुंट्यांत अन्य सर्व रंग. संगणकीय ठिबक सिंचन यंत्रणेसह पॉलिहाउसचे तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगर्स, कूलिंग पॅडस यांचा वापर.

पावसाळ्यातील जून व जुलै काळात उत्पादन न घेता झाडांना विश्रांती देण्यात येते. ऑगस्टनंतर मग झाडांना पुन्हा जोम सुरू. त्यानंतर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, लग्नसराई असे क्रमाक्रमाने सण व उत्पादनास मागणी सुरू राहते.

किडी-रोगांमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. त्यासाठी रसायनाच्या वापरासोबत
झाडांचा पालापाचोळा साचणार नाही तसेच वाफ्यांच्या मधल्या भागात पाणी साठणार नाही
याची दक्षता घेण्यात येते.

फुलदांड्याची लांबी, जाडी, आकार, ताजेपणा या बाबींवर प्रतवारी व दर ठरतात. त्यामुळे
या कामात विशेष काळजी घ्यावी लागते. एक फूल जरी खराब असेल तरी त्याचा दरांवर परिणाम होतो. त्यामुळे केवळ उत्पादनावर नव्हे, तर काढणी आणि पॅकिंगवर देखील बारीक लक्ष दिले जाते. शेतात सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.

घर, शेती- समर्थ पेलली जबाबदारी (इन्फो)

स्वाती यांनी आता दहा हजारांच्या संख्येने ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू केले आहे. जोडीला
राजमुद्रा महिला बचत गटाची स्थापना केली आहे. घरचा स्वयंपाक, लहान मुले व घरची आवराआवर, व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वाती यांनी शेतीची जबाबदारी यशस्वी पेलली आहे.

घर ते शेत असे सुमारे सात किलोमीटर अंतर त्या दररोज जाऊन येऊन करतात. घरी सासूची देखील मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी रंगीत ढोबळी मिरची, भाजीपाला, झेंडू, कोथिंबीर आदींचे उत्पादन त्यांनी घेतले आहे.

स्वाती किंद्रे, ९७६३३५८४५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com