Dairy Business : दुग्ध व्यवसायात तयार केली जैनपूरने ओळख

Dairy Industry : गावाची खरी ओळख दुग्ध व्यवसायाने निर्माण केली आहे. सुमारे ३५८ कुटुंबापैकी सव्वातीनशेच्या आसपास कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत. त्यातून ती आर्थिक सक्षम झाली असून, शिवारातील समृद्धी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

Nagar News : नगर जिल्ह्यात जैनपूर (ता. नेवासा) हे गाव दुग्ध व्यवसायात पुढे आले आहे. गावातील ९५ टक्के कुटुंबे याच व्यवसायात आहेत. याच व्यवसायातून वर्षभर मिळणाऱ्या ताज्या उत्पन्नातून गावातील शेतकरी आर्थिक सक्षम झाले आहेत. शेणाच्या मुबलक उपलब्धतेतून व वापरातून शेतजमिनींचा चांगला विकास करून शिवार समृद्ध करण्याचे प्रयत्नही ग्रामस्थांनी केले आहे.

नगर जिल्ह्यात नेवासा-श्रीरामपूर रस्‍त्यावर सुमारे दहा किलोमीटरवर जैनपूर गाव आहे. पूर्वी ते गोदावरी नदीकाठी होते. जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर १९६९ मध्ये पुराचा फटका बसल्यानंतर पूरग्रस्त म्हणून १९७९ मध्ये पुनर्वसन होऊन गाव तीन किलोमीटर बाजूला वसले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसंख्या जेमतेम अठराशेंच्या जवळपास. गोदावरीचे वरदान असल्याने परिसर बागायती, हिरवागार. मात्र गावाची खरी ओळख दुग्ध व्यवसायाने निर्माण केली आहे. सुमारे ३५८ कुटुंबापैकी सव्वातीनशेच्या आसपास कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत. त्यातून ती आर्थिक सक्षम झाली असून, शिवारातील समृद्धी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

दुग्ध व्यवसायास चालना

साधारण चाळीस वर्षांपूर्वीचे बोलायचे तर गावात फारशी बागायती शेती पाहायला मिळत नव्हती. कारण गोदावरीचा नदीकाठ लाभला असला तरी विजेची समस्या होती. सन १९८० मध्ये मुळा-प्रवरा वीज संस्थेकडून वीजपुरवठा सुरू झाला. पाणी शिवारात येऊ लागल्याने शेतीला चांगले दिवस आले.

Dairy Farming
Dairy Business : कुशल व्यवस्थापनातून केला दुग्धव्यवसाय फायदेशीर

पंचेचाळीस वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातून काही शेतकरी जैनपूरला स्थायिक झाले. त्यांनी या भागात जमीन खरेदी करून शेतीसह दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यानंतरही काही वर्षांत पुन्हा संगमनेरमधून काही कुटुंबे येथे येत त्यांनीही या व्यवसायाला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात संकलन केंद्र नसल्याने दूध शेजारच्या बेल पिंपळगावात न्यावे लागे. सन १९९२ मध्ये तालुका दूध संघाच्या मदतीने केंद्र सुरू करून तालुका दूध संघाला पुरवठा होऊ लागला. आता गावात खासगी संकलन केंद्रेही पाहण्यास मिळतात.

Dairy Farming
Dairy Business : कष्ट, सातत्यातून विस्तारलेला आव्हाड दांपत्यांचा दुग्ध व्यवसाय

दूध संकलन

गावातील अनेक कुटुंबे अल्प किंवा अत्यल्प भूधारक आहेत. चाळीस वर्षांपूर्वी गावांत एकूण मिळून शंभर- दीडशे गायी होत्या. कालवडीचा सांभाळ करत अनेक शेतकऱ्यांनी त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या एकूण सात ते आठ हजारांच्या आसपास संकरित गायी असाव्यात.

दुभत्या गायींची संख्या लक्षात घेता दररोज किमान दहा हजार लिटर ते त्यापुढे दूध संकलन होते. बाहेरगावांतील केंद्रातूनही संकलन होते. सुमारे पावणेसातशे हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यातील सुमारे शंभर हेक्टरवर कापूस, दिडशे हेक्टर ऊस व पन्नास हेक्टरवर अन्य पिके वगळता सुमारे तीनशे हेक्टरच्या आसपास चारा पिके घेतली जातात.

चारा पिकांमध्येही शेणखताचा मुबलक वापर असल्याने दर्जेदार चारा मिळून दुधाची प्रत सुधारली आहे. वर्षाला तीन ते चार हजार टन मुरघास तयार होतो. त्यातून अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली.

व्यवसायातून आर्थिक सक्षमता

शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केला असून कष्ट कमी झाले आहेत. दररोज ताजे उत्पन मिळत असल्याने आर्थिक नियोजन करणे सोपे झाले. काहींनी व्यवसायातील पैशांमधून पाइपलाइन करून शिवारात पाणी आणले. देखणी घरे बांधली, मुलांना उच्चशिक्षण देणे शक्य झाले. एकेकाळी काही कुटुंबे मजुरी करायची. आता ती यशस्वी दुग्धोत्पादक झाली आहेत.

Dairy Farming
Dairy Industry : ‘वारणा’च्या उलाढालीत ४०० कोटींची वाढ; पुढील वर्षी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार

अनेकांना रोजच्या कामांतून एक दिवसही उसंत मिळत नाही. त्यामुळे शेतीसाठी आसपासच्या भागातून मजूर आणावे लागत आहेत. व्यवसायातील अडचणी, नवी गाय अथवा कालवडी खरेदी यासह अन्य विषयांवर ग्रामस्थ चर्चा करतात. तरुण शेतकऱ्यांकडून त्यासाठी ‘सोशल मीडिया’चा वापर होतो.

गावाला खुराकाची मोठी मागणी असते. हे लक्षात घेता बाजारातील दरांपेक्षा कमी दरात ते उपलब्ध व्हावे यासाठी थेट खरेदीवर भर असून, त्यातून उत्पादकांना दरांत पाच- दहा टक्के फायदा होतो. वर्षाला या व्यवसायातून पंधरा कोटींच्या आसपास उलाढाल होत असावी. सरपंच सुरेश डिके यांच्या नेतृत्वाखाली गाव प्रगतिपथावर आहे.

शेतीचा पोत वाढतोय...

दुग्धोत्पादक शिवाजी सांगळे, रामदास नागरे, बाळासाहेब गिते सांगतात, की रासायनिक खते व पाणी यांचा अमर्याद वापर केल्याने नदीकाठच्या जमिनी नापिक, क्षारपड होत आहेत. गोदावरी काठच्या अनेक गावांतही हाच अनुभव आहे. जैनपूरची शेतीही गोदाकाठी आहे.

येथील मातीचा पोतही घसरलेला होता. मात्र पशुपालनाच्या माध्यमातून गावात वर्षाला सुमारे पंधरा ते सतरा हजार टन शेणखत उपलब्ध होत आहे. त्याच्या वापरामुळे गावातील जमिनी सुपीक होण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे पिकेही जोमदार येत आहेत.

महिलांचा वाटा कौतुकास्पद

गावातील महिलांचा दुग्ध व्यवसायात पुरुषांएवढाच, किंबहुना त्यातून अधिक वाटा राहिला आहे. चारा आणणे, कुट्टी करणे यापासून ते गोठा व्यवस्थापनात त्याच आघाडीवर असतात. पूर्वी गायीचे दूध हाताने पिळून काढले जायचे. आता बहुतांश शेतकरी यंत्राचा वापर करतात. ते हाताळण्यातही महिलादेखील पारंगत झाल्या आहेत. पहाटे पाचपासून सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा व्यवसायातील सहभाग कौतुकास्पद आहे.

मी अल्पभूधारक शेतकरी असून, सव्वादोन एकर शेती आहे. एका गायीपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज वीसपेक्षा अधिक गायी आहेत. पिकांतील उत्पादन व उत्पन्न शाश्‍वत नसते. दुग्ध व्यवसायातून मात्र आठ ते दहा दिवसांनी रोख पैसे हाती येतात. दरांत चढ-उतार होत असले कुटुंब चालवण्यासाठी याच व्यवसायाचा मोठा आधार झाला आहे.
- शिवाजी सांगळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com